जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 15 July 2019

योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळाला पाहिजे - पालकमंत्री डॉ.परिणय फुके

पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ



      शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. त्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.
        आज 15 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने आयोजित पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ.फुके यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, भारतीय सनदी सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी रोहण घुगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
         पालकमंत्री डॉ.फुके पुढे म्हणाले, जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत 78 हजार 984 पात्र लाभार्थी आहेत. त्यापैकी 78 हजार 257 कुटूंबांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित 727 कुटूंब लाभार्थींना शिधापत्रिका वाटप करण्यात येणार आहे. अंत्योदय अन्न योजनेमध्ये समावेश करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांना अन्न पुरवठा योजनेअंतर्गत 35 किलो धान्य वितरीत करण्यात येते. यामध्ये प्रती 2 रुपये किलो प्रमाणे 10 किलो गहू व प्रती 3 रुपये किलो दराने 25 किलो तांदूळ याप्रमाणे वितरीत करण्यात येते. पात्र लाभार्थ्यांचे प्राधान्य कुटूंबातील व्यक्तींना प्रती व्यक्ती 5 किलो धान्य देण्यात येते. यामध्ये 2 रुपये प्रती किलो दराने 2 किलो गहू व 3 रुपये प्रती किलो दराने 3 किलो तांदूळ वितरीत केले जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्याकरीता प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी संख्येनुसार 6 लाख 78 हजार 450 एवढा इष्टांक ठरवून दिलेला आहे. त्यापैकी माहे जून-2019 अखेर 6 लाख 65 हजार 624 एवढा इष्टांक पूर्ण करण्यात आलेला आहे. उर्वरित 12 हजार 826 एवढ्या इष्टांकाची पुर्तता करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 95 हजार 422 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. ज्यांच्याकडे गॅस जोडणी नाही त्यांना 15 जुलै ते 14 ऑगस्ट 2019 या अभियान कालावधीत गॅस जोडणी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
         यावेळी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते अंत्योदय अन्न योजनेंतर्गत पारबता उईके, सयाबाई कोहळे, दिलीप नेवारे, बुगनबाई पारधी, फुलवंता भोयर, निर्मला पुसाम, भागरता मेश्राम, श्यामा राऊत. प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रफुल टेंभूर्णीकर, निलावती भंडारी, योगराज नेवारे, किर्ती रहांगडाले, भाऊलाल टेकाम, धुरपता सिंधीमेश्राम, मारोती बगमारे यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत अनिता बघेले, अमृता बोपचे, सुषमा रहांगडाले, सविता कटरे, रितू रहांगडाले, कमलाबाई चव्हाण, मिनाक्षी दाणी, कमलाबाई कोरे, ज्योती कापसे, रंजुबाई शिवणकर, पुष्पा चौहाण, प्रभावती मेश्राम, शांताबाई बिहारी यांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.
          जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे म्हणाल्या, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे 15 जुलै ते 14 ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाअंतर्गत ही विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपले जीवनमान उंचवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
          प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी सुभाष चौधरी यांनी केले. संचालन स्मिता आगाशे यांनी केले. उपस्थितांचे आभार निरिक्षण अधिकारी निलेश देठे यांनी मानले. कार्यक्रमास जि.प.सदस्य रचना गहाणे, माजी आमदार हेमंत पटले, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्यासह गॅस एजन्सीधारक व शिधापत्रिकाधारक बहुसंख्येने उपस्थित होते.

Sunday, 7 July 2019

दिव्यांगांच्या कल्याणासाठी निधी कमी पडू देणार नाही- पालकमंत्री डॉ.फुके

दहावी व बारावीमध्ये प्राविण्य प्राप्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा गौरव  





        जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. विविध क्षेत्रात दिव्यांग बांधवांनी आपली गुणवत्ता दाखवून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. दिव्यांगांना कुठलाही निधी लागला तर त्यांच्या विकासासाठी निधी देण्यात येईल. दिव्यांगांच्या कल्याणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.
           आज 7 जुलै रोजी गोंदिया येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये प्राविण्यप्राप्त जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे उद्घाटक म्हणून श्री.फुके बोलत होते. आमदार विजय रहांगडाले, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, माजी जि.प.सदस्य राजेश चतुर, माजी न.प.सदस्य घनश्याम पानतावणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
           पालकमंत्री डॉ.फुके पुढे म्हणाले, दिव्यांग मुलांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडून त्यांनाही आत्मसन्मानाने जगता यावे व एक समाजाचा घटक म्हणून दिव्यांगांना योग्य स्थान मिळावे यासाठी आपण प्रयत्नरत आहोत. दिव्यांगासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जि.प.समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगांना तीनचाकी सायकली वाटप करण्यात येतात. हा एक स्तुत्य उपक्रम असून यामुळे दिव्यांग बांधवांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण होणार असे सांगून ते पुढे म्हणाले, कोणताही दिव्यांग व्यक्ती त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सोयी-सुविधांपासून वंचित राहणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
           प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांग मुलांनी मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्राविण्यप्राप्त मिळविलेल्या ईशा बिसेन (दहावी), प्राची बन्सोड (बारावी), आरती मटले (बारावी), विनोद बरडे (दहावी), स्नेहा वाघमारे (दहावी), अमीत बघेले (बारावी), जुनेद तुरक (दहावी), अक्षय भगत (बारावी), रामेश्वर राऊत (दहावी), रिना शहारे (बारावी), पुनीत पटले (बारावी), रोहन रंगारी (दहावी), लक्ष्मी जुगनाहके (बारावी), दर्शना थेर (बारावी), प्रशांत उपराडे (बारावी), निलेश्वर रकशे (दहावी), निलम मेश्राम (दहावी), आदित्य वलथरे (दहावी), एस.जितेंद्र दोडानी (बारावी) आदी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात गौरव करण्यात आला. एकूण 231 विद्यार्थ्यांपैकी 177 दिव्यांग विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
           यावेळी जि.प.समग्र शिक्षा जिल्हा समन्वयक कुलदिपीका बोरकर यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सादरीकरणाद्वारे उपस्थितांना माहिती दिली. प्रास्ताविक जि.प.समग्र शिक्षा दिव्यांग विभागाचे जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांनी केले. संचालन जि.प.सहायक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले यांनी केले. उपस्थितांचे आभार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.आर.हिवारे यांनी मानले. कार्यक्रमास दिव्यांग बांधव व त्यांचे पालक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षलागवड काळाजी गरज - पालकमंत्री डॉ.फुके

वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न




         मागील बऱ्याच वर्षापासून नागरिक आपल्या गरजा पूर्ण करण्याकरीता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करीत आहे. या वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. त्यामुळै ग्लोबल वार्मींग व वातावरणातील बदल अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जलसंकटाची तीव्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर मात करण्याकरीता मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.
        आज 7 जुलै रोजी पवार बोर्डींग गोंदिया येथे आयोजित वृक्षलागवड कार्यक्रमात डॉ.फुके अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक विनीता साहू, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक तथा वनसंरक्षक श्री.रामानुजम, उपवनसंरक्षक एस.युवराज, वनविकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक दिव्या भारती, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
         पालकमंत्री डॉ.फुके पुढे म्हणाले, दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे. कारण मानवाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. यासाठी स्वयंस्फुर्तीने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. वृक्षलागवड ही लोकचळवळ होण्याकरीता लोकांना प्रोत्साहित केले पाहिजे. वृक्ष लागवड करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे या वृक्षलागवड उपक्रमास सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
         जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे म्हणाल्या, येणाऱ्या नविन पिढीसाठी एक चांगला संदेश जावा यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करावे. आपण कोणकोणत्या प्रजातीचे वृक्षारोपण करता यावर सुध्दा पर्यावरणाचे संतुलन अवलंबून असते. आप्तस्वकीयांच्या वाढदिवसाला भेट म्हणून एखादी महागडी वस्तू न देता, वृक्षरोपटे भेट म्हणून दयावे असे त्यांनी सांगितले.
         नगराध्यक्ष श्री.इंगळे म्हणाले, ‘33 कोटी वृक्ष लागवड’ हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. गोंदिया नगरपरिषदेद्वारे सुध्दा वृक्ष लागवडीचा चांगला कार्यक्रम राबवून या वृक्ष लागवडीच्या उपक्रमास सहकार्य करण्यात येईल. यासाठी नागरिकांनी पाणी अडवा-पाणी जिरवा व पाणी वाचवा हा उपक्रम राबवावा. या वृक्ष लागवड उपक्रमास सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे असे त्यांनी सांगितले.
        कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे, नगरसेवक सर्वश्री दिपक बोबडे, बी.बी.अग्रवाल व श्रीमती मैथीली बिसेन, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्यासह वनरक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक उपवनसंरक्षक एस.युवराज यांनी केले. संचालन सहायक वनसंरक्षक एम.एच.शेंडे यांनी केले, उपस्थितांचे आभार सहायक वनसंरक्षक श्री.शेख यांनी मानले.
                                                                                                           

Wednesday, 3 July 2019

आमगाव येथे मुद्रा महिला मेळावा उत्साहात संपन्न

8 महिलांना मुद्रा कर्ज मंजूरी पत्र वाटप
5 बचतगटांना 28 लक्ष रुपये कर्ज वितरीत
उद्योजक महिलांचा सत्कार




महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गोंदिया, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना समन्वय समिती, नियोजन विभाग व स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगाव यांच्या संयुक्त वतीने आज 3 जुलै रोजी आमगाव येथील लक्ष्मणराव मानकर फार्मसी कॉलेजमध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.माजी महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम होत्या. पं.स.सदस्य छबूताई उक, सिंधूताई भूते, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे सदस्य नंदकिशोर साखरे, स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष शांता चंद्रिकापुरे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        श्रीमती पुराम यावेळी म्हणाल्या, बचतगटाच्या माध्यमातून महिला  आज सक्षम झाल्या आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. ज्या वैयक्तीक लाभाच्या योजना आहेत त्याचा लाभ बचतगटाच्या महिलांनी घेतला पाहिजे. ज्या महिलांना उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना निश्चितपणे या योजनांचा लाभ मिळवून देवू. महिलांनी व्यसनापासून दूर रहावे. भावी पिढी घडविण्याचे काम महिलांचे आहे. ज्या गावात 15 पेक्षा जास्त बचतगट आहेत त्यांच्यासाठी कार्यालय सुरु करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
       श्री.जागरे म्हणाले, बेरोजगारी दूर करण्यासाठी तसेच शेतीपूरक अनेक व्यवसाय सुरु करण्यासाठी राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या अनेक योजना आहेत. विविध प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी हया योजना असून या योजनांचा लाभ घेवून आपले जीवनमान उंचावता येते. त्यासाठी अनुदान देखील देण्यात येते. कुक्कुटपालन, बकरीपालन, शेतीशी संबंधीत योजना तसेच गोदाम बांधण्याची योजना नाबार्डकडून राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
        डॉ.बेदरकर म्हणाल्या, स्त्रीमध्ये मोठी शक्ती आहे. महिलांनी स्वत:ला कमजोर समजू नये. तसेच स्वत:ला दुर्भाग्यवती सुध्दा समजू नये. मुले घडविण्याचे काम आई करते. नवनिर्मीतीची क्षमता महिलांमध्ये आहे. मुलींनी स्वत:चे रक्षण करण्यासाठी कराटे शिकले पाहिजे असे त्या म्हणाल्या.
        श्रीमती रामटेके म्हणाल्या, आज 75 टक्के महिला कर्करोगाने ग्रस्त आहेत. विषमुक्त अन्न खाण्यात येत असल्यामुळे आणि सॅनीटरी नॅपकीनचा योग्य वापर करण्यात येत नसल्यामुळे हा आजार बळावला आहे. बचतगटातील महिलांनी आता परसबागेतून विषमुक्त अन्न घेवून ते खावे. त्यामुळे महिलांना आजाराचा सामना करण्याची वेळ येणार नाही असे त्यांनी सांगितले.                                                                                                                                         यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे, श्री.साखरे, श्रीमती भूते, श्रीमती उके यांनीही उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या लाभार्थ्यांना कर्ज मंजूरी पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यामध्ये वळद येथील उमा रहांगडाले यांना वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक 50 हजार रुपये, कुंभारटोली येथील संगीता निकोसे यांना वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक 50 हजार रुपये, किक्रीपार येथील इश्वरी बिसेन यांना वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक 50 हजार रुपये, रिसामा येथील रिना महापात्रे यांना बॅक ऑफ इंडियाच्या वतीने 50 हजार रुपये, रिसामा येथील लक्ष्मी कोरे यांना बॅक ऑफ इंडियाच्या वतीने 50 हजार रुपये, संभुटोला येथील दुर्गा लिल्हारे यांना बॅक ऑफ इंडियाच्या वतीने 50 हजार रुपये, माल्ही येथील हिरामन शेंडे यांना कॅनरा बँकेच्या वतीने 50 हजार रुपये, किक्रीपार येथील बाबुलाल तावडे यांना कॅनरा बँकेच्या वतीने 50 हजार रुपये यांचा समावेश आहे.
        जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने कुनबीटोला येथील तुलसी महिला बचतगटाला 5 लक्ष रुपये, सावित्री महिला बचतगटाला दिड लाख रुपये, बोरकन्हार येथील जमुना बकरी व्यवसाय गटाला साडेसात लाख रुपये, धोबीटोला येथील नेतृत्व महिला बचतगटाला साडेसात लाख रुपये कर्जाचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल रिसामा येथील उन्नती ग्राम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानीत करण्यात आले.
         बंजाराटोला येथील कौशिक बिसेन या विद्यार्थ्याने दहावीमध्ये 90 टक्के गुण घैतल्याबद्दल त्याला सन्मानीत करण्यात आले. किक्रीपार येथील यशस्वी महिला बचतगटाने नृत्य तर पानगाव येथील आदर्श बचतगटाने नाटिका सादर करुन उपस्थित मान्यवर व महिलांची प्रसंशा मिळविली.
        कार्यक्रमाला आमगाव तालुक्यातील माविमच्या बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी काही बचतगटांनी साहित्य व खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले होते. यावेळी लकी ड्रॉ काढण्यात येवून संगीता बिसेन, निलीमा वाघमारे व छाया कुर्वे यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आले. प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केले. संचालन तालुका व्यवस्थापक आशा दखने यांनी केले. उपस्थितांचे आभार पुष्पकला खैरे यांनी मानले.
00000
        


Tuesday, 2 July 2019

कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा 22 हजार 411 लाभार्थ्यांना लाभ


      विकास प्रक्रियेत कामगारांचे योगदान महत्वाचे आहे. कामगार काम करीत असतांना त्याला सुरक्षीतता दयावी. त्यांना आरोग्याच्या सुविधांसोबतच अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने नोंदणीकृत इमारत व इतर बांधकामावर कामे करणाऱ्या कामगारांसाठी त्यांचा रोजगार तसेच त्यांच्यासाठी सेवा शर्तीचे नियमन करुन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. जिल्ह्यात या मंडळाकडे नोंदणी केलेल्या 22 हजार 411 पात्र लाभार्थ्यांना 4 कोटी 49 लक्ष 71 हजार 500 रुपयांचे साहित्य व आर्थिक स्वरुपात मदत केली आहे.
        जिल्ह्यातील 18 ते 60 वयोगटातील बांधकाम कामगार आणि मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या कामगारांना, त्यांच्या पाल्यांना तसेच पत्नीच्या प्रसुतीसाठी देखील मंडळाच्या कल्याणकारी योजनेतून आर्थिक मदत करण्यात आली आहे.
      कामगार कल्याण मंडळाकडे कामगारांची नोंदणी जिवित असलेल्या जिल्ह्यातील 156 लाभार्थी कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी प्रती कामगार 3 हजार रुपये याप्रमाणे 4 लक्ष 68 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. 14 कामगारांच्या पत्नीच्या प्रसुतीसाठी 2 लक्ष 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. इयत्ता पहिली ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी, इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या 143 पाल्यांना 6 लक्ष 12 हजार 500 रुपये शैक्षणिक व प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य करण्यात आले आहे. 14 पाल्यांना पदवीच्या शिक्षणासाठी प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे 2 लाख 80 हजार रुपये महाविद्यालय प्रवेश, पुस्तके आणि शैक्षणिक सामुग्रीसाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.
      नोंदणीकृत तीन कामगारांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटूंबांना अंत्यविधी योजनेअंतर्गत प्रत्येकी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत अंत्यविधीसाठी करण्यात आली आहे. चार विधवा पत्नींना प्रत्येकी 24 हजार रुपये प्रमाणे 96 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. पहिला विवाह करणाऱ्या दोन कामगार लाभार्थ्यास प्रत्येकी 30 हजार रुपये विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी अनुदान देण्यात आले आहे. 87 कामगारांच्या 98 पाल्यांना नवनीत पुस्तक संच देण्यात आले आहे.
       जिल्ह्यातील 8 हजार 636 नोंदणीकृत कामगारांना अवजारे खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 5 हजार रुपये अनुदान याप्रमाणे 4 कोटी 31 लक्ष 80 हजार रुपये देण्यात आले आहे. 6 हजार 26 रुपये सुरक्षा संच व अत्यावश्यक संच देण्यात आले आहे. जिल्ह्यातील 1300 कामगारांना कौशल्य विकास वृध्दीकरण योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांना महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या विविधप्रकारच्या 28 कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्या कुटूंबातील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सुध्दा या योजनेची मदत होत आहे.

Monday, 1 July 2019

ढाकणी येथे वृक्षारोपण : वृक्षलागवडीसोबत संवर्धन महत्वाचे - सीमा मडावी



      आज वृक्षलागवड काळाची गरज झाली आहे. वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे त्याचे परिणाम आज दिसून येत आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. यावर मात करण्यासाठी वृक्ष लागवडीसोबतच वृक्षांचे संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी यांनी केले.
       आज 1 जुलै रोजी गोंदिया तालुक्यातील ढाकणी येथे वन विभाग आणि गायत्री परिवाराच्या वतीने 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून श्रीमती मडावी बोलत होत्या. यावेळी उपवनसंरक्षक एस.युवराज, सहायक वन संरक्षक नरेंद्र शेंडे, एम.आर.शेख, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे, ढाकणी सरपंच, उपसरपंच, गायत्री परिवाराचे गोविंद येडे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील नांदवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        श्रीमती मडावी म्हणाल्या, वृक्ष लागवड मोहिमेत लोकांचा सहभाग असणे अत्यंत महत्वाचे आहे. ग्रामस्थांनी प्रत्येक वृक्षाची कुटूंबातील परिवातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली पाहिजे. वृक्ष लागवडीचे महत्व बालवयात विद्यार्थ्यांना पटवून दिले पाहिजे असे त्या म्हणाल्या.
       श्री. युवराज म्हणाले, जागतिक तापमानवाढीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड करुन त्याचे संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे आहे. भविष्यात भीषण दुष्काळाला सामना करण्याची वेळ येवू नये यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करुन त्याचे संवर्धन केले पाहिजे. यावर्षी जिल्ह्याला 80 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
       ढाकणी गावात विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढून वृक्ष लागवडीबाबत जनजागृती केली. ढाकणी येथील वन विभागाच्या रोपवनामध्ये स्थानिक प्रजातींच्या 25 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
       कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गायत्री परिवारातील सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

33 कोटी वृक्ष लागवड मोहिम : जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपण



        33 कोटी वृक्षलागवड मोहिमेचा एक भाग म्हणून आज 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी उपवनसंरक्षक एस.युवराज, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे, जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, सहायक वनसंरक्षक नरेंद्र शेंडे, एम.आर.शेख, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती मृणालीनी भूत, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच अन्य कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.