जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 9 April 2018

पिकाखालील क्षेत्र वाढविण्याचे नियोजन करा - पालकमंत्री बडोले



खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक
       जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध कृषिविषयक योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी देखील प्रयत्न झाले पाहिजे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त जमीन पीक लागवडीखाली कशी येईल यादृष्टीने कृषि विभागाने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.

        9 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.कृषि समिती सभापती शैलजा सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        श्री.बडोले म्हणाले, पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी विमा हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्या शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाले तर हमखास भरपाई या योजनेअंतर्गत मिळाली पाहिजे. पीक विमा काढून सुध्दा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची या योजनेबाबत नाराजी आहे. यासाठी कृषि आयुक्तालयाकडे या योजनेसाठी नविन निकष तयार करावे असा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी दिले. या योजनेचा लाभ गावपातळीवर ग्रामपंचायत स्तरावरुन आणेवारी काढून यावर्षीपासून मिळाला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
        जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले पाहिजे यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा असे सांगून श्री.बडोले म्हणाले, यावर्षी नविन शेतकरी कर्जमुक्ती योजनेत येत असल्यामुळे या शेतकऱ्यांना देखील जास्तीत जास्त पीक कर्ज मिळाले पाहिजे. पीक कर्ज मागणारा जिल्ह्यातील कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता बँकांनी घ्यावी. कृषि विभागाने कृषि केंद्र व रासायनिक खत विक्री केंद्रांची योग्यप्रकारे तपासणी करावी. दुष्काळस्थिती असलेल्या तालुक्यात 35 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
      तुडतुड्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना देखील मदत करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे असे सांगून श्री.बडोले म्हणाले, यावर्षी मोठ्या प्रमाणात हरभरा व मक्याचे पीक अनेक शेतकऱ्यांनी घेतले. त्याची खरेदी करण्याची कार्यवाही पणन विभागाने करावी. कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकरी यांत्रिक पध्दतीने शेती करतील यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करुन शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहित करावे. एकीकडे पाऊस येत नसल्यामुळे संरक्षीत शेतीचे क्षेत्र वाढवून या शेतीला प्रोत्साहन दयावे. अलिकडेच जिल्ह्यातील शेतकरी सिक्कीमला अभ्यास दौऱ्यावर जावून आले त्या शेतकऱ्यांनी तेथील शेतीचे प्रयोग आपल्या शेतीत राबवून जास्तीत जास्त शेती सेंद्रीय पध्दतीने करण्यासाठी पुढाकार घ्यावा. पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांना धानाऐवजी पर्यायी पिकाकडे वळविण्यासाठी कृषि विभागाने त्यांना प्रोत्साहन दयावे असेही त्यांनी सांगितले.
      आमदार अग्रवाल म्हणाले, एप्रिल 2017 ते मार्च 2018 या काळात आलेल्या अवेळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे ज्या शेतपिकांचे प्रत्यक्षात नुकसान झाले आहे त्याची योग्यप्रकारे पाहणी करण्यात आली नाही त्यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. पीक विमा योजनेत महसूल मंडळ हा निकष असल्यामुळे अनेक नुकसान झालेले शेतकरी मदतीपासून वंचित राहतात. आता या योजनेत बदल करण्याची आवश्यकता असून गावपातळीवर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे. कृषिपंपांसाठी पेड पेन्डींगसाठी निधी उपलब्ध झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
     जिल्हाधिकारी काळे म्हणाले, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँका माघारल्या आहेत. या बँकांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य नियोजन करावे असे सांगितले.
       जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री.इंगळे यांनी सांगितले की, एप्रिल 2017 ते मार्च 2018 या काळात आलेल्या अवेळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेती व फळपिकांचे 3589 हेक्टर क्षेत्रातील 9294 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यासाठी 3 कोटी 33 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. तर 2017-18 या वर्षात कमी पावसामुळे 33 टक्केपेक्षा कमी व जास्त नुकसान झालेले 1 लाख 84 हजार 527 शेतकऱ्यांना मदतीसाठी 27 कोटी 20 लक्ष रुपये अनुदान प्राप्त झाल्याचे सांगितले. खरीप हंगाम 2018 करीता महाबीज व खाजगी बियाणे कंपनीकडून 56 हजार 565 क्विंटल भात, तूर, मुंग, उळीद, ढेंचा व इतर पिकाच्या बियाण्यांची मागणी केली आहे. चालू वर्षासाठी 64 हजार 422 मे.टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे.
       खरीप हंगाम 2017-18 मध्ये 34 हजार 938 शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत, ग्रामीण व मध्यवर्ती बँकेकडून 151 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले. तर 2018-19 मध्ये याच बँकांना 405 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप/रब्बी सन 2017-18 मध्ये 48 हजार 278 कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा काढला. सन 2017-18 या वर्षात वीज जोडणी दिलेल्या कृषिपंपांची संख्या 2213 इतकी होती. तर सन 2018-19 साठी 2719 कृषिपंपांना वीज जोडण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे श्री.इंगळे यांनी सांगितले.
     आढावा सभेला अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, संबंधित यंत्रणांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी यांची उपस्थिती होती. संचालन तालुका कृषि अधिकारी घनश्याम तुमडाम यांनी केले. उपस्थितांचे आभार अश्विनी भोपळे यांनी मानले.

Sunday, 8 April 2018

लोकराज्यचा ‘महामानवाला अभिवादन’ विशेषांकाचे जिल्हाधिकारी काळे यांच्या हस्ते प्रकाशन


    भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमीत्त माहिती व  जनसंपर्क महासंचालनालयाने काढलेल्या महामानवाला अभिवादन या लोकराज्यचा एप्रिल महिन्याच्या विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते आज 8 एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या उदघाटन कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, प्रा.धर्मशील चव्हाण, बार्टीचे सहायक प्रकल्प संचालक (समतादूत) रिदय गोडबोले प्रामुख्याने उपस्थित होते.
      श्री.काळे म्हणाले, डॉ.आंबेडकर हे जागतिक किर्तीचे विचारवंत होते. त्यांनी समाजातील शोषित पिडीत वंचित घटकांच्या कल्याणासाठी कार्य केले. लोकराज्यचा महामानवाला अभिवादन या विशेषांकामध्ये अत्यंत चांगले लेख असल्याचे त्यांनी सांगितले.
     महामानवाला अभिवादन या लोकराज्यच्या विशेषांकात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अतिथी संपादकीयमध्ये असामान्य व अद्वितीय असे वर्णन डॉ.आंबेडकरांचे केले आहे. सामाजिक परिवर्तनाला दिली नवी दिशा यामधून राजकुमार बडोले यांची मुलाखत घेण्यात आली आहे. हक्क, अधिकार आणि दिले आत्मभान या लेखामधून राजकुमार बडोले यांनी डॉ.आंबेडकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सर्वांना समान न्याय, इतिहास तज्ञ डॉ.जयसिंगराव पवार यांचा राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.आंबेडकर यावर लेख, याशिवाय परिवर्तनाचे अग्रदूत, जलनीतीचे उदगाते, ऊर्जाशक्तीला चालना, उत्कृष्ट संसदपटू आणि शिस्तप्रिय प्रशासक, बाबासाहेबांचा जयंती आणि कोणी सुरु केली, महामानवाचा स्मृतीगंध, ग्रंथकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बुध्दीवादाची प्रेरक शक्ती, शिक्षणाची मुहूर्तमेढ, शांततामय सहजीवनाचे हमीपत्र, महामानवाचा जीवनपट, समतेचा उदगाता, प्रेरणा, ऊर्जा आणि स्फूर्ती देणारे तीर्थस्थळे, सुरक्षेचा प्रहरी, नव्या संधी प्रगतीच्या, दलित साहित्याचा आधारवड या विविध विषयांमधून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर लेखकांनी प्रकाश टाकला आहे. याशिवाय अर्थसंकल्प विशेष, शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य, रोजगार निर्मिती व उद्योजक चालना, तसेच अन्य विषयांवर सुध्दा लेखन या विशेषांकात करण्यात आले आहे.
     या विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह व निवासी शाळेचे विद्यार्थी, बार्टीचे समतादूत, समाज कल्याण विभाग, विविध महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने योगदान दयावे - अभिमन्यू काळे



सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन
      समाजातील सर्व घटकांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे मंथन व्हावे हा या सप्ताहामागचा उद्देश आहे. डॉ.आंबेडकर हे ज्ञानी व्यक्तीमत्व होते. त्यांनी असंख्य विषयावर विस्तृत लिखान केले. त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. डॉ.आंबेडकरांनी समाजाच्या कल्याणासाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचले. त्यांची प्रेरणा घेवून प्रत्येकाने समाजाच्या कल्याणासाठी योगदान दयावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
      भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीचे औचित्य साधून 8 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. आज 8 एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात या सप्ताहाचे उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, प्रा.धर्मशील चव्हाण, बार्टीचे सहायक प्रकल्प संचालक (समतादूत) रिदय गोडबोले यांची उपस्थिती होती.
     जिल्हाधिकारी काळे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानले. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचे आसुड मधून शेतकऱ्यांचे दु:ख मानले. यातून त्यांनी विचाराला कृतीची जोड दिली. समाजाच्या हिताचा विचार करुन त्यांनी पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या थोर व्यक्तींनी आपल्या‍ विचाराला कृतीची जोड दिल्यामुळे ही माणसे महामानव झालीत. शिक्षण घेवून डॉ.आंबेडकरांनी सर्वप्रथम समाजाच्या कल्याणाचा विचार केला. ‘प्रॉब्लेम ऑफ रुबी’ या ग्रंथातून त्यांनी आर्थिक विचार मांडले. हे विचार अत्यंत महत्वाचे आहे. कितीही वाईट परिस्थिती आली तरी समाजाच्या हितासाठी मागे राहणार नाही हे डॉ.आंबेडकरांनी ठरविल्याचे त्यांनी सांगितले.
      डॉ.सविता बेदरकर म्हणाल्या, सामाजिक समतेची पायाभरणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. ‘जाती तोडो समाज जोडो’ ही संकल्पना त्यांनी मांडली. धर्मनिरपेक्ष असलेल्या आपल्या देशात धर्म कधकधी डोके वर काढत असल्याचे सांगून डॉ.बेदरकर म्हणाल्या, सर्व मानव हे एक झाले पाहिजे असे डॉ.आंबेडकरांना वाटायचे. या सप्ताहामुळे समाजात समता निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        सन 2017-18 या वर्षात डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार मिळाल्याबद्दल सुर्तीसेन वैद्य, लिखन निर्विकार, चरणदास चंद्रिकापुरे, उमाकांत अवस्थी, होमराज ठाकरे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.धर्मशील चव्हाण यांनी दुसऱ्या सत्रात स्पर्धा परीक्षेबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समता सप्ताहाच्या उदघाटन कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह व निवासी शाळेचे विद्यार्थी, बार्टीचे समतादूत, समाज कल्याण विभाग, विविध महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले. संचालन शिक्षक प्रदीप ढवळे यांनी तर उपस्थितांचे आभार समतादूत शारदा कळसकर यांनी मानले.

Wednesday, 28 March 2018

रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप

     पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन येथे जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अंतिम धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, संशोधन अधिकारी गौतम वाकोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

      रमाई घरकूल योजनेचे लाभार्थी रविंद्र मेश्राम, सुनिल निंबेकर, हेमराज नंदेश्वर, कोमल डोंगरे, दिनबंधू भौतिक, सुषमा खांडेकर यांना अंतिम धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी समाज कल्याण कार्यालय, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मद्योग विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ आदी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वडेगावला आदर्श करणार - राजकुमार बडोले


आमदार आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ
       वडेगाव सुंदर झाले पाहिजे ही ग्रामस्थ व माझी इच्छा आहे. लोकप्रतिनिधी चांगले असले तर गावाच्या विकासाला गती मिळते. केवळ विकासकामे न करता गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम करुन वडेगावला आदर्श करणार. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      सडक/अर्जुनी तालुक्यातील वडेगाव/सडक येथे आमदार आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते 28 मार्च रोजी फलकाचे अनावरण करुन करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, जि.प.सदस्य शिला चव्हाण, माधुरी पाथोडे, माजी पं.स.सभापती कविता रंगारी, पदमा परतेकी, भाजपा तालुका अध्यक्ष विजय बिसेन, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, सरपंच हेमराज खोटेले, उपसरपंच छाया डोये यांची उपस्थिती होती.
      श्री.बडोले म्हणाले, गावातील तरुण एकत्र आले तर गावाच्या विकासाला गती मिळून गावाचा विकास नक्की होईल. ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेवून गावाच्या विकासाचे नियोजन करावे. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या विचाराचा आदर्श पुढे ठेवून ग्रामस्थांनी ग्रामविकासासाठी प्रयत्न केले तर विकासाला गती मिळेल. आदर्श गाव निर्मितीसाठी ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
      श्री.हत्तीमारे म्हणाले, वडेगाव हे गाव पालकमंत्र्यांनी दत्तक घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. गाव दत्तक घेतल्यामुळे वडेगावच्या विकासाला गती मिळेल. गावातील मुख्य समस्यांकडे ग्रामस्थांनी लक्ष्य देवून त्या सोडवणूकीसाठी त्यांनी पाठपुरावा करावा. ग्रामस्थांनी सहकार्य केले तर गाव नक्कीच आदर्श होईल असे त्यांनी सांगितले.
      श्री.कठाणे म्हणाले, वडेगाव हे गाव आमदार आदर्श ग्राम योजनेत घेण्यात आले आहे. वडेगावचे पालकत्व पालकमंत्र्यांनी स्विकारल्यामुळे या गावाच्या समस्या सोडविण्यास मदत होईल. ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
       कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य प्रमोद ब्राम्हणकर, सुरेश भेंडारकर, संजय मेंढे, अनिता मेंढे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक विठ्ठलराव कठाणे, बळीराम मेंढे, देवराव मुनीश्वर, श्रीमत मुनीश्वर, बाबुराव मेंढे, कंठीजी ब्राम्हणकर, वामन मुनीश्वर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      प्रारंभी पालकमंत्री बडोले यांनी वडेगाव/सडक प्रवेशद्वाराजवळ आमदार आदर्श ग्राम योजनेच्या फलकाचे अनावरण केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच हेमराज खोटेले यांनी केले. संचालन गिरीपाल फुले यांनी केले. उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक श्री.देशमुख यांनी मानले.
00000



Sunday, 25 March 2018

दिव्यांगांच्या आयुष्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री राजकुमार बडोले

                     दिव्यांग राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा व महोत्सवाचा समारोप

     दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले क्रीडा गुणांचे प्रदर्शन या स्पर्धेतून दिसून आले आहे. या क्रीडा स्पर्धेतून विविध खेळ प्रकारात विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी सुध्दा चांगले क्रीडा कौशल्य असल्याचे दाखवून दिले आहे. हे विद्यार्थी दिव्यांग जरी असले तरी त्यांच्या आयुष्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
     देवरी येथे 23 ते 25 मार्च दरम्यान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय पुणे व कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था देवरी यांच्या वतीने आयोजित दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा व महोत्सवाच्या समारोप प्रसंगी विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सुमन बिसेन, पं.स.सभापती सुनंदा बहेकार, अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे, भाजपा संघटन मंत्री विरेंद्र अंजनकर, नगरसेवक यादोराव पंचमवार, प्रविण दहीकर, रतन वासनिक यांची उपस्थिती होती.
      श्री.बडोले पुढे म्हणाले, दिव्यांग व्यक्तींसाठी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यात येईल. या प्रबोधिनीच्या माध्यमातून त्यांना चांगले प्रशिक्षण देण्यात येईल. भविष्यात हे विद्यार्थी ऑलंपीक स्पर्धेत कसे सहभागी होतील  यादृष्टीने आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    यावेळी कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे यांनीही विचार व्यक्त केले. पालकमंत्री बडोले यांना यवतमाळ जिल्ह्यातील पोफाळी येथील कला शिक्षक प्रल्हाद शिरुले यांनी काढलेल्या लुईस ब्रेल व हेलन केलर यांची चित्रे भेट म्हणून देण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. मुकबधीर प्रवर्गात प्रथम- पुणे जिल्हा, द्वितीय- नागपूर जिल्हा, तृतीय- यवतमाळ जिल्हा. अस्थीव्यंग प्रवर्गात प्रथम- भंडारा जिल्हा द्वितीय- उस्मानाबाद जिल्हा, तृतीय- नागपूर जिल्हा. अंध प्रवर्गात प्रथम- अमरावती जिल्हा, द्वितीय- पुणे जिल्हा तृतीय- नागपूर जिल्हा. मतिमंद प्रवर्गात प्रथम- अमरावती जिल्हा, द्वितीय- नागपूर जिल्हा तृतीय- पुणे जिल्हा. बहुविकलांग प्रवर्गात प्रथम- नागपूर जिल्हा, द्वितीय- बुलढाणा जिल्हा, तृतीय- लातूर जिल्हा यांनी पारितोषिक पटकाविले.
    स्पर्धेत राज्यातून जवळपास 2500 विद्यार्थी व त्यांचे शिक्षक सहभागी झाले होते. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेला पालकमंत्री बडोले यांनी ट्रॉफी देवून सन्मानीत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी केले. संचालन जवाहर गाढवे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाला देवरी शहरातील, परिसरातील गावातील नागरिक तसेच खेळाडूंचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 24 March 2018

पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा - महादेव जानकर

लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियान


    पशुपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालनाचा जोडधंदा करुन स्वत:च्या आर्थिक परिस्थितीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करावी. असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
       पशुसंवर्धन विभागाच्या वतीने केंद्र पुरस्कृत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियानाअंतर्गत देवरी तालुक्यातील भर्रेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे 24 मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात श्री.जानकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती विद्या खोटेले होत्या. यावेळी पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ.संजय गायगवळी, जि.प.पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शहारे, जि.प.पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजेश वासनिक, पशुधन विकास अधिकारी डॉ.विजय कोळेकर, तहसिलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी श्री.हिरुळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       श्री.जानकर पुढे म्हणाले, राज्य व केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत अनेक योजना आहेत, त्या योजनांचा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. गोंदिया हा तलावांचा जिल्हा आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून माशाची शेती करावी. ग्रामीण भागातील नागरिकांनी कुक्कुटपालन व्यवसाय करावा. शेतकऱ्याचा मुलगा उद्योगपती कसा बनेल यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. मुला-मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होत नाही असे सांगून ते पुढे म्हणाले, पशुसंवर्धन विभागातील रिक्त असलेली पदे लवकरात लवकर कशा पध्दतीने भरता येतील यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लाळ खुरकूत हा गाई/म्हशींमध्ये विषाणूमुळे होणारा सांसर्गीक रोग आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. लसीकरणामुळे पशुधनाचा लाळ खुरकूत या सांसर्गीक रोगापासून बचाव होतो. त्यामुळे उत्पादनाचे सातत्य टिकून राहते व रोगमुक्त पशुजन्य उत्पादनाची निर्यात सुलभ होते. सर्व शेतकऱ्यांनी एफ.एम.डी.सी.पी. अंतर्गत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
      डॉ.शहारे म्हणाले, जिल्ह्यातील संकलीत दूधाकरीता मार्केटींगची आवश्यकता आहे. या लसीकरण अभियानाचा सर्व गोपालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.
      प्रास्ताविकातून डॉ.वासनिक म्हणाले, जनावरांचे लाळ खुरकूत रोगापासून संरक्षण करण्यासाठी त्यांचे वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे गावातील सर्व जनावरांचे लसीकरण एकाच दिवशी केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. लसीकरण शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी उशीरा म्हणजेच थंड वातावरणात करावे. लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसमात्रा पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध आहेत. त्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले.
       कार्यक्रमाला पशुधन विकास अधिकारी डॉ.रोहिणी साळवे, डॉ.सायली तगारे, सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ.सुनिल आकांत, डॉ.वानखेडे, डॉ.चौधरी, डॉ.येडेवार, पशुधन पर्यवेक्षक डॉ.पदम,  ग्रामपंचायत सदस्य गीता पंधरे, ग्रामसेवक एस.एस.सिरसाम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम रहिले व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ.येडेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार पशुधन विकास अधिकारी डॉ.कोळेकर यांनी मानले.