जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 2 October 2019

महात्मा गांधी जयंती निमित्ताने प्लास्टिक व तंबाखू मुक्तीची दिली शपथ




          राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधुन संपुर्ण देश सिंगलयुज प्लॉस्टिक मुक्त करण्याचे आवाहन केले आहे.त्या अनुषंगाने स्वच्छता ही सेवा हा राष्ट्रीय कार्यक्रम देशभर राबविण्यात येत आहे. आज 2 ऑक्टोंबर रोजी या निमित्याने गोंदिया शहरात महात्मा गांधी पुतळयापासुन ते जयस्तंभ चौकमार्गे  इंदिरा गांधी स्टेडियमपर्यंत आणि परत गोरेलाल चौक ते महात्मा गांधी पुतळयापर्यंत तंबाखूमुक्त व प्लॉस्टिकमुक्‍त स्वच्छता रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे  मुख्य आयोजन इंदिरा गांधी स्टेडियम येथे करण्यात आले. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील परीविक्षाधिन अधिकारी रोहन घुगे,निवडणूक विषयक मतदार जनजागृती कार्यक्रमाचे नोडल अधिकारी एस.ई.ए.हाश्मी, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे,गोंदिया नगर पालीकेचे मुख्याधिकारी चंदन पाटील,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर, नगर पालीकेचे प्रशासन अधिकारी श्री.राणे,नगर पालीकेचे अभियंता श्री.खापर्डे, श्री.शेंडे, स्वास्थ्य निरीक्षक गणेश अतकरी, समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती कटरे, नेहरु युवा केंद्राचे श्री.धुवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            उपस्थित विद्यार्थी, बचत गटातील महिला,नगर पालीकेचे सफाई कर्मचारी यांना यावेळी तंबाखूमुक्त, प्लास्टिकमुक्त स्वच्छतेची शपथ श्री. मनोज दिक्षीत, श्री. खोब्रागडे यांनी दिली. तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदान संकल्प शपथ पत्राचे वाचन करण्यात आले.रॅलीच्या माध्यमातुन विद्यार्थानी प्लॉस्टिकमुक्तीच्या जनजागृती करणाऱ्या घोषणा दिल्या.यावेळी त्यांच्या हाती जनजागृती करणारे विविध फलक होते.कार्यक्रम स्थळी उपस्थित विद्यार्थी, बचत गटातील महिला व नागरीक यांनी प्लॉस्टिकमुक्ती व मतदार सेल्फी पॉईट येथे छायाचित्र काढले.रॅलीमध्ये व कार्यक्रम स्थळी शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग, नागरी उपजिविका अभियानातील गोंदिया शहरातील बचत गटातील महिला,नेहरु युवा केंद्राचे सेवाकर्मी, नगर पालिकेचे सफाई कर्मचारी कार्यालयातील कर्मचारी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 1 October 2019

मतदानात जिल्हा अव्वल राहण्यासाठी विविध उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत माहिती


: जिल्हयात जास्तीत जास्त मतदान कशाप्रकारे करता येईल व राज्यात गोंदिया जिल्हा मतदानाच्या टक्केवारीत अव्वल कसा राहील यासाठी निवडणूक विभाग मतदार जागृतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. मतदारांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करुन देवून जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून काम करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, परिविक्षाधीन भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी रोहन घुगे,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी,  मतदार जनजागृती कार्यक्रमातून जिल्हा नोडल अधिकारी एस.ई.ए. हाश्मी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक श्री. तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे म्हणाल्या, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्हयात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार जनजागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हा राज्याच्या सीमेवर असून मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा जिल्हयाला लागून आहे. जिल्हयाचा काही भाग आदिवासी बहुल असून नक्षलदृष्टया संवेदनशील आहे. तरी जिल्हा राज्यात मतदानात अव्वल कसा राहील यासाठी मतदान जनजागृती कार्यकम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
            जिल्हयातील विविध शाळा, महाविदयालयाच्या माध्यमातून विद्यार्थी या कार्यक्रमाची जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगून डॉ. बलकवडे पुढे म्हणाल्या, आतापर्यंत 611 कॅम्पस ॲम्बेसिडरची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादी वाचन कार्यक्रम चित्रकला स्पर्धा, विद्यार्थी उदबोधन, व्याख्यानमाला, प्रभातफेरी, दिव्यांग मतदारांना विशेष सुविधेबाबत माहिती देणे, नव मतदार नोंदणी कार्यक्रम, मतदार यादीत आपले नाव शोधणे (Go verify), मतदार मदत ॲप इन्स्टॉल करणे , रांगोळी स्पर्धा, जनजागृती रॅली काढणे, शॉर्ट फिल्म स्पर्धा, घोष वाक्य स्पर्धा, मानव श्रृंखला तयार करणे, वॉल पेटींग, वॉकेथॉन, दिव्यांग मतदार रॅली, बचत गटामार्फत जनजागृती अभियान संकल्प पत्र स्वाक्षरी इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. Go verify उपक्रमाअंतर्गत जिल्हयात 2368 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले नाव मतदार यादीत बघितले आहे. तसेच मतदार मदत ॲप्स त्यांनी इन्स्टॉल केले आहे. स्वीप उपक्रमाअंतर्गत 49,807 विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
            जिल्हयात 10 लाख 96 हजार 441 मतदार असून एका महिन्यात या मतदारामध्ये 1564 इतकी वाढ होवून आता जिल्हयातील मतदाराची संख्या 10 लाख 98 हजार 5 इतकी आहे. तर सेनातदलातील मतदार 1792 आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 4 ऑक्टोबर हा आहे. आमगांव आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघात मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत आणि तिरोडा व गोंदिया विधानसभा मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत असल्याची माहिती डॉ. बलकवडे यांनी यावेळी दिली.
            निवडणूकीसाठी 16 भरारी पथके, 15 स्थिर सर्वेक्षण पथक , 25 व्हीडीओ सर्व्हेलन्स पथक कार्यरत असून आचारसंहिता अमलात आल्यापासून उत्पादन शुल्क विभागाने 31 केसेस दाखल केले असून 14 लाख 587 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सी व्हीजील ॲप्सच्या माध्यमातून मोबाईलद्वारे निवडणूक विषयक तक्रारी करता येणार असल्याची माहिती डॉ. बलकवडे यांनी दिली.                                                                                                                        श्री शिंदे म्हणाले, पोलीस विभागाने निवडणूक विषयक प्रशिक्षण पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे. जिल्हयातील सर्व 834 परवानाधारक शस्त्रे जमा करण्यात आली आहे. बँक सुरक्षीततेसाठी काही शस्त्रे त्यांच्याकडे देण्यात आली आहे. अवैध दारु विक्रीवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्हयात 7 आंतरराज्यीय सीमेवर तपासणी नाके लावण्यात आले आहे. नक्षलग्रस्त भागात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असून प्रत्येक मतदारसंघासाठी पोलीस विभागाचा निवडणूक कक्ष गठीत करण्यात आला आहे. गुंडांच्या तडीपारीचे 11 प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी दिली.

Sunday, 29 September 2019

निवडणुक खर्च निरीक्षक श्री.रेड्डी व श्री.मुकुंदन जिल्हात दाखल



        विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -2019 करीता भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील चार मतदार संघाकरीता नियुक्त केलेले निवडणुक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहे.तिरोडा आणि अर्जुणी/मोरगाव विधानसभा मतदार संघासाठी श्री. श्यामसुंदर रेड्डी आणि गोंदिया आणि आमगाव विधानसभा मतदार संघासाठी श्री. आर मुकुंदन याची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यात आगमन होताच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलिस अधिक्षक श्री. मंगेश शिंदे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी सुभाष चौधरी, निवडणुक खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी श्री. विकास राउळकर यांचेशी निवडणुक खर्च संनियत्रणासाठी करण्यात आलेल्या तयारी बाबत चर्चा केली.
श्री. मुकुंदन यावेळी म्हणाले, व्हिडीओ पथकाच्या माध्यमातुन योग्य प्रकारे निवडणुक विषयक बाबींचे चित्रीकरण करावे. कुठे आचार संहिता भंग होणार नाही यावर करडी नजर ठेवावी. राजकीय पक्ष तसेच उमेदवार ज्या वस्तु तसेच साहित्य वापरणार आहेत त्यांचे दर निश्चित करण्यात आले आहे. खर्चाचा हिशेब तपासण्याचे काम वेळीच करावे. निवडणुक खर्च विषयक अहवाल संबधितांनी वेळेत सादर करावा असे सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्ह्यातील निवडणुक दृष्टिने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.
जिल्ह्यातील ज्या विधानसभा मतदार संघातील नागरिकांना निवडणुक खर्च विषयक काही तक्रारी सादर करावयाच्या असतील तर त्यांनी नियंत्रण कक्षाच्या टोल फ्रि क्रमांक 1950 यावर संपर्क साधावा. तिरोडा आणि अर्जुनी / मोरगाव विधानसभा मतदार संघासाठी श्री. श्यामसुंदर रेड्डी यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक 7820872548 आणि गोंदिया आणि आमगाव विधानसभा मतदार संघासाठी श्री. आर मुकुंदन यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक 8825957996 यावर संपर्क साधावा.

Thursday, 26 September 2019

बचतगटातील महिलांनी मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करावे - श्री हाश्मी



       देश उभारणीत मतदारांची भूमिका महत्वाची आहे. धर्मनिरपेक्ष भावनेने मतदान करण्यासाठी मतदारांनी पुढे आले पाहिजे. जिल्हयातील बचतगटातील महिलांनी जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करावे असे प्रतिपादन मतदार जागृती अभियानाचे नोडल अधिकारी एस.ई.ए.हाश्मी यांनी केले.
          26  सप्टेंबर रोजी प्रशासकीय इमारतीतील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात मतदार जनजागृती अभियानाच्या निमित्ताने तालुका, शहर व्यवस्थापक व क्षेत्रीय समन्वयक यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री हाश्मी पुढे म्हणाले, मागील निवडणूकीत शहरी भागात कमी मतदान झाले होते. यावेळी जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी बचत गटांच्या महिलांनी पुढाकार घ्यावा. मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करुन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनवर मतदानाचे जास्तीत जास्त प्रात्यक्षिक मतदारांकडून करुन घ्यावे. बचतगटांनी शहरी व ग्रामीण भागात मतदाराला मतदानासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करावे. 21 ऑक्टोबर रोजी जिल्हयात जास्तीत जास्त मतदार मतदानाचा हक्क कसा बजावतील यादृष्टीने नियोजन करावे. जिल्हयातील बचतगटातील 2 लाख महिलांनी मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा व राष्ट्र उभारणीसाठी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
           श्री खडसे म्हणाले, जिल्हयात बचतगटातील प्रत्येक महिलेने एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून मतदार जनजागृती अभियानात आपले योगदान दयावे. लोकशाही प्रक्रीयेत मतदार हा राजा असल्यामुळे मतदानाचे महत्व त्यांना पटवून दयावे. राज्यात जास्तीत जास्त मतदान गोंदिया जिल्हयातील चारही मतदारसंघात कसे होईल यासाठी बचतगटातील महिलांनी पुढाकार घ्यावा. असे सांगितले.
          श्री चौबे म्हणाले, माविमच्या माध्यमातून मोठया प्रमाणात मतदार जनजागृती करण्यास मदत होणार आहे. मतदार जागृत झाला तर 100 टक्के मतदान होण्यास मदत होईल. मागील निवडणूकीत ज्या ठिकाणी कमी मतदान झाले आहे त्या ठिकाणी बचत गटांच्या महिलांनी जास्तीत जास्त जनजागृती करुन मोठया प्रमाणात मतदान कसे होईल यासाठी नियोजन करावे. असे ते म्हणाले.
        प्रास्ताविकातून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री  सोसे यांनी सांगितले की, 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान आयोजित सप्ताहा दरम्यान स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून मतदार जागृती अभियानाअंतर्गत स्वीप संवादपर्व, संकल्प पत्र वाचन, नवीन मतदार अभिनंदन कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, चालता बोलता कार्यक्रमामध्ये प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मतदार जागृती तसेच निबंध स्पर्धा, पर्यावरणपुरक रांगोळी स्पर्धा, बचतगट, अंगणवाडी व शाळांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मतदार जागृतीसाठी सर्व गावात रॅली काढण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांना श्री सोसे यांनी संकल्प पत्राचे वाचन करुन शपथ दिली.

Tuesday, 20 August 2019

गोरगरीबांची शासकीय कामे त्वरीत व्हावी - पालकमंत्री डॉ. परिणय फुके

सालेकसा तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण



       सालेकसा हा तालुका राज्याच्या टोकावर आहे. हा तालुका दुर्गम, आदीवासी बहुल आणि नक्षलग्रस्त आहे. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसिल कार्यालयात शासकीय कामानिमित्त बाहेरगावावरुन गोरगरीब लोक येतात. आता त्यांची कामे या नवीन इमारतीतून त्वरीत झाली पाहिजे. असे मत पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केले.
                सालेकसा तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण 20 ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ.केशवराव मानकर,माजी आ.भेरसिंग नागपुरे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अलताफ हमिद, जि.प महिला व बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे, नगराध्यक्ष विरेद्र उईके, जि. प सदस्य दुर्गा तिराले, परसराम फुंडे, तहसिलदार श्री. पित्तुलवार यांची उपस्थिती होती.
                डॉ. फुके म्हणाले,  हा भाग दुर्गम नक्षलग्रस्त असल्यामुळे या तालुक्याच्या विकासाला गती मिळाली पाहिजे यासाठी  अधिकारी- कर्मचारी इथे निवासी असले पाहीजे. या इमारतीमूळे गोरगरिब जनतेची व नागरिकांची कामे एकाच छताखाली लवकर होण्यास मदत होईल. गोरगरिबांच्या पैशातुन कर स्वरुपात पैसा उपलब्ध होतो तोच पैसा निधी म्हणुन विकास कामात येतो. त्यामुळे गरिबांच्या पैशाची जाणिव ठेवून विकासकामे चांगल्याप्रकारे झाली पाहिजेत. हाजराफॉल व कचारगडच्या विकासासाठी निधी देण्यात आला आहे. सालेकसा नगराच्या विकासाकरिता नगरपंचायतला 8 कोटी रूपये मंजुर करण्यात आले आहे. आमगाव- देवरी विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात 1 हजार कोटी रुपयांची कामे झाल्याचे त्यांनी सांगितले.
                सालेकसा, देवरी आणि आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणुक करण्यासाठी प्रशासनाने तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन करावे असे सांगून डॉ. फुके म्हणाले, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होईल. जिल्हातील नागरिकांच्या भेटी घेवून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणुन घेवून त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.
                आमदार पुराम म्हणाले, अनेक वर्षापासुन येथे तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीची आवश्यकता होती.आज ती लोकार्पणामुळे पूर्ण झाली आहे. तालुक्याच्या विकासाला गती मिळाली आहे.मुरकुडडोह- दंडारी या रस्त्यासाठी 17 कोटी रुपये मंजुर झाले आहे. भजेपार-बोदलबोडी दरम्यान असलेल्या नदीवर पूल बांधण्यासाठी 6 कोटी रुपये मंजुर झाले आहे. या भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. दरेकसा- जमाकुडो या भागात रुग्णांना त्वरीत उपचार मिळाले पाहिजे यासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहीका या भागात उपलब्ध झाली पाहिजे असे ते म्हणाले.
                पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानातंर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील अनुसया हत्तीमारे, धुरपता मेंढे, रंभा मेंढे, भगवंती शहा, हारबी शहा,चमेली सय्यद, जेलनबी शहा,जहारा शहा, बनेरबी शहा, मौसम शहा, नजमा सय्यद,हमिरबी सय्यद,अफसाना शहा ,सलमाबानो शहा, बशीरन सय्यद, शहेजनबी शहा या लाभार्थांना रेशन कार्डचे, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेचे धनादेश लक्ष्मीबाई तरोणे, तारा नवाडे यांच्यासह अन्य लाभार्थांना तर भागरथा ब्राम्हणकर, शिला जंगेरे,गिता डोये, जीवनकला साखरे यांच्यासह अन्य लाभार्थ्यांना गॅस जोडणी देण्यात आली.
                कार्यक्रमाला तहसिल कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री डॉ. फुके यांनी फित कापुन तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले. तहसिल कार्यालय परीसरात पालकमंत्र्यांनी वृक्षारोपण केले. प्रास्ताविक तहसिलदार पित्तुलवार यांनी केले. संचालन प्रा.श्रीमती बोपचे व प्रा. गणेश भदाडे यांनी केले.

व्याघ्र प्रकल्पाच्या विकासातून पर्यटनाला चालना मिळणार - पालकमंत्री डॉ. परिणय फुके

नवीन वनभवन इमारतीचे लोकार्पण

         गोंदिया जिल्ह्याचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे वैभव आहे. देशातील चांगल्या व्याघ्र प्रकल्पापैकी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा एक आहे. पर्यटक मोठया संख्येने या व्याघ्र प्रकल्पाला भेटीला आले पाहिजे यासाठी ब्रम्हपुरी वनविभागातुन पाच वाघ या प्रकल्पात सोडण्यात येणार आहे. वाघाच्या अस्तिवामुळे वाघ बघण्यासाठी पर्यटक मोठया प्रमाणात या प्रकल्पाला भेट देतील. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पाच्या विकासाला गती मिळुन पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल असे  प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
                नवीन वनभवन इमारतीचे लोकार्पण 20 ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी केले. यानिमित्त्याने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्री. रामानुजम, उपवनसंरक्षक  एस. युवराज, नगर पालिकेचे उपाध्यक्ष शिव शर्मा, नगरसेवक घनश्याम पानतावने, बेबी अग्रवाल, बंटी पंचबुध्दे, भाजपा जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, सुनिल केलनका, सुभाष आकरे, भाऊराव उके, महेंद्र मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
                डॉ. फुके पुढे म्हणाले, जिल्ह्यातील जंगलाचे संरक्षण करतांना मृत्यूमूखी पडलेल्या वनरक्षकांच्या स्मरणार्थ या परिसरात त्यांचे स्मारक बांधण्यात येईल. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने सुविधा निर्माण करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन क्षेत्रातील नामांकित कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला असुन त्यांच्या मदतीने जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी होम-स्टे ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्हातील जे जूने वाडे आहेत तेथे पर्यटकांना मुक्कामाचा आनंद घेता यावा यासाठी वाडयांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी 2 लाख रुपये देण्यात येतील. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. विदेशातील पर्यटकसुध्दा या होम-स्टे कडे आकृष्ट होतील. आता वन विभागाला आपण  गतिमान करणार असुन आता वन विभागाची कोणतेही कामे रखडणार नाही याची दक्षता वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घ्यावी. असे ते यावेळी म्हणाले.
                प्रारंभी पालकमंत्री डॉ. फुके यांनी फित कापून नवीन वनभवन इमारतीचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी परिसरात वृक्षारोपण केले. या इमारतीत आता वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, उपवनसंरक्षक, गोदिंया वनविभाग आणि विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग गोंदिया यांचे कार्यालय स्थानांतरीत झाले आहे. इमारतीच्या बांधकामावर 4 कोटी 96 लक्ष रुपये खर्च करण्यात आले.
                कार्यक्रमाला तिनही विभागाचे अधिकारी-कर्मचारी, वन्यजीव प्रेमी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्री. रामानुजम यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार सहाय्यक उपवनसंरक्षक नरेंद्र शेंडे यांनी मानले.

Monday, 19 August 2019

देवरी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते शालेय दप्तरांचे वितरण



       पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते 19 ऑगस्ट रोजी देवरी येथील आफताब मंगल कार्यालय येथे
इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 2343 विद्यार्थ्याना शालेय दप्तर वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी, आमदार संजय पुराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली, महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, जि.प. समाजकल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, देवरीच्या पंचायत समिती सभापती सुनंदा बहेकार, देवरीच्या नगराध्यक्षा कौशल्या कुंभरे,जि.प. सदस्य उषा शहारे व माधूरी कुंभरे,शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबईचे सहायक व्यवस्थापक हितेंद्र गांधी, इनोबल सोशल इनोव्हेशन मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग भंडारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
                राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने देवरी, सालेकसा व अर्जुनी/मोरगाव या आदिवासी बहूल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 2343 विद्यार्थ्यांना शालेय दप्तर पुरविण्यात येणार आहे. यावेळी देवरी तालुक्यातील जि.प.च्या 12 प्राथमिक शाळेतील 97 विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वितरीत करण्यात आले. या दप्तराचे वजन 400 ग्राम असून त्याचे रुपांतर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चटई, लिहीण्या व वाचण्याकरीता डेस्क या दप्तरासोबत देण्यात आले आहे. पर्यावरण पुरक असे हे दप्तर आहे. विद्यार्थ्यांना साबणाने हात धुण्यासाठी साबण ठेवण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. मुलांनी केलेला कचरा इतरत्र न टाकावा यासाठी दप्तरामध्ये छोटी पिशवी सुध्दा आहे.  या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, सर्व शिक्षा अभियानाचे श्री बिसेन, श्री ठोकने यांचेसह विविध शाळांचा केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी त्यांचे पालक तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                 000000000000