जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 5 April 2019

निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थ सारथी मिश्रा यांची तिरोडा येथे प्रशिक्षण वर्ग व स्ट्राँग रुमला भेट

        भारत निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थ सारथी मिश्रा यांनी आज 5 एप्रिल रोजी तिरोडा येथे भेट दिली व तेथे सुरु असलेल्या मतदान पथक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला मार्गदर्शन केले. तिरोडा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्ट्राँग रुमला भेट देवून पाहणी केली.
         तिरोडा येथील स्नेहल टॉकीजमध्ये आयोजित मतदान पथकाच्या प्रशिक्षणाला भेट देवून डॉ.मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले मतदान पथकांनी योग्यप्रकारे आणि काळजीपूर्वक निवडणूकीचे काम करावे. निवडणूकीच्या कामात हयगय होता कामा नये. हे काम जबाबदारीने पार पाडावे असे त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गंगाराम तळपाडे उपस्थित होते.
      शहिद मिश्रा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला भेट देवून त्यांनी उपयुक्त सूचना केल्या. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपविलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडाव्यात असे सांगितले. यावेळी तहसिलदार संजय रामटेके यांची उपस्थिती होती.
       शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने तिरोडा विधानसभा मतदारसंघासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स ठेवण्यात आलेल्या सीलबंद स्ट्राँग रुमची पाहणी करुन काही सूचना तहसिलदार श्री.रामटेके यांना दिल्या. या विधानसभा क्षेत्रात मतदान केंद्र, एकूण मतदार, स्त्री-पुरुष मतदार, नव्यानेच नोंदणी झालेले युवा मतदार आणि दिव्यांग मतदारांबाबतची माहिती डॉ.मिश्रा यांनी जाणून घेतली.

कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये - डॉ.पार्थ सारथी मिश्रा

                                   कारंजा येथे मतदार जागृती कार्यक्रम


येत्या 11 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. कारंजा येथील सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा. दिव्यांग व्यक्तीला सुध्दा मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोणताही मतदार हा मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. असे प्रतिपादन भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थ सारथी मिश्रा यांनी केले.
4 एप्रिल रोजी गोंदियाजवळील कारंजा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात आयोजित मतदार जागृती कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून डॉ.मिश्रा बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, स्वीपचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राठोड, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.मिश्रा पुढे म्हणाले, इथल्या सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. लोकशाही व्यवस्थेत मतदान करुन आपल्याला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. मतदानाबाबतची उदासीनता दूर करुन मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुन आपला हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत करावी असे त्यांनी सांगितले.
डॉ.बलकवडे यांनी उपस्थित महिलांना मतदानाची तारीख कोणती आहे. मतदार ओळखपत्र सर्वांकडे आहे का याबाबत विचारणा केली. जर मतदार ओळखपत्र नसेल तर मतदानासाठी इतर अकरा प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल. गावातील आजी-आजोबा, दिव्यांग व्यक्ती यांचेसह सर्व मतदारांनी मतदान करुन लोकशाही बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. मागील लोकसभेच्या निवडणूकीत झालेल्या मतदानापेक्षा या निवडणूकीत मोठ्या संख्येने मतदान झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 कारंजा येथील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत स्थापीत हिमालय ग्रामसंस्थेच्या 20 बचतगटातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बचतगटातील महिलांच्या हाती मतदार जागृतीचे विविध फलक होते. गावातील प्रथमच मतदान करणारे युवक-युवती देखील आपले मतदार ओळखपत्र घेवून उपस्थित होते. यावेळी त्यांनी निवडणूक निरीक्षक, जिल्हा  निवडणूक अधिकारी यांचेसोबत छायाचित्र काढली. सुभाष कलापथक मंडळाच्या सुभाष मेश्राम व त्याच्या कलावंतांनी कलापथकाच्या माध्यमातून लोकशाहीचे महत्व पटवून देवून प्रत्येक मतदाराने मतदान करणे किती आवश्यक आहे हे मनोरंजनातून प्रबोधन करुन सांगितले. यावेळी कारंजा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटद्वारे मतदानाचे प्रात्यक्षिके केली. याबाबत असलेल्या त्यांच्या शंकाचे समाधान उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी मानले.

निवडणूक निरीक्षक डॉ.मिश्रा यांची सी-व्हिजील कक्षाला भेट

        भंडारा-गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थ सारथी मिश्रा यांनी 4 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सी-व्हिजील कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, स्वीपचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
           निवडणूकीदरम्यान होणाऱ्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन करता येते. हे ॲप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा म्हणून बघितले जाते. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेला सी-व्हिजील कक्ष सकाळी 8 ते दुपारी 2, दुपारी 2 ते रात्री 8 आणि रात्री 8 ते सकाळी 8 असा चोवीस तास कार्यरत आहे. या कक्षाकडे 9 तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याची माहिती सी-व्हिजील कक्षाच्या पथक उप प्रमुख प्रणोती बुलकूंडे यांनी निवडणूक निरिक्षकांना दिली. तसेच 1950 या टोल फ्री क्रमांकावर आलेल्या तक्रारींचे विचारणा निवडणूक निरीक्षक यांनी केली असता, तक्रारीबाबतची नोंदवही ठेवण्यात येते. मतदार यादीत नाव आहे किंवा नाही, त्यांचा यादीतील अनुक्रमांक व मतदार ओळखपत्र याबाबतची माहिती या क्रमांकावर संपर्क साधाणाऱ्या व्यक्तींना देण्यात येत असल्याचे श्रीमती बुलकूंडे यांनी सांगितले. सी-व्हिजील कक्षाच्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ.मिश्रा यांनी निवडणूक कक्षाला भेट देवून तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली.
00000
         









पेडन्यूज व सोशल मिडियाबाबत समितीने दक्ष राहून काम करावे - डॉ.पार्थ सारथी मिश्रा


      लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत विविध पक्षांचे उमेदवार हे वृत्तपत्रांमध्ये तसेच इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये पेडन्यूज प्रकारच्या बातम्या छापून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारच्या बातम्यांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो. वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये पेडन्यूजप्रकारच्या बातम्या येणार नाही. अशाप्रकारच्या बातम्यांचा संशय आल्यास माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीने तातडीने सभेचे आयोजन करुन योग्य तो निर्णय घेवून दक्षतेने काम करावे. असे निर्देश भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थ सारथी मिश्रा यांनी दिले.
        नविन प्रशासकीय इमारतीतील जिल्हा माहिती कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रसारमाध्यम कक्षाला 4 एप्रिल रोजी डॉ.मिश्रा यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, स्वीपचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांची उपस्थिती होती.
          मिडिया मॉनिटरींगच्या माध्यमातून विविध वृत्तवाहिन्या व विविध वृत्तपत्रातील बातम्या आणि जाहिरातीवर लक्ष ठेवण्यात यावे असे सांगून डॉ.मिश्रा म्हणाले, सोशल मिडियावर देखील समितीचे लक्ष असले पाहिजे. सोशल मिडियावर टाकण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या व राजकीय पक्षांच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे परवानगी न घेता सोशल मिडियावर टाकण्यात आलेल्या जाहिरातीबाबत संबंधित उमेदवाराला किंवा राजकीय पक्षाला नोटीस दयावी. सोशल मिडियाच्या माध्यमातून तसेच विविध प्रकारच्या जाहिरातीतून जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगितले.
        यावेळी जिल्हा माहिती अधिकारी तथा प्रसारमाध्यम आणि संवाद संदेश वहन समितीचे नोडल अधिकारी विवेक खडसे यांनी प्रसारमाध्यम कक्षातून विविध वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया यावर येणाऱ्या जाहिरातींवर लक्ष ठेवण्यात येत असून यामध्ये उमेदवाराच्या जाहिरातीचा खर्च त्याच्या निवडणूक खर्चात समावेश करण्यात येत आहे. वृत्तपत्रांमध्ये तसेच इलेक्ट्रॉनिक मिडियात येणाऱ्या बातम्यांवर करडी नजर असून यामध्ये पेडन्यूजवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सोशल मिडियावर पोलिसांच्या सायबर सेलची नजर असल्याचे त्यांनी सांगितले.
         माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून उमेदवार किंवा राजकीय पक्षांना ज्या जाहिराती करावयाच्या आहेत त्याचे पूर्व प्रमाणिकरण या समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच सोशल मिडियावर करण्यात येणाऱ्या जाहिरातीच्या निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चाचा हिशोब देखील ठेवण्यात येत असल्याचे श्री.खडसे यांनी सांगितले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी उल्हास नरड उपस्थित होते.

Thursday, 4 April 2019

मतदार जागृती करणाऱ्या स्वीप एक्सप्रेसला निवडणूक निरीक्षकांनी दाखविली हिरवी झेंडी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक



       येत्या 11 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता जिल्ह्यातील मतदार मतदान करणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे यासाठी मतदार जागृती अभियानाअंतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. गोंदिया शहरातील तसेच गोंदिया शहरात कामानिमीत्त येणारा मतदार मतदानासाठी प्रोत्साहित व्हावा यासाठी मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडियाच्या सहाय्यातून केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील नविन उड्डाणपुलाच्या भिंतीवर चित्राद्वारे साकारण्यात आलेल्या भंडारा-गोंदिया स्वीप एक्सप्रेसला आज भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थ सारथी मिश्रा यांनी या एक्सप्रेसची पाहणी करुन हिरवी झेंडी दाखविली.
         यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ.राजा दयानिधी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिलीप सिल्लारे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर,  शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री.जाधव, तहसिलदार राजेश भांडारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
         जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून रेखाटण्यात आलेल्या या स्वीप एक्सप्रेसमुळे मतदार जनजागृती करण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. कोणताही मतदार  मतदानापासून वंचित राहू नये हा संदेश स्वीप एक्सप्रेसच्या माध्यमातून देण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाने या सार्वत्रिक निवडणूकीत शंभर टक्के मतदानाचे धोरण अवलंबीले आहे. निवडणूकीत विविध मतदार जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पथनाट्य, प्रभातफेरी, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, मोटार सायकल रॅली, मानव शृंखला आदी मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
         उड्डाणपुलाच्या भिंतीवर साकारण्यात आलेली स्वीप एक्सप्रेस शहरवासीयांसोबत जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष्य वेधून घेणारी आहे. याठिकाणी वोटर सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. याठिकाणी नागरिक या रेल्वे गाडीच्या चित्रासमोर अर्थात स्वीप एक्सप्रेस समोर उभे राहून सेल्फी काढू शकतील. रेल्वे गाडीवर रेखाटलेले चित्र व दिलेले संदेश मतदान करण्यास प्रोत्साहन देणार आहे. या रेल्वे गाडीच्या चित्राला स्वीप (सिस्टेमॅटीक वोटर्स एज्यूकेशन ॲन्ड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन प्रोग्राम) एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे. या गाडीचा नंबर 110419 म्हणजे निवडणूकीचा दिनांक 11 एप्रिल 2019 हा आहे. अनेकांनी कुतूहलतेने या एक्सप्रेसची पाहणी केली.
        यावेळी भारतीय स्टेट बँकेचे अतुल देशपांडे, बँक ऑफ इंडियाच्या विना अग्रवाल, श्री सत्य साई संस्थेचे सुशील अग्रवाल, कुलदिपीका बोरकर, अन्य अधिकारी, कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी मानले.

निवडणूकीची कामे यंत्रणांनी संवेदनशीलपणे करावी - डॉ.पार्थ सारथी मिश्रा

नोडल अधिकाऱ्यांची सभा


         भंडारा-गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या दृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाने चांगली तयारी केली आहे. भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणांनी संवेदनशीलपणे कामे करावीत. असे प्रतिपादन भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थ सारथी मिश्रा यांनी केले.
        आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नोडल अधिकाऱ्यांच्या सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ.मिश्रा बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक विनीता साहू, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
        डॉ.मिश्रा म्हणाले, 11 एप्रिल हा मतदानाचा दिवस असल्यामुळे तो राष्ट्रीय उत्सव आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी विविध यंत्रणेच्या माध्यमातून निवडणूकीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडायची आहे. निवडणूकीसाठी कामे करतांना यंत्रणेतील सर्वांनी स्वत:ला झोकून देवून काम करावे. ही कामे करतांना कोणाच्या हातून चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणूकीच्या काळातील प्रशिक्षण ते मतमोजणी या दरम्यानच्या कालावधीत अत्यंत सुक्ष्म नियोजनातून आपआपली जबाबदारी पार पाडावी. प्रसार माध्यमे या काळात अत्यंत सक्रीय असतात. जर काही चूक झाली तर ती चूक ते लक्षात आणून देतात, पण चूक होणारच नाही याची दक्षता निवडणूकीच्या काळात प्रत्येकाने घेवून काम करावे. जिल्ह्यात अवैध दारुची वाहतुक होणार नाही यासाठी उत्पादन शुल्क विभागाने दक्ष राहून काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
        निवडणूक ही सामुहिक जबाबदारी असल्याचे सांगून डॉ.मिश्रा म्हणाले, या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करणे हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. निवडणूकीच्या काळात निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजकीय बाबीवर बोलू नये. जिल्ह्यात निवडणूका शांततेत पार पाडण्याची परंपरा यापुढेही कायम राहावी. निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या प्रत्येकाने निवडणूकीच्या अटी व नियमांचे वाचन करुन पालन केले पाहिजे. जिल्ह्यात नविन मतदार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांच्यासह सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले पाहिजे. निवडणूक यंत्रणेतील सर्वांनी कठोर परिश्रम घेवून ही निवडणूक यशस्वी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
         जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाची तसेच मतदार नोंदणीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. सन 2014 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीत झालेल्या मतदानाची माहिती देखील त्यांनी दिली. या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत जिल्ह्यात 9 सखी मतदान केंद्र राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सुविधा, उपलब्ध असलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती तसेच निवडणूकीसाठी लागणारे मनुष्यबळ, वाहतुक व्यवस्था याबाबतची माहिती त्यांनी दिली.
         डॉ.दयानिधी यांनी मतदार जागृती अभियानाअंतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आल्याचे सांगितले. दिव्यांग मतदारांसाठी विशेष जनजागृती मोहिम राबविण्यात आल्याचे सांगून डॉ.दयानिधी यांनी दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर व रॅम्सच्या व्यवस्थेसह अन्य सुविधा मतदान केंद्रावर दिव्यांगांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        सभेला अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीमती  कदम, नोडल अधिकारी सर्वश्री उपजिल्हाधिकारी राहूल खांडेभराड, उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री.जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राठोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, जिल्हा खनिकर्म अधिकारी राजविलास गजभिये, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री.तांबे यांची उपस्थिती होती.
00000
          

Wednesday, 3 April 2019

जिल्ह्यातील 3558 दिव्यांग मतदार बजावणार मतदानाचा हक्क

553 ग्रामपंचायत अंतर्गत 714 व्हील चेअर तर
नागरी क्षेत्रात 82 व्हील चेअर उपलब्ध  

           येत्या 11 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्यांना व्हील चेअर, रॅम्स सह अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
        जिल्ह्यात 3558 दिव्यांग मतदार या निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात 845, तिरोडा विधानसभा मतदारसंघात 903, गोंदिया विधानसभा मतदारसंघात 689 आणि आमगाव विधानसभा क्षेत्रात 1121 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. यामध्ये 439 अंध मतदार, 385 कर्णबधीर मतदार, 2255 अस्थीव्यंग मतदार आणि अन्य प्रकारचे दिव्यांगत्व असलेले 479 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 553 ग्रामपंचायतीअंतर्गत दिव्यांग मतदारांना मतदान करता यावे यासाठी 714 व्हील चेअरची तर तर 8 नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात 82 व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.
       भारत निवडणूक आयोगाने तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सर्वप्रकारच्या दिव्यांग मतदारांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सूचना दिल्यानुसार जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रावर दिव्यांगांना सहजपणे मतदान करता यावे यासाठी रॅम्स व व्हील चेअरची सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहे. जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना रांगेत प्रतिक्षेत न राहता मतदान करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरुपी किंवा संपूर्ण सुविधा, अंध मतदारांकरीता ब्रेल लिपीतील मतदार स्लीप, अल्पदृष्टी मतदारांकरीता मॅग्नीफाईन ग्लास व डमी मतदान पत्र आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अंध असलेल्या मतदाराला मतदानासाठी सहकार्य करण्यासाठी मतदान अधिकाऱ्याच्या परवानगीने मतदान करण्यास एका व्यक्तीला सोबत नेण्याची परवानगी देण्यात येईल. दिव्यांग मतदाराला मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी विशेष शिक्षक तसेच दिव्यांग शाळेतील कर्मचारी, स्वयंसेवक मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत.