जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 8 December 2017

व्याघ्र प्रकल्पालगतची गावे जन-वनमधून विकासाच्या वाटेवर



      नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे जिल्ह्याचे वैभव असून निसर्गाने या जिल्ह्याला दिलेली ही एक देणगीच आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील 656.36 चौ.कि.मी. क्षेत्रात विस्तारलेल्या पाच संरक्षीत क्षेत्राचा समावेश  12 डिसेंबर 2013 मध्ये करुन याला नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य, नविन नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्य या संरक्षीत क्षेत्राचा समावेश आहे. या व्याघ्र प्रकल्पाला लागून 1241.27 चौ.कि.मी. बफर झोन क्षेत्र आहे.
      व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांचा सर्वांगीण विकास करुन मानव व वन्यजीवांचे सहजीवन प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने वन्यजीव विभाग गोंदियाच्या वतीने डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्यात येत आहे. बफर क्षेत्रातील गावातील ग्रामस्थ हे जळावू लाकुड, पाळीव जनावरांचा चारा, घरगुती व शेतीच्या कामाकरीता लागणारे लहान लाकुड आणि रोजगार आदी दैनंदिन गरजांसाठी वनांवर अवलंबून आहेत. या अवलंबित्वामुळे वनांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे. बफर क्षेत्रातील गावे जंगलव्याप्त असल्याने तेथे     मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत आहे. या गावातील जन, जल, जंगल आणि जमीन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून गावकऱ्यांचे वनांवरील अवलंबित्व कमी करणे, उत्पादकता वाढविणे, शेतीला पुरक जोडधंदे निर्माण करणे, पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देणे यामधून मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी ग्रामस्थांच्या सहभागातून वन व वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी संरक्षीत क्षेत्रालगतच्या गावात डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावे, राष्ट्रीय उद्यान/अभयारण्यातील व त्याचे सीमेपासून 2 कि.मी.च्या आत येणाऱ्या गावांव्यतिरिक्त भारतीय वन्यजीव संस्थान यांनी निश्चित केलेल्या वन्यप्राणी भ्रमणमार्गामधील गावे, अभयारण्ये/राष्ट्रीय उद्यानामधून पुनर्वसन झालेली गावे तसेच ग्रामवनांचा समावेश करण्यात आला आहे.
        या व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत असलेल्या नागझिरा अभयारण्य, पिटेझरी व उमरझरी नविन नागझिरा वन्यजीव अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान (पार्क), डोंगरगाव-नवेगाव वन्यजीव अभयारण्य, बोंडे-नवेगाव वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्य या वनपरिक्षेत्राचा समावेश आहे. मागील दोन वर्षात एकूण 84 ग्राम परिस्थितीकी विकास समित्यांची स्थापना या वनपरिक्षेत्राअंतर्गत करण्यात आली आहे. या वर्षात आणखी 13 गावात हया समित्या स्थापन करण्यात येत आहे. या समित्यामार्फत 6864 कुटूंबांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले तर 4756 कुटूंबांना सिलेंडरचा पुरवठा देखील केला आहे. वनावरील रोजगारानिमित्त असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी 246 कुटूंबांना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात आले. वन्यप्राणी शेतातील विहीरीत पडून त्यांचा मृत्यू होवू नये यासाठी 369 विहिरींना संरक्षीत कठडे बसविण्यात आले आहे. 228 कुटूंबांना सोलर कंदीलचा पुरवठा, वन्यप्राण्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी 359 शेतकऱ्यांच्या शेताला सौर कुंपन, 1152 कुटूंबाकडे शौचालये, 28 तलाव खोलीकरणाची कामे, गॅस कनेक्शन दिलेल्या कुटूंबापैकी 2837 कुटूंबांना किचन ओटे व 3189 घरी स्वयंपाकासाठी निर्धुर चुली दिल्या आहेत.
     गावकऱ्यांचे वनांवरील अवलंबित्व कमी करण्यासोबतच शेतीपुरक जोडधंदे निर्माण करणे यासह पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देण्यावर डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेतून भर देण्यात आला आहे. ग्राम परिस्थितीकी विकास समित्यामधील 79 युवकांना मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील अशोक लेलॅन्ड कंपनीत वाहन चालक प्रशिक्षण केंद्रात, कोल्हापूर येथील वेल्डींग    इलेक्ट्रीक प्रशिक्षण आणि 4 मुलींना अमरावती येथे हेल्थ केअरचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. बफर क्षेत्रातील गावातील 454 युवकांना निसर्ग संवेदना व स्वयंरोजगार शिबिरामधून प्रशिक्षीत करण्यात आले आहे. 90 महिलांना लाखेपासून बांगड्या तयार करण्याचे प्रशिक्षण देवून स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षीत करण्यात आले आहे.
        परसोडी येथे शिक्षीत युवकांना नोकरीच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी ग्रंथालय सुरु केले आहे. ग्राम परिस्थितीकी विकास समिती आतेगाव मार्फत 6500 क्विंटल सेंद्रीय तांदुळाचे उत्पादन करुन विक्री करण्यात आली आहे. या समित्यांमार्फत 12 अभ्यास दौरे काढण्यात आले. 2 कोटी आणि 4 कोटी वृक्ष लागवडीत देखील या समित्यांनी सहभाग घेवून वृक्षांची लागवड केली. सन 2017-18 या वर्षात वनालगतच्या 93 गावातील 100 टक्के कुटूंबांना गॅस कनेक्शन देण्यासाठी वनसंरक्षक तथा संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र कार्यालयाला 1 कोटी 93 लक्ष 68 हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे.
       नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विशेष प्रशिक्षीत 168 वनरक्षक आणि वननिरिक्षक यांचा समावेश असलेले विशेष व्याघ्र संरक्षण दल कार्यरत आहे. व्याघ्र प्रकल्पातील तणससदृश्य वनस्पती निर्मुलनाची कामे करण्यात येत आहे. वन्यप्राण्यांना पाण्यांचे स्त्रोत उपलब्ध करुन देण्यासाठी पाणवठ्यांची दुरुस्ती करण्यासोबतच बोअरवेलला सोलर पंप बसविण्याची कामे करण्यात येत आहे. ग्राम परिस्थितीकी विकास समित्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत आहे.

     डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेच्या अंमलबजावणीमुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रालगतच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या गावाच्या विकासाला गती मिळाली आहे. या योजनेमुळे मानव व वन्यजीवन प्रस्थापित होण्यासोबतच वनावरील अवलंबीत्व कमी होण्यास मदत झाली आहे. स्थानिकांना पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देण्यास ही योजना उपयुक्त ठरत आहे.

Tuesday, 5 December 2017

मुर्रीत होणार मुलांचे वसतिगृह, बांधकाम तातडीने सुरु करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

     गोंदिया शहरात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जमाती व अपंग प्रवर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा निवाऱ्याचा व भोजनाचा प्रश्न सुटावा यासाठी गोंदिया जवळील मुर्री येथे 250 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह मंजूर झाले असून निधीही प्राप्त झाला आहे. तरी या वसतिगृहाचे बांधकाम तातडीने वेळेत पूर्ण करा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
      जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 4 डिसेंबर रोजी शासकीय वसतिगृह व निवासी शाळांसाठी जमीन संपादनाचा आढावा घेतांना श्री.बडोले बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, उपवनसंरक्षक एस.युवराज, समाजकल्याणचे सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, जि.प.सदस्य श्री.सोनवाने, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तहसिलदार रविंद्र चव्हाण, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      पालकमंत्री म्हणाले, 10 कोटी रुपये खर्च करुन अत्यंत चांगली इमारत शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी उपलब्ध होणार आहे. या वसतिगृहात राहून आपल्या जिल्ह्यातील मुले शिक्षण घेणार आहे. भविष्यात ती मोठ्या पदावर सुध्दा जाणार आहे. केवळ विरोध करुन बांधकाम थांबविणे अत्यंत चुकीचे आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रासाठी आपण जर विरोध करीत असू तर चांगला संदेश समाजात जाणार नाही. अत्यंत परिश्रमपूर्वक इथले वसतिगृह मंजूर करुन घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्त लावून वसतिगृहाचे काम सुरु करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

      मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह तिरोडा, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्जुनी/मोरगाव, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह देवरी आणि मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सडक/अर्जुनी येथील जमिनीसाठी लवकरच वन विभागाकडून जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मंजूरीपत्र देणार असल्याचे उपवनसंरक्षक एस.युवराज यांनी यावेळी सांगितले.

Monday, 4 December 2017

बळीराजासाठी संरक्षीत सिंचनाची सुविधा : 1041 सिंचन विहिरींची कामे पूर्ण

       जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. बिघडत्या पर्यावरणाचे परिणाम शेतीवर सुध्दा होत आहे. शेती हा व्यवसाय मुख्यत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्याने दगा दिल्यास शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचनाची सुविधाच तारु शकते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेवून पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यांसाठी 11 हजार धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम सन 2016-17 या वर्षात राबविण्यात आला. त्याअंतर्गत जिल्ह्याला 2000 विहिरी तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी 1041 विहिरींची कामे पूर्ण होवून 537 विहिरींची कामे प्रगतीपथावर आहे.
    अपुऱ्या व अनियमीत पावसामुळे गेल्या काही वर्षापासून राज्यात सातत्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरुपात मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येते. गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. साडेतीनशे वर्षापूर्वी मालगुजारांनी सिंचनाची व्यवस्था म्हणून तलाव बांधले. आज हे तलाव गाळाने भरल्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाली आहे. जिल्ह्यात भूगर्भात पाण्याची उपलब्धता असूनही संरक्षीत सिंचनासाठी विहिरींची संख्या कमी आहे. शेतकऱ्यांना बारमाही पिके घेण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
      जिल्ह्यात सन 2016-17 या वर्षात शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचनाची व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी 2000 विहिरी तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी 1578 विहिरीची कामे सुरु करण्यात आली. 358 विहिरीमध्ये बोअर करण्यात आल्या तर 683 विहिरीमध्ये बोअर करण्यात आलेल्या नाहीत. अश दोन्ही मिळून 1041 विहिरी तयार करण्यात आल्या. 537 विहिरीची कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील सर्व आठही पंचायत समित्यांकडे एकूण 26 कोटी रुपये निधी दिला. त्यापैकी 21 कोटी 85 लक्ष 51 हजार रुपये निधी विहिरीच्या कामावर खर्च करण्यात आला.

      ज्या शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरले. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनेतून लाभ घेतला आहे अशांना या योजनेतून वगळण्यात आले. दोन अथवा तीन लाभार्थ्यांनी त्यांची जमीन सलग असल्यास व त्यांनी सामुदायिक विहिरीची मागणी केली तर ते सामुदायिकरित्या विहीर मिळण्यास पात्र ठरले. पाण्याचा वापर व पाण्याची हिस्सेदारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करारही करुन काही शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचनाची सुविधा या योजनेतून उपलब्ध होणार असल्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करणारा शेतकरी आता दोन किंवा तीन पिके घेणार आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

क्रीडा स्पर्धेतून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना - उषा मेंढे

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा
                                     
       दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याच प्रकारच्या कल्पकता नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा हया त्यांच्या सुप्त गुणांना चालना देणाऱ्या आहेत. असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
      3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचे उदघाटन कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आले. यावेळी उदघाटक म्हणून श्रीमती मेंढे बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य सीमा मडावी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची उपस्थिती होती.
      श्रीमती मेंढे म्हणाल्या, दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांनी अशाप्रकारचे शिक्षण दयावे की त्यांच्या मनातील आपण दिव्यांग असल्याचा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल. त्यांच्या पालकांना सुध्दा वाटले पाहिजे की माझी मुले दिव्यांग असून सुध्दा शाळांमधून चांगले शिक्षण घेत आहे, असे त्या म्हणाल्या.
     श्रीमती मडावी म्हणाल्या, दिव्यांग मुले-मुली शारिरीकदृष्ट्या दिव्यांग असले तरी त्यांनी मनाने आपण दिव्यांग नाही ही भावना ठेवावी. सर्वसामान्य लोकांसारखेच आम्ही देखील आहोत अशाप्रकारची भावना दिव्यांग बांधवांमध्ये असली पाहिजे. मन सुदृढ असले आणि विचार चांगले असतील तर कोणत्याही दिव्यंगत्वावर मात करता येते असे त्यांनी सांगून विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
     श्री.बरकते म्हणाले, कुठलेही दिव्यंगत्व हे शरीरात असणे हे यश संपादन करण्यासाठी अडसर ठरु शकत नाही. युपीएससीच्या परीक्षेत उल्हासनगर येथील श्रीमती प्रांजल पाटील हया दोन्ही डोळ्यांनी आंधळ्या असून देखील त्या आयएएस बनल्या. त्या आपल्यासाठी आदर्श आहेत. त्या मुंबईत शिक्षण घेत असतांना लोकल ट्रेनने एकट्या महाविद्यालयात जायच्या. त्यांनी अपंगत्वावर मात करुन यश संपादन केले. शारिरीक आणि मानसिक अपंगत्व ज्या विद्यार्थ्यांमध्ये आहे त्यांनी आपल्या बुध्दीने त्यावर मात करावी असेही ते म्हणाले.
      क्रीडा स्पर्धेत मंगलम मुकबधीर शाळा गोंदिया, डी.पी.पटेल मतिमंद मुलांची शाळा गोंदिया, मानवता मतिमंद मुलांची शाळा आमगाव, दंडकारण्य निवासी अपंग विद्यालय सडक/अर्जुनी व देवरी, श्रीराम मतिमंद निवासी शाळा गोंदिया, ज्ञानदिप मतिमंद मुलांची शाळा गोरेगाव, स्व.जमुनाबाई निवासी मतिमंद विद्यालय उमर्रा येथील 250 विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये धावणे 50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर, गोळा फेक, थाळी फेक, उंच उडी, लांब उडी, स्पॉट जम्प, बादलीत बॉल टाकणे, भराभर चालणे आदी क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांनी मानले.

Saturday, 2 December 2017

सुरक्षा दौडमुळे मुलांमध्ये विश्वासाचे वातावरण आणि प्रगतीची संधी - आ.गोपालदास अग्रवाल

सुरक्षा दौडचा समारोप व पारितोषिक वितरण

        नक्षलवाद संपवायचा असेल तर शासनाप्रती विश्वास निर्माण करण्याचे काम सुरक्षा दौडच्या माध्यमातून होत आहे. गोंदिया पोलीस दलाने सुरक्षा दौड हा आगळावेगळा नाविण्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केला आहे. या दौडमुळे जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना प्रगतीची संधी देखील उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन विधीमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
      गोंदिया पोलीस दलाच्या वतीने नक्षलग्रस्त क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांचे खेळांमध्ये करियर घडविण्यासाठी आयोजित सुरक्षा दौड कार्यक्रमाचा समारोप व बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी आमदार अग्रवाल मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूरचे संचालक राहूल पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष डी.यु.रहांगडाले यांची उपस्थिती होती.
       आमदार अग्रवाल यावेळी म्हणाले, गावाच्या विकासासाठी आणि आदिवासींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पोलीस व प्रशासन काम करीत आहे. नक्षलग्रस्त आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना एक चांगली संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना धावण्याच्या स्पर्धेत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळावे यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षण भविष्यात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या इमारती व पोलिसांसाठी शासकीय निवासस्थाने झाली पाहिजे यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांनी पुढाकार घेतल्याचे सांगून श्री.अग्रवाल म्हणाले, आज त्यांच्याचमुळे पोलीस विभागाच्या विकासाला चालना देण्याचे काम होत आहे. पोलिसांशिवाय सर्वांना न्याय मिळू शकत नाही. आनंदाने जगता येत नाही. यासाठी पोलिसांची गरज असल्याचे सांगून श्री.अग्रवाल म्हणाले, लवकरच जिल्ह्यातील पोलिसांसाठी चांगले शासकीय निवासस्थाने बांधण्यात येणार आहे. एकीकडे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी खेळामध्ये प्रगती करीत असले तरी त्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. तसेच त्यांना रोजगार देणारे शिक्षणसुध्दा मिळावे यासाठी तंत्रनिकेतन विद्यालय, नर्सिंग कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय यासारख्या संस्था आपण मोठ्या प्रयत्नातून मिळविल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री.ठाकरे म्हणाले, आदिवासी दुर्गम नक्षलग्रस्त भागातील मुलांचे पोलिसांबाबतचे अंतर या दौडमुळे कमी होण्यास मदत झाली आहे. पोलिसांचा संबंध हा गुन्हेगारीला आळा घालणे याबाबत येतो. मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलिसांनी सामाजिक बांधीलकी जोपासल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा कायम राहणार आहे. गोंदियासारख्या आदिवासी नक्षलग्रस्त दुर्गम भागात सुध्दा चांगल्या पध्दतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे. भविष्यात आणखी चांगले शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    श्री.पाटील म्हणाले, पोलिसांसाठी सोशल पोलिसींग ही अवघड बाब असतांना जिल्ह्यात सोशल पोलिसींगच्या माध्यमातून नक्षलगस्त व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा दौडचे आयोजन करुन पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांनी चांगला पायंडा घातला असून त्यात ते यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
      प्रास्ताविकातून बोलतांना डॉ.भूजबळ म्हणाले, सुरक्षा दौड सहा क्रीडा प्रकारामध्ये आणि चार वयोगटामध्ये घेण्यात आली. जवळपास 7 हजार मुला-मुलींनी यामध्ये सहभाग घेतला. जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याचा उद्देश नक्षलग्रस्त भागातील नागरिकांचा व आदिवासी बांधवांचा विकास झाला पाहिजे हा आहे. याच दृष्टीकोनातून केंद्र आणि राज्य सरकार आणि त्यांच्या यंत्रणा काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
       नक्षलग्रस्त भागातील नागरिकांची शासन व प्रशासनाबाबत एक विश्वासाची भावना निर्माण व्हावी हाच पोलिसांचा उद्देश असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, या भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम या सुरक्षा दौडच्या माध्यमातून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 15 पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून देखील आदिवासी नक्षलग्रस्त भागातील मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यात येत असून या केंद्रातून आतापर्यंत 1 पोलीस उपनिरीक्षक आणि 121 पोलीस कॉन्स्टेबल पोलीस दलात भरती झाले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांची जडणघडण चांगली व्हावी, त्यांच्या करियरला दिशा देण्याचे काम या सुरक्षा दौडच्या यशस्वी आयोजनातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
     यावेळी मान्यवरांच्या हस्ते धावण्याच्या सहा क्रीडा प्रकारामध्ये आणि चार वयोगटातील यशस्वी मुला-मुलींना पदक, प्रमाणपत्र व साहित्य देण्यात आले. यावेळी सडक/अर्जुनी वसतिगृहाच्या मुलींनी आदिवासी नृत्य, तिरोडा तालुक्यातील भजेपार येथील विक्तुबाबा दंडार समुहाने दंडार सादर केली. कार्यक्रमाला श्रीमती भूजबळ, श्रीमती ठाकरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) दिपाली खन्ना, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, राजीव नवले यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. समारोप कार्यक्रमाला जिल्ह्यातील सहभागी आश्रमशाळा, शाळा व वसतिगृहाचे विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक, अधीक्षक, पालक, पोलीस मित्र, पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार श्री.मेश्राम यांनी मानले.

Friday, 1 December 2017

पुस्तके वाचण्यासारखा आनंद नाही - डॉ.हरिश्चंद्र बोरकर

     आजचे युग हे स्पर्धेचे आहे. स्पर्धेच्या युगात जो कठोर मेहनत घेईल तोच यशस्वी होतो. ग्रंथांमुळे जीवनाला दिशा मिळते. विविध क्षेत्राचे लिखाण आज ग्रंथाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. जीवन जगत असतांना माणसाला पुस्तके वाचण्यासारखा आनंद कुठेच मिळत नाही. असे प्रतिपादन झाडीबोलीचे ज्येष्ठ साहित्यीक डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी केले.
     जिल्हा ग्रंथालय अधिकारी व श्री शारदा वाचलनालयाच्या वतीने आयोजित दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचा समारोप शारदा वाचनालयाच्या बजाज सभागृहात 30 नोव्हेंबर रोजी झाला. यावेळी समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.बोरकर बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांची उपस्थिती होती.
     डॉ.बोरकर म्हणाले, अभ्यासक्रमाची पुस्तके आणि वाचनाची पुस्तके यामध्ये फरक आहे. अभ्यासक्रमाची पुस्तके वाचतांना ती आपण आवडीने वाचत नाही. जी पुस्तके वाचण्याची असतात ती पुस्तके वाचतांना माणसाला आनंद मिळतो. ग्रंथ वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. ग्रंथसंपदा ही माणसाच्या विकासाला चालना देण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
     डॉ.निमगडे म्हणाले, आज माणसे वैचारीक जडणघडणीपासून दूर जात असतांना ग्रंथालयातील विचार आपल्याला दिशा देण्याचे काम करते. ग्रंथ वाचनातून माणसाचे विचार प्रगल्भ होण्यास मदत होते. जीवनाला योग्य वळण देण्यासाठी ग्रंथ महत्वाचे आहे. नव्या पिढीने सुदृढ मनासाठी ग्रंथाचे वाचन केले पाहिजे. अनेक ग्रंथातील कथा हया प्रेरणादायी असतात. व्यक्तीमत्व घडविण्याचे कामही ग्रंथ करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री.जवंजाळ म्हणाले, आपल्या बालवयापासून ते आजच्या जीवनापर्यंत ग्रंथाने काय भूमिका बजावली हे आपल्या लक्षात येईल. विविध प्रकारचे साहित्य हे व्यक्तीमत्व घडविण्यास मदत करते. करियर निवडतांना देखील ग्रंथाचा उपयोग होतो. अलिकडे ग्रंथाचे स्वरुप बदलले आहे. डिजीटल स्वरुपात ग्रंथ उपलब्ध झाले आहे. आपल्याला आवड निर्माण करणारे ग्रंथ वाचले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

    कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, श्री.रहांगडाले, श्री.चौरागडे यांचेसह अनेक पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील ग्रंथालयाचे अध्यक्ष, सचिव, ग्रंथपाल व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे संचालन विनायक अंजनकर यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले. 

करियरसाठी स्पर्धेचे आव्हान स्विकारा - संदिप जाधव

      आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगात पुढे जायचे असेल तर वाचनाची आवड महत्वाची आहे. स्पर्धेचे आव्हान स्विकारुन कठोर परिश्रमातून आपले जीवन उज्ज्वल करावे. असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव यांनी केले.
   जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री शारदा वाचनालयाच्या संयुक्त वतीने बजाज सभागृहात 30 नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सवानिमित्ताने आयोजित ‘स्पर्धा परीक्षा एक आव्हान’ या मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन श्री.जाधव बोलत होते. वक्ते म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणे व स्टडी सर्कल शाखा गोंदियाचे संचालक श्याम मांडवेकर उपस्थित होते.
     श्री.जाधव पुढे म्हणाले, अथक परिश्रमाशिवाय यश प्राप्त होत नाही. त्यासाठी अभ्यासाची आवड व आत्मविश्वास बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. जीवनात कुठलेही क्षेत्र हे लहान-मोठे नसते. कुठलेही क्षेत्र निवडतांना धरसोडपणा करु नये. इच्छा असेल तर मार्ग निश्चित निघतो. प्रत्येकाने आपआपल्या पध्दतीने अभ्यास करावा. ध्येय निश्चित करा, यश आपल्याला निश्चितच मिळेल असे त्यांनी सांगितले.
    श्री.बरकते म्हणाले, आपल्याला काय बनायचे आहे हा उद्देश अगोदर निश्चित करुन विद्यार्थ्याने शिक्षण घ्यावे. जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर निश्चितच ध्येय पूर्ण होते. विद्यार्थ्याने कधीही हार मानू नये, कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. ग्रामीण भागात ज्ञान देण्याचे काम वाचनालये करतात. वाचनालयात बरेचशी पुस्तके उपलब्ध असतात. यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वाचनालयात जावून अभ्यास केला पाहिजे. आत्मविश्वास ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर निश्चितच यश आपल्या पदरात पडेल असे त्यांनी सांगितले.
      श्री.कोकणे म्हणाले, आधीच्या काळात शिक्षण घेतले की नोकरी मिळत होती. आता युग बदलले आहे. हे युग स्पर्धेचे आहे. दिवसेंदिवस स्पर्धा वाढतच चालली आहे. स्पर्धेत उतरण्यासाठी अवांतर वाचन व कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. यश संपादन करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे. हे युग स्पर्धेचे असल्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तीव्रता ओळखली पाहिजे. प्रत्येकाने आपले लक्ष्य निर्धारित करुन स्पर्धा परीक्षेची तयारी करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       श्री.मांडवेकर म्हणाले, कोणतेही आव्हान असेल तर त्याला सामोरे जाण्याचे आपल्यामध्ये सामर्थ्य असले पाहिजे. बहुतेक विद्यार्थ्यांमध्ये नियोजनाचा अभाव असतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वृत्तपत्रांचे वाचन, शासनाचे लोकराज्य मासिक, सामान्य ज्ञान पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेवून अभ्यास केला तर ध्येय निश्चितच साध्य करता येते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबाबत विस्तृत माहिती दिली.

    यावेळी उपस्थित काही विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत प्रश्न विचारले असता मान्यवरांनी त्यांच्या प्रश्नांचे योग्यप्रकारे निराकरण केले. कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल, विद्यार्थी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य विनायक अंजनकर यांनी मानले.