जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday, 5 October 2019

निवडणूक निरीक्षकांकडून निवडणूक तयारीचा आढावा




      जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघाकरीता भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या सामान्य निवडणूक निरीक्षक आणि पोलीस निवडणूक निरीक्षक यांनी 4 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हयातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, सामान्य निवडणूक निरीक्षक सर्वश्री मंजूर अली(अर्जुनी/मोरगाव), श्री राजीव मेहता (तिरोडा), श्री शौकत अहमद प्यारे(गोंदिया), श्री धनंजयसिंग भदोरीया (आमगाव), पोलीस निवडणूक निरीक्षक श्री धर्मवीर(अर्जुनी/मोरगाव), श्री सूधीरकुमार पोरीका(तिरोडा), श्री जी. जी. पांडे (गोंदिया), श्री टी. ईक्का (आमगाव), गोंदिया जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        आढावा सभेत माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी सांगितले की, मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट आणि छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव जिल्हयाला लागून गोंदिया जिल्हयाची सीमा आहे. जिल्हयातील आमगांव आणि अर्जुनी/मोरगाव हे विधानसभा मतदासंघ नक्षल प्रभावित आहे. या मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 या दरम्यानची आहे. तर गोंदिया आणि तिरोडा या मतदारसंघातील मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते सायंकाळी 6 या दरम्यान आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
         18 वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांनी मतदानासाठी यावे यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यात येत असल्याचे सांगून डॉ. बलकवडे यावेळी म्हणाल्या, मतदार जागृतीसाठी जिल्हयात 103 ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनीट वापरण्यात येत आहे. मतदान केंद्राची माहिती मतदान केंद्रावर असलेल्या सुविधा, निवडणूक प्रक्रीयेसाठी असलेले मनुष्यबळ, वाहनांची उपलब्धता, सीव्हीजीलवर प्राप्त तक्रारी तसेच जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात 10 लक्ष 96 हजार 441 मतदार आपला मतदानाचा हक्क 1282 मतदान केंद्रावरुन बजावणार आहे.        
        निवडणूक निरीक्षक यांनी यावेळी सूचविले की, मागील निवडणूकीत ज्या ठिकाणी मतदान कमी झाले आहे. त्या ठिकाणी मतदार जागृतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवावे त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होण्यास मदत होईल.  ज्या ठिकाणी मतदान कमी झाले आहे त्याची कारणे शोधून जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी पुढाकार घ्यावा. उमेदवाराच्या प्रत्येक बातमीवर लक्ष असावे. ते प्रचारासाठी वापरणार असलेल्या ध्वनीचित्रफित, बल्क एसएमएस, जाहिराती याबाबतची पूर्व परवानगी घेवूनच त्यांचे प्रसारण करावे असे सांगितले. 1950 तक्रार नंबरवर प्राप्त तक्रारीची माहिती घेतली. मोबाईल कवरेज एरीया जिल्हयात कोणत्या क्षेत्रात नाही याबाबतची देखील त्यांनी माहिती घेतली.
            सभेला उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, स्वीपचे नोडल अधिकारी एस.ई.ए. हाश्मी, पोलीस उपअधीक्षक(गृह) सोनाली कदम, खर्च विषयक बाबीचे नोडल अधिकारी विकास राऊळकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री जाधव, उपजिल्हाधिकारी राहूल खांदेभराड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्री तांबे, सीव्हीजीलच्या नोडल अधिकारी प्रणती बुलकुंडे  यांचेसह अन्य नोडल अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सादरीकरणाद्वारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री चौधरी यांनी निवडणूक तयारीची अन्य माहिती दिली.
                                                       000000000000



Wednesday, 2 October 2019

गांधी जयंती निमित्ताने तिरोडा जि.प. हायस्कुलमध्ये स्वच्छता दिन व मतदान शपथ कार्यक्रम


तिरोडा येथील जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आज 2 ऑक्टोबर रोजी मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅलीच्या माध्यमातुन मतदानाचा टक्का वाढावा आणि त्याचे महत्त्व कळावे. यासाठी विविध प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन विद्यार्थी घोषणा देत जनजागृती करीत होते. या रॅलीला प्राचार्य आर.वाय. जैतवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. रॅलीला प्राचार्य श्री. जैतवार यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. ही रॅली  जिल्हा परिषद हायस्कुल ते मोहनलाल चौक. गुरुदेव चौक, भूतनाथ मंदिर, राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा, सपना फॅशन चौक, पोलीस स्टेशन या मार्गाने घोषणा देत विद्यार्थ्यांनी रॅलीचा समारोप  केला.

गांधी जयंती निमित्ताने जिल्हा परीषदेत स्वच्छता दिन व मतदान शपथ कार्यक्रम



राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आज 2 ऑक्टोबर  रोजी स्वच्छता दिन  व मतदान शपथ कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परीषद गोंदिया येथे करण्यात आले. यावेळी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहा. जिल्हाधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.इ.ए हाश्मी यांनी उपस्थित अधिकारी/ कर्मचाऱ्यांसोबत जिल्हा परीषद इमारतीच्या परीसरात स्वछता मोहीम राबविली. यावेळी एकदाच उपयोगात येणाऱ्या प्लास्टिक चहा के कप, नास्ता प्लेट, चम्मच, प्लास्टिक प्लेट, प्लास्टिक ग्लास इत्यादिचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, रेश भांडारकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, सांख्यीकी अधिकारी वैशाली खोब्रागडे, आयटी विषय सहायक दिनेश उके, दिलीप रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.

महात्मा गांधी जयंती निमित्ताने प्लास्टिक व तंबाखू मुक्तीची दिली शपथ




          राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधुन संपुर्ण देश सिंगलयुज प्लॉस्टिक मुक्त करण्याचे आवाहन केले आहे.त्या अनुषंगाने स्वच्छता ही सेवा हा राष्ट्रीय कार्यक्रम देशभर राबविण्यात येत आहे. आज 2 ऑक्टोंबर रोजी या निमित्याने गोंदिया शहरात महात्मा गांधी पुतळयापासुन ते जयस्तंभ चौकमार्गे  इंदिरा गांधी स्टेडियमपर्यंत आणि परत गोरेलाल चौक ते महात्मा गांधी पुतळयापर्यंत तंबाखूमुक्त व प्लॉस्टिकमुक्‍त स्वच्छता रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे  मुख्य आयोजन इंदिरा गांधी स्टेडियम येथे करण्यात आले. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील परीविक्षाधिन अधिकारी रोहन घुगे,निवडणूक विषयक मतदार जनजागृती कार्यक्रमाचे नोडल अधिकारी एस.ई.ए.हाश्मी, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे,गोंदिया नगर पालीकेचे मुख्याधिकारी चंदन पाटील,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर, नगर पालीकेचे प्रशासन अधिकारी श्री.राणे,नगर पालीकेचे अभियंता श्री.खापर्डे, श्री.शेंडे, स्वास्थ्य निरीक्षक गणेश अतकरी, समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती कटरे, नेहरु युवा केंद्राचे श्री.धुवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            उपस्थित विद्यार्थी, बचत गटातील महिला,नगर पालीकेचे सफाई कर्मचारी यांना यावेळी तंबाखूमुक्त, प्लास्टिकमुक्त स्वच्छतेची शपथ श्री. मनोज दिक्षीत, श्री. खोब्रागडे यांनी दिली. तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदान संकल्प शपथ पत्राचे वाचन करण्यात आले.रॅलीच्या माध्यमातुन विद्यार्थानी प्लॉस्टिकमुक्तीच्या जनजागृती करणाऱ्या घोषणा दिल्या.यावेळी त्यांच्या हाती जनजागृती करणारे विविध फलक होते.कार्यक्रम स्थळी उपस्थित विद्यार्थी, बचत गटातील महिला व नागरीक यांनी प्लॉस्टिकमुक्ती व मतदार सेल्फी पॉईट येथे छायाचित्र काढले.रॅलीमध्ये व कार्यक्रम स्थळी शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग, नागरी उपजिविका अभियानातील गोंदिया शहरातील बचत गटातील महिला,नेहरु युवा केंद्राचे सेवाकर्मी, नगर पालिकेचे सफाई कर्मचारी कार्यालयातील कर्मचारी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 1 October 2019

मतदानात जिल्हा अव्वल राहण्यासाठी विविध उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत माहिती


: जिल्हयात जास्तीत जास्त मतदान कशाप्रकारे करता येईल व राज्यात गोंदिया जिल्हा मतदानाच्या टक्केवारीत अव्वल कसा राहील यासाठी निवडणूक विभाग मतदार जागृतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. मतदारांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करुन देवून जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून काम करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, परिविक्षाधीन भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी रोहन घुगे,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी,  मतदार जनजागृती कार्यक्रमातून जिल्हा नोडल अधिकारी एस.ई.ए. हाश्मी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक श्री. तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे म्हणाल्या, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्हयात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार जनजागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हा राज्याच्या सीमेवर असून मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा जिल्हयाला लागून आहे. जिल्हयाचा काही भाग आदिवासी बहुल असून नक्षलदृष्टया संवेदनशील आहे. तरी जिल्हा राज्यात मतदानात अव्वल कसा राहील यासाठी मतदान जनजागृती कार्यकम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
            जिल्हयातील विविध शाळा, महाविदयालयाच्या माध्यमातून विद्यार्थी या कार्यक्रमाची जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगून डॉ. बलकवडे पुढे म्हणाल्या, आतापर्यंत 611 कॅम्पस ॲम्बेसिडरची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादी वाचन कार्यक्रम चित्रकला स्पर्धा, विद्यार्थी उदबोधन, व्याख्यानमाला, प्रभातफेरी, दिव्यांग मतदारांना विशेष सुविधेबाबत माहिती देणे, नव मतदार नोंदणी कार्यक्रम, मतदार यादीत आपले नाव शोधणे (Go verify), मतदार मदत ॲप इन्स्टॉल करणे , रांगोळी स्पर्धा, जनजागृती रॅली काढणे, शॉर्ट फिल्म स्पर्धा, घोष वाक्य स्पर्धा, मानव श्रृंखला तयार करणे, वॉल पेटींग, वॉकेथॉन, दिव्यांग मतदार रॅली, बचत गटामार्फत जनजागृती अभियान संकल्प पत्र स्वाक्षरी इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. Go verify उपक्रमाअंतर्गत जिल्हयात 2368 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले नाव मतदार यादीत बघितले आहे. तसेच मतदार मदत ॲप्स त्यांनी इन्स्टॉल केले आहे. स्वीप उपक्रमाअंतर्गत 49,807 विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
            जिल्हयात 10 लाख 96 हजार 441 मतदार असून एका महिन्यात या मतदारामध्ये 1564 इतकी वाढ होवून आता जिल्हयातील मतदाराची संख्या 10 लाख 98 हजार 5 इतकी आहे. तर सेनातदलातील मतदार 1792 आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 4 ऑक्टोबर हा आहे. आमगांव आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघात मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत आणि तिरोडा व गोंदिया विधानसभा मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत असल्याची माहिती डॉ. बलकवडे यांनी यावेळी दिली.
            निवडणूकीसाठी 16 भरारी पथके, 15 स्थिर सर्वेक्षण पथक , 25 व्हीडीओ सर्व्हेलन्स पथक कार्यरत असून आचारसंहिता अमलात आल्यापासून उत्पादन शुल्क विभागाने 31 केसेस दाखल केले असून 14 लाख 587 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सी व्हीजील ॲप्सच्या माध्यमातून मोबाईलद्वारे निवडणूक विषयक तक्रारी करता येणार असल्याची माहिती डॉ. बलकवडे यांनी दिली.                                                                                                                        श्री शिंदे म्हणाले, पोलीस विभागाने निवडणूक विषयक प्रशिक्षण पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे. जिल्हयातील सर्व 834 परवानाधारक शस्त्रे जमा करण्यात आली आहे. बँक सुरक्षीततेसाठी काही शस्त्रे त्यांच्याकडे देण्यात आली आहे. अवैध दारु विक्रीवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्हयात 7 आंतरराज्यीय सीमेवर तपासणी नाके लावण्यात आले आहे. नक्षलग्रस्त भागात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असून प्रत्येक मतदारसंघासाठी पोलीस विभागाचा निवडणूक कक्ष गठीत करण्यात आला आहे. गुंडांच्या तडीपारीचे 11 प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी दिली.

Sunday, 29 September 2019

निवडणुक खर्च निरीक्षक श्री.रेड्डी व श्री.मुकुंदन जिल्हात दाखल



        विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -2019 करीता भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील चार मतदार संघाकरीता नियुक्त केलेले निवडणुक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहे.तिरोडा आणि अर्जुणी/मोरगाव विधानसभा मतदार संघासाठी श्री. श्यामसुंदर रेड्डी आणि गोंदिया आणि आमगाव विधानसभा मतदार संघासाठी श्री. आर मुकुंदन याची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यात आगमन होताच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलिस अधिक्षक श्री. मंगेश शिंदे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी सुभाष चौधरी, निवडणुक खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी श्री. विकास राउळकर यांचेशी निवडणुक खर्च संनियत्रणासाठी करण्यात आलेल्या तयारी बाबत चर्चा केली.
श्री. मुकुंदन यावेळी म्हणाले, व्हिडीओ पथकाच्या माध्यमातुन योग्य प्रकारे निवडणुक विषयक बाबींचे चित्रीकरण करावे. कुठे आचार संहिता भंग होणार नाही यावर करडी नजर ठेवावी. राजकीय पक्ष तसेच उमेदवार ज्या वस्तु तसेच साहित्य वापरणार आहेत त्यांचे दर निश्चित करण्यात आले आहे. खर्चाचा हिशेब तपासण्याचे काम वेळीच करावे. निवडणुक खर्च विषयक अहवाल संबधितांनी वेळेत सादर करावा असे सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्ह्यातील निवडणुक दृष्टिने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.
जिल्ह्यातील ज्या विधानसभा मतदार संघातील नागरिकांना निवडणुक खर्च विषयक काही तक्रारी सादर करावयाच्या असतील तर त्यांनी नियंत्रण कक्षाच्या टोल फ्रि क्रमांक 1950 यावर संपर्क साधावा. तिरोडा आणि अर्जुनी / मोरगाव विधानसभा मतदार संघासाठी श्री. श्यामसुंदर रेड्डी यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक 7820872548 आणि गोंदिया आणि आमगाव विधानसभा मतदार संघासाठी श्री. आर मुकुंदन यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक 8825957996 यावर संपर्क साधावा.

Thursday, 26 September 2019

बचतगटातील महिलांनी मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करावे - श्री हाश्मी



       देश उभारणीत मतदारांची भूमिका महत्वाची आहे. धर्मनिरपेक्ष भावनेने मतदान करण्यासाठी मतदारांनी पुढे आले पाहिजे. जिल्हयातील बचतगटातील महिलांनी जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करावे असे प्रतिपादन मतदार जागृती अभियानाचे नोडल अधिकारी एस.ई.ए.हाश्मी यांनी केले.
          26  सप्टेंबर रोजी प्रशासकीय इमारतीतील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात मतदार जनजागृती अभियानाच्या निमित्ताने तालुका, शहर व्यवस्थापक व क्षेत्रीय समन्वयक यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री हाश्मी पुढे म्हणाले, मागील निवडणूकीत शहरी भागात कमी मतदान झाले होते. यावेळी जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी बचत गटांच्या महिलांनी पुढाकार घ्यावा. मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करुन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनवर मतदानाचे जास्तीत जास्त प्रात्यक्षिक मतदारांकडून करुन घ्यावे. बचतगटांनी शहरी व ग्रामीण भागात मतदाराला मतदानासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करावे. 21 ऑक्टोबर रोजी जिल्हयात जास्तीत जास्त मतदार मतदानाचा हक्क कसा बजावतील यादृष्टीने नियोजन करावे. जिल्हयातील बचतगटातील 2 लाख महिलांनी मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा व राष्ट्र उभारणीसाठी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
           श्री खडसे म्हणाले, जिल्हयात बचतगटातील प्रत्येक महिलेने एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून मतदार जनजागृती अभियानात आपले योगदान दयावे. लोकशाही प्रक्रीयेत मतदार हा राजा असल्यामुळे मतदानाचे महत्व त्यांना पटवून दयावे. राज्यात जास्तीत जास्त मतदान गोंदिया जिल्हयातील चारही मतदारसंघात कसे होईल यासाठी बचतगटातील महिलांनी पुढाकार घ्यावा. असे सांगितले.
          श्री चौबे म्हणाले, माविमच्या माध्यमातून मोठया प्रमाणात मतदार जनजागृती करण्यास मदत होणार आहे. मतदार जागृत झाला तर 100 टक्के मतदान होण्यास मदत होईल. मागील निवडणूकीत ज्या ठिकाणी कमी मतदान झाले आहे त्या ठिकाणी बचत गटांच्या महिलांनी जास्तीत जास्त जनजागृती करुन मोठया प्रमाणात मतदान कसे होईल यासाठी नियोजन करावे. असे ते म्हणाले.
        प्रास्ताविकातून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री  सोसे यांनी सांगितले की, 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान आयोजित सप्ताहा दरम्यान स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून मतदार जागृती अभियानाअंतर्गत स्वीप संवादपर्व, संकल्प पत्र वाचन, नवीन मतदार अभिनंदन कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, चालता बोलता कार्यक्रमामध्ये प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मतदार जागृती तसेच निबंध स्पर्धा, पर्यावरणपुरक रांगोळी स्पर्धा, बचतगट, अंगणवाडी व शाळांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मतदार जागृतीसाठी सर्व गावात रॅली काढण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांना श्री सोसे यांनी संकल्प पत्राचे वाचन करुन शपथ दिली.