जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 1 August 2019

सुजाताला स्वयमचा आधार


        गोंदिया जिल्हा राज्याच्या पुर्वेकडे वसलेला असून त्याला छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्याची सीमा लागून आहे. हा जिल्हा मागास,दुर्गम,नक्षलदृष्ट्या संवेदनशील आणि आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील आदिवासी भागातील अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या बालकांचे कुपोषण दूर व्हावे यासाठी त्यांच्या आहारात अंगणवाड्यांच्या माध्यमातून अंड्यांचा पुरवठा व्हावा आणि कुक्कुट पालनाच्या माध्यमातून आदिवासी कुटूंबांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी स्वयम प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे. सालेकसा तालुक्यातील जमाकुडो या नक्षलप्रभावीत, दुर्गम व आदिवासी वस्ती असलेल्या गावातील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या जान्हवी स्वयंसहायता बचतगटाच्या सचिव सुजाता राजकुमार कुमडे यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करुन कुटूंबाच्या कर्त्या पुरुषाला अर्थोत्पादनात हातभार लावला आहे.
          राज्य शासनाने 29 एप्रिल 2017 रोजी एक निर्णय घेवून आदिवासी भागातील कुटूंबांची संतुलीत आहाराची गरज लक्षात घेवून तसेच त्या कुटूंबांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी अंड्यांचा पुरवठा करण्यासोबतच रोजगार निर्मिती करण्याच्या मुख्य उद्देशातून स्वयम प्रकल्प सुरु केला आहे. सुजाताला या प्रकल्पामुळे रोजगार निर्माण होण्यास मदत झाली आहे. सुजाताला सन 2018-19 या वर्षात मार्च 2019 मध्ये या प्रकल्पातून सातपुडा देशी प्रजातीची 45 कोंबडीची पिल्ले देण्यात आली. पहिल्या टप्प्यात 20, दुसऱ्या टप्प्यात 15 आणि तिसऱ्या टप्प्यात 10 अशा एकूण 45 पक्षांचा पुरवठा करण्यात आला.
         सुजाताचा जान्हवी स्वयंसहायता बचतगट हा पिपरटोला येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जयसेवा लोकसंचालीत साधन केंद्राअंतर्गत कार्यरत असून जमाकुडो येथील कचारगड ग्रामसंस्थेशी जुळला आहे. मागीलवर्षी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी जमाकुडो येथील कचारगड ग्रामसंस्थेत आले असता त्यांनी बचतगटातील महिलांना तंत्रशुध्द कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे कोंबडी पालन कसे करावे याची दिशा मिळाल्याचे सुजाताने सांगितले. सुजाताला 975 रुपये अंडी विक्रीतून मिळाले. 5 रुपये प्रती अंडा याप्रमाणे विक्री केली. अंगणवाडीत देखील सुजाताजवळून 6 रुपये प्रती अंडी याप्रमाणे खरेदी केली. 150 अंडी गावच्या अंगणवाडीला सुजाताने विकली. अंगणवाडीची  अंडीची गरज पूर्ण करुन इतरांनाही अंडीची विक्री केली. कोंबडे सुध्दा यामध्ये होती. 350 रुपये प्रती किलो याप्रमाणे कोंबडे विक्रीतून 8750 रुपये तीन महिन्यात सुजाताला मिळाले.
          पावसाच्या पाण्यावर अवलंबून अडीच एकर घरच्या शेतीत काम करणाऱ्या सुजाताला कुक्कुटपालन व्यवसाय एक रोजगाराचा आधार झाला. कोंबड्या ठेवण्यासाठी खुराडा तयार करण्यासाठी 1500 रुपये प्रकल्पातून मिळाले. पाच महिन्यात सुजाताला कोंबडी पालनातून 9675 रुपयांचे उत्पन्न मिळाले. बांबूपासून सुप-टोपल्या तयार करण्याचे काम सुध्दा सुजाता फावल्या वेळेत करते. जमाकुडो येथे पोलीस दूरक्षेत्र केंद्र आहे. आठवडी बाजार इथे भरत असल्यामुळे अंडी व कोंबड्यांना चांगली मागणी आहे. यामधून चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे कुक्कुटपालन या व्यवसायासाठी स्वयम प्रकल्पाची सुजाताला चांगली मदत झाली आहे. उत्पन्नाचे एक नवीन साधन मिळाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सुजाताला स्वयमचा आधार झाला आहे.

Tuesday, 30 July 2019

नाविण्यपुर्ण कामे खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून करावी - पालकमंत्री डॉ.परिणय फुके

जिल्हा खनिज प्रतिष्ठान सभा

          जिल्ह्यातील गौण खनीज स्वामित्वधनातून खनीज प्रतिष्ठामध्ये जमा होणाऱ्या निधीतून नाविण्यपूर्ण कामे करण्यात यावी. असे निर्देश पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी दिले.
        आज 30 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा खनीज प्रतिष्ठान सभेत पालकमंत्री डॉ.फुके बोलत होते. यावेळी खासदार सुनिल मेंढे, आमदार सर्वश्री इंजि.राजकुमार बडोले, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा खनिकर्म अधिकारी राजविलास गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती.
         पालकमंत्री डॉ.फुके म्हणाले, या निधीतून सूचविलेली जुनी सर्व कामे रद्द करण्यात यावी. रेती घाटावरुन रेती चोरी होणार नाही. त्यामुळे मोठा महसूल बुडणार नाही यासाठी त्यावर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक ड्रोन कॅमेरा खरेदी करण्यासाठी आणि रेती घाटावर निरिक्षण मनोरे उभारण्यासाठी या प्रतिष्ठानचा मोठा निधी त्यासाठी राखीव ठेवावा. ज्या लेखाशिर्षातून निधी मिळत नाही अशी नाविण्यपूर्ण कामे या निधीतून करण्यात यावी. तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा ते एलोरा दरम्यानच्या रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
         खासदार मेंढे यांनी या निधीतून ज्या गावात व ज्या ठिकाणी कामे करण्यात येणार आहे ती कामे गुणवत्तापूर्ण असली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन आवश्यक त्या ठिकाणी हा निधी देण्यात यावा असे ते म्हणाले.
       आमदार बडोले यांनी खनीज प्रतिष्ठानच्या निधीतून जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील कामांसाठी निधीची मागणी केल्यास प्राधान्यक्रम ठरवावा असे सांगितले.
       आमदार रहांगडाले म्हणाले, ज्या ग्रामपंचायत अंतर्गत रेतीघाट आहे त्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांना निधी उपलब्ध करुन दयावा. या निधी मागणीसाठी परस्पर येणारे प्रस्ताव मंजूर करु नये. घाटकुरोडा ते एलोरा या 8 कि.मी. रस्त्याची दुरुस्ती या निधीतून करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
        जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी खनिकर्म, खनीज प्रतिष्ठानच्या निधीतून शासकीय कामासाठी उच्च प्राधान्य बाबीसाठी 60 टक्के निधी खर्च करण्याबाबत शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे शिक्षण, आरोग्य व पिण्याचे पाणी या बाबीसाठी प्राधान्य असल्याचे सांगितले.
        जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री.गजभिये यांनी जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठानमध्ये जून 2019 अखेर 4 कोटी 47 लाख 94 हजार 500 रुपये निधी जमा असल्याचे सांगितले. सन 2017-18 आणि 2018-19 या वर्षात वाळूघाटाच्या पर्यावरण व खानकाम आराखडा अंतर्गत 25 लाख 59 हजार 600 रुपये इतका खर्च झाला असून 3 कोटी 99 लाख 95 हजार 175 रुपये शिल्लक असल्याचे सांगितले.
        जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 131 गावातून 4 कोटी 47 लाख 94 हजार 500 रुपये इतका निधी जमा करण्यात आला आहे. यापैकी 60 टक्के निधी 2 कोटी 68 लाख 76 हजार 700 रुपये उच्च प्राथम्य बाबीमध्ये पिण्याचे पाणी, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, महिला व बालकल्याण या बाबीसाठी राखून ठेवण्यात आला आहे. तर 40 टक्के निधी 1 कोटी 79 लाख 17 हजार 800 रुपये अन्य प्राथम्य बाबीसाठी अर्थात रस्ते, पुल, जलसंपदाची कामे, पर्यावरण दर्जा वाढ, ऊर्जा व पाणलोट क्षेत्र विकासासाठी राखून ठेवण्यात आल्याची माहिती श्री.गजभिये यांनी दिली.

प्राप्त निधी खर्च करुन विकास कामांना गती दयावी - पालकमंत्री डॉ.परिणय फुके

जिल्हा नियोजन समिती सभा

जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासासाठी तसेच  विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विविध यंत्रणांना निधी देण्यात येतो. यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करुन प्राप्त होणारा निधी निर्धारीत वेळेत खर्च करुन विकास कामांना गती दयावी. असे निर्देश पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी दिले.
        आज 30 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेत डॉ.फुके अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी खा.सुनिल मेंढे, आमदार सर्वश्री इंजि.राजकुमार बडोले, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        डॉ.फुके म्हणाले, ज्या यंत्रणांचे तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव अद्याप प्राप्त झाले नाही त्यांनी ते तातडीने प्राप्त करुन घेवून प्रशासकीय मान्यता घेवून निधी उपलब्ध करुन घ्यावा व कामांना गती दयावी. जिल्ह्यातील आदिवासी व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती तातडीने जमा करण्याची कार्यवाही करावी. ज्या तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचे प्रस्ताव ‘क’ वर्ग दर्जा मिळण्यासाठी आलेले आहेत त्याला नियमानुसार मान्यता देण्यात येईल. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करुन जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात आले पाहिजे यासाठी वन विभागाला निधी देण्यात येईल. निधीची कमतरता नसल्याचे सांगून डॉ.फुके म्हणाले, पर्यटनाच्या विकासाला चालना मिळाली की, जास्तीत जास्त लोकांना या क्षेत्रातून रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        वन विभागाच्या क्षेत्रातील अंतर्गत रस्ते चांगले असले पाहिजे. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होणार नाही असे सांगून डॉ.फुके म्हणाले, चोरखमारा ते नागझिरा अभयारण्यातील कार्यालय या दरम्यानच्या रस्ता खडीकरणाची कामे करण्यात यावी, यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. समाज कल्याणच्या अनुदानित वसतिगृहांना तातडीने अनुदान उपलब्ध करुन दयावे. वीज वितरण कंपनीने दुरावस्थेत व धोकादायक असलेले वीज खांब ताबडतोब बदलविण्याची कार्यवाही करावी. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 304 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट दिले असता आतापर्यंत केवळ 34 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत 150 लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही वीज वितरण कंपनीने करावी. संबंधित एजन्सी व्यवस्थीत काम करीत नसेल तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याबाबतचे प्रस्ताव वरिष्ठांना पाठवावे असे सांगितले.
          डॉ.फुके पुढे म्हणाले, सात दिवसाच्या आत रोहयोमधून करण्यात आलेल्या कामांची प्रातिनिधीक स्वरुपात पाहणी करुन केलेल्या कामांची देयक अदा करण्याची कार्यवाही करावी. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येईल. ही कामे तातडीने पूर्ण करावी. जिल्ह्यातील विविध विकास कामे वन विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राअभावी प्रलंबीत आहे. संबंधित विभागांना वन विभागाने तातडीने नाहरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी. ज्या नगरपंचायतींना अग्नीशमन वाहन उपलब्ध नाही त्या नगरपंचायतींनी तसे प्रस्ताव सादर करावे त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले.                    आमदार बडोले यांनी जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना मागील तीन वर्षापासून शिष्यवृत्ती मिळाली नसल्यामुळे मुलांना शैक्षणिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने त्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा करावी तसेच अनुसूचित जातीसाठी असलेल्या विविध योजनांवर निधी वेळेत खर्च झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
        आमदार रहांगडाले म्हणाले, जिल्ह्यातील शहरी भागात अपघात व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे.
         आमदार पुराम यांनी आमगाव येथे आदिवासी मुलांच्या वसतीगृहासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याची बाब त्यांनी लक्षात आणून दिली. सालेकसा व देवरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात वाहतुकीची साधने नसल्यामुळे मानव विकासच्या बसेसमधून विद्यार्थीनींसोबत विद्यार्थ्यांना देखील प्रवासाची सुट मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी उपस्थित जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी देखील काही समस्या यावेळी पालकमंत्र्यांपुढे मांडल्या.
         जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 या वर्षात मार्च-2019 अखेर विविध यंत्रणांनी सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती योजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेअंतर्गत 257 कोटी 92 लक्ष 88 हजार खर्च केला आहे. खर्चाची टक्केवारी 99.22 इतकी आहे. तर जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 या वर्षात 271 कोटी 82 लक्ष नियतव्यय मंजूर असून 90 कोटी 35 लाख इतकी तरतूद प्राप्त झाली असून 29 जुलै अखेर विविध यंत्रणांना 10 कोटी 76 लाख इतका निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत यांनी दिली. सभेला जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, जि.प.कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, समितीचे अशासकीय सदस्य माधुरी पाथोडे, कमला लिल्हारे, हेमलता पतेह, श्वेता मानकर यांचेसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


ग्रामीण रुग्णालय सडक/अर्जुनी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते सीबी-नॅट मशिनचे लोकार्पण

मशिनमुळे होणार अचुक क्षयरोग निदान

       सडक/अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्‍या हस्ते आज 30 जुलै रोजी अचुक क्षयरोग निदान करणाऱ्या आधुनिक सीबी-नॅट मशिनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, नगराध्यक्ष देवचंद तरोणे, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, भाजपा जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, जि.प.सदस्य शिला चव्हाण, रचना गहाणे, माजी पं.स.सभापती कविता रंगारी, पं.स.उपसभापती राजेश कठाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.हिंमत मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.राज पराडकर, तहसिलदार उषा चौधरी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिपक धुमनखेडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हर्षवर्धन मेश्राम, बालरोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
         सेंट्रल टीबी डिव्हीजन, आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आणि आशाकल्प हेल्थ केअर असोशिएशन संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त वतीने गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल व अतिदुर्गम अशा देवरी, सालेकसा, सडक/अर्जुनी व अर्जुनी/मोरगाव तसेच लगतच्या भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यातील नागरिकांना क्षयमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सडक/अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात अंदाजे 30 लक्ष रुपये किंमतीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या सीबी-नॅट मशिन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्यामुळे जनतेचे क्षयरोग निदान व उपचार करणे सोईचे होणार आहे. क्षयमुक्त भारत अभियानाकडे एक पाऊल पुढे जावून सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करता येणार आहे.
00000

प्रशासकीय इमारतीमुळे एकाच छताखाली लोकांची कामे गतीने होणार - पालकमंत्री डॉ.परिणय फुके

नविन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण



       गोंदिया शहराच्या ह्दयस्थानी भव्य अशी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी झाली आहे. या नविन प्रशासकीय इमारतीमुळे यापुर्वी शहरात विविध ठिकाणी विखुरलेली कार्यालये आता एकाच ठिकाणी आली आहे. त्यामुळे लोकांची कामानिमीत्त होणारी पायपीट थांबून लोकांचा कामानिमीत्त होणारा वेळ, पैसा व श्रम वाचण्यास देखील मदत झाली आहे. प्रशासकीय इमारतीत विविध कार्यालये एकाच छताखाली आल्यामुळे लोकांची कामे गतीने होण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.
         आज 30 जुलै रोजी गोंदिया येथील जयस्तंभ चौकातील नविन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री डॉ.फुके यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजकुमार बडोले होते. यावेळी खासदार सुनिल मेंढे, आमदार संजय पुराम व विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, भारतीय सनदी सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी रोहन घुगे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे व जि.प.पशु संवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
         पालकमंत्री डॉ.फुके पुढे म्हणाले, प्रशासकीय इमारतीची शहरात भाड्याने विविध ठिकाणी असलेल्या कार्यालयाला आवश्यकता होती. त्यांची ही गरज सुसज्ज अशा या इमारतीतून पूर्ण झाली आहे. इमारत बांधणे सोपे आहे, परंतू इमारतीची देखभाल करणे तितकेच कठीण काम आहे. या इमारतीत 28 विविध कार्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे प्रशासकीय इमारतीत असलेल्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तसेच कामानिमीत्त येणाऱ्या नागरिकांनी स्वच्छता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. या इमारतीत अग्नीशमन यंत्र बसविले आहेत. विविध साहित्य कार्यालयांना उपलब्ध करुन देण्यासोबतच फर्निचर देखील एकसारखे बसविले आहे. या इमारतीच्या परिसरात 6 दुकाने तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक दुकान महिला बचतगटासाठी राखीव ठेवण्यात यावे, त्यामुळे बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करणे सोईचे होईल. दुसरे दुकान दिव्यांग बांधवांना उपलब्ध करुन दयावे, तेथे एखादे झेरॉक्स सेंटर सुरु करुन त्याला रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमगाव व सालेकसा तहसिल कार्यालय इमारतीचे काम पुर्णत्वास आले असून लवकरच या इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
         अध्यक्षस्थानावरुन बोलतांना आमदार श्री.बडोले म्हणाले, बऱ्याच दिवसापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या गोंदियाचे वैभव असलेली ही नविन प्रशासकीय इमारत आजच्या लोकार्पणामुळे नागरिकांच्या सेवेत आली आहे. या इमारतीमुळे विविध कार्यालये एकाच छताखाली येणार असल्यामुळे नागरिकांना त्यांची कामे करणे सोईचे होणार आहे. सोबतच प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सुध्दा नागरिकांची कामे गतीने करता येणार आहे. या इमारतीत दिव्यांग बांधवांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट आहे, त्यामुळे दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांना इमारतीतील विविध कार्यालयात कामानिमित्ताने   ये-जा करण्यास सोईचे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
         यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासन निर्णयानुसार गोंदिया शहरातील सिंधी बांधवांना सत्ता प्रकार-अ या आखिव पत्रिकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास माजी आमदार हेमंत पटले व रमेश कुथे, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, माजी नगराध्यक्ष के.बी.चव्हाण, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, भाजपा जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांच्यासह जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख यांनी केले. संचालन श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी केले, उपस्थितांचे आभार उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी मानले.
00000

Monday, 22 July 2019

पालकमंत्र्यांनी केली नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी

·        30 जुलैला इमारतीचे लोकार्पण



           पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आज 22 जुलै रोजी जयस्तंभ चौकातील नव्यानेच बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, उपजिल्हाधिकारी प्रकाश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्र्यांनी यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय, जिल्हा विशेष लेखा परिक्षक कार्यालय, तहसिलदार कार्यालय व तलाठी कार्यालयाची पाहणी केली. त्यांच्या पाहणीतून बऱ्याच कार्यालयाचे छताचे काम व्यवस्थित झाले नसल्याचे तसेच पुरवठा करण्यात आलेल्या काही फर्निचर साहित्यांमध्ये गुणवत्ता नसल्याने संबंधित पुरवठादाराकडून  बदलूवन घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. इमारतीमध्ये बसविण्यात आलेली वातानुकूलित यंत्रणा व्यवस्थितपणे काम करीत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देताच संबंधित पुरवठादाराकडून तातडीने वातानुकूलित करणारे कुलर बदलवून घेण्याचे सुचविले. ही सर्व दुरुस्तीचे कामे येत्या आठ दिवसाच्या आत करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. येत्या 30 जुलै रोजी या नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण कार्यक्रम आयोजित येत असल्यामुळे संबंधित कामे त्यापूर्वी करण्याचे सांगितले. इमारतीतील जी कामे व्यवस्थित झालेली नाही  याची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            नवीन बांधण्यात आलेल्या या प्रशासकीय इमारतीमध्ये 28 विविध विभागाची कार्यालये लवकरच येणार असल्यामुळे कार्यालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांना इमारतीत कुठल्याही समस्या व अडचणी येणार नाही याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी. इमारतीच्या चारही मजल्यावर खुल्या जागेत मंत्रालयाप्रमाणे जाळी लावण्यात यावी. असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना या इमारतीत आल्यानंतर त्यांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात. इमारतीत चहा, पाणी, नाश्ता व भोजन आदिसाठी उपहारगृह देतांना महिला बचत गटाला देता येईल या दृष्टीने नियोजन करण्याचे त्यांनी सांगितले. इमारतीचा परिसर स्वच्छ व निटनेटका कायम राहील याची दक्षता इमारतीतील सर्व कार्यालयांनी तसेच कामानिमित्त नागरिकांनी घ्यावी. असे ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे मुकेश शिवहरे, भाजपाचे दिपक कदम, सुनील केलनका, गजेंद्र फुंडे यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी

·        विविध वार्डाला भेट व रुग्णांची विचारपूस


             पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आज 22 जुलै रोजी गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देवून विविध कक्षाची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना अधिष्ठातांना दिल्या. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हिंमत मेश्राम  यांचेसह वैद्यकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्र्यांनी लॉयन्स क्लब गोंदिया व लॉयन्स क्लब गोंदिया सिनियर यांचे वतीने प्रत्येक दिवशी निशुल्क भोजनसेवा आयोजित करण्यात येते. त्या ठिकाणी  भेट देवून त्यांच्या कामाचे कौतूक केले. त्यांनी आकस्मिक विभाग, सामान्य रुग्ण कक्ष व परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे  विचारपूस केली. रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्याचे, औषधांचा पुरवठा योग्य त्या प्रमाणात करण्याचे निर्देश दिले. जिल्हयातील कोणताही रुग्ण उपचारासाठी येथे आल्यास त्याला चांगले उपचार व सेवा मिळाली पाहीजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध समस्या त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध समस्या व प्रश्नांबाबत पुढच्या बुधवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्यासोबत बैठक लावण्यात येणार असून विविध समस्या यातून मार्गी लावण्यात येतील असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करुन केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाच्या समस्यांबाबत अवगत करुन दिले. ईथल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचेकडे बैठक लावण्याबाबत डॉ. मुखर्जी यांना सांगितले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध समस्या पालकमंत्री यांच्या लक्षात आणून दिल्या .