जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 24 August 2017

कर्जमाफीबाबत तातडीने कार्यवाही करा - पालकमंत्री बडोले

       राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. येत्या 15 सप्टेबर पर्यंत कर्जमाफीबाबतची कार्यवाही प्रशासनाने पूर्ण करावी. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
        जिल्हाधिकारी कार्यालयात 24 ऑगस्ट रोजी कर्जमाफी व पीक परिस्थितीच्या आढावा सभेत पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.टी.शिंदे, जिल्हा अग्रणी प्रबंधक दिलीप सिल्हारे, सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक मिलींद आटे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वश्री गेडाम, ढोरे, छप्परघरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      श्री.बडोले पुढे म्हणाले, ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र, सी.एस.सी.सेंटर या केंद्रावरुन शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज व्यवस्थीत भरण्यात यावे. यासाठी कृषि, महसूल व ग्रामपंचायत विभागाने काळजीपूर्वक काम करावे. कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधारकार्ड काढलेले नाही त्यांचे आधारकार्ड काढण्याची कार्यवाही करावी. 15 सप्टेबर पूर्वी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       जिल्ह्यात धानाचे 40 टक्के नुकसान झाल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी धान रोवणी केलेली नाही असे शेतकरी, कमी पावसामुळे मध्यम व उच्च प्रतीच्या धानाचे नुकसान झालेले शेतकरी यांची स्वतंत्र यादी तयार करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करता येईल. ज्या शेतकऱ्यांच्या धानपिकाचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना दुसरे पीक म्हणून उडीद, मुंग याची लागवड करण्यासाठी बियाणे उपलब्ध करुन देण्यास मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जेवढ्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑफलाईन अर्ज केले आहेत त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. सिंचनासाठी शेतीला 12 तास वीजपुरवठा करण्यात येईल व कोणत्याही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार नाही असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
      यावर्षी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, जिल्ह्यात असलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्यातील पाणी अडविण्यासाठी बंधाऱ्यात 8 दिवसाच्या आत पाट्या लावण्यात याव्या. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावात पाणीसाठा व्यवस्थीत राहील याचे नियोजन करावे. तसेच जिल्ह्यात उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. त्यामुळे शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्यास मदत होईल. ज्या प्रकल्पांचा भूसंपादन निधी उपलब्ध झाला आहे त्याचे वाटप संबंधित शेतकऱ्यांना तातडीने करावे व अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प वेळीच पूर्ण करण्याचे नियोजन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      जिल्हाधिकारी काळे यावेळी म्हणाले, कर्जमाफीच्या दृष्टीने जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राने 10 अर्ज प्रती दिवस ऑनलाईन करावे असे त्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. महसूल, कृषि व ग्रामपंचायत विभागाच्या योग्य समन्वयातून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 सप्टेबर पूर्वीच पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

       जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री.इंगळे यांनी जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस व धानाची रोवणी याबाबतची माहिती दिली. जिल्हा अग्रणी प्रबंधक श्री.सिल्हारे यांनी मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुण-तरुणींना कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत व बेरोजगारांच्या तक्रारी येणार नाहीत यादृष्टीने बँकांनी या योजनेसाठी काम करावे अशा सूचना बँकांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सभेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्री.वासनिक, सहायक निबंधक श्री.गोस्वामी यांचीही उपस्थिती होती.

Saturday, 19 August 2017

जात वैधता प्रमाणपत्र बाबतच्या अडचणी दूर करणार - राजकुमार बडोले

जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम



          सर्वसामान्य जनतेला जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अनेक अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      19 ऑगस्ट रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह गोंदिया येथे जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप सामाजिक न्याय मंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त देवसुदन धारगावे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा संधोधन अधिकारी गौतम वाकोडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.बडोले यावेळी म्हणाले, पुर्वी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी नागपूरला जावे लागत असे. परंतू आता प्रत्येक जिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्र समिती कार्यान्वीत झाल्यामुळे हा त्रास कमी झाला आहे. राज्यातील वैद्यकीय व इंजिनियरींग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्रलंबीत राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून येत्या आठ दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
      यावेळी सामाजिक न्याय मंत्री बडोले यांच्या हस्ते रोशनी भुरे व कल्याणी चिखलोंढे या विद्यार्थीनींना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अंतर्गत 12 वी विज्ञान-768, व्यावसायीक अभ्यासक्रम-5 व निवडणूक विषयक-4, असे एकूण 777 जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त देवसुदन धारगावे यांनी केले. संचालन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा संधोधन अधिकारी गौतम वाकोडे यांनी केले, उपस्थितांचे आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून होणार आज प्रक्षेपण

मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात
घर विषयक प्रश्नांना उत्तरे
राज्यातील जनतेला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाच्या ‘सर्वांसाठी परवडणारी घरे’ या विषयावरील पहिल्या भागाचे उद्या रविवार २० ऑगस्ट २०१७ रोजी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारण होणार आहे.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे निर्मित या कार्यक्रमाचे प्रसारण रविवार २० ऑगस्ट २०१७ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी, झी चोवीस तास आणि साम टीव्ही या वाहिन्यांवरून सकाळी दहा वाजता होईल. याच कार्यक्रमाचे पुन:प्रसारण सोमवार दि. २१ ऑगस्ट २०१७ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सायंकाळी साडेपाच वाजता होईल. आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून सोमवार दि. २१ ऑगस्ट आणि मंगळवार दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी  ७ वाजून २५ मिनिटांनी प्रसारण होईल.                               
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कसा मिळेल? संक्रमण शिबिरात राहणाऱ्या कुटुंबांचे कायम स्वरूपी पुनर्वसन होईल का? भोगवटा प्रमाणपत्राच्या अडचणी व पद्धती सुलभ करणार का? पंतप्रधान आवास योजनेच्या घरांसाठी पात्रता काय? भूमिहीनांना घरकुलाचा लाभ कसा मिळेल? शबरी योजनेचे स्वरूप कसे आहे? अनधिकृत बांधकामे नियमित होणार का? खासगी इमारतींसाठी वाढीव एफएसआय मिळणार का?, अशा राज्याच्या विविध भागातून आलेल्या प्रश्नांबाबत राज्य शासन करीत असलेल्या व्यापक योजनांची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देताना या कार्यक्रमात दिली आहे.
          या कार्यक्रमाच्या चित्रिकरणाआधी ई-मेल आणि एसएमएसवरून लोकांकडून सर्वांसाठी परवडणारी घरे या विषयावर प्रश्न मागविण्यात आले होते. त्याला राज्याच्या विविध भागातील साधारण दहा हजाराहून अधिक लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी योजना, महारेरा, संक्रमण शिबिरे, म्हाडाची घरे, इमारतींचा पुनर्विकास, भोगवटा प्रमाणपत्र, धारावी पुनर्वसन प्रकल्प, बीडीडी चाळींचा पुनर्विकास अशा गृहनिर्माण विषयक मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले होते. यातील निवडक प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत.

Wednesday, 16 August 2017

पालकमंत्र्यांच्या हस्ते कालीमाटी व नवेगावबांध येथे भूमीपूजन



            अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील तीर्थस्थळ असलेल्या कालीमाटी येथे हनुमान मंदिराच्या सभा मंडपाचे भूमीपूजन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी 16 ऑगस्ट रोजी केले. यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, जि.प.सदस्य तेजूकला गहाणे, पं.स.सदस्य अर्चना राऊत, रामलाल मुंगनकर, माजी जि.प.सभापती प्रकाश गहाणे, उमाकांत ढेंगे, रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, कार्यकारी अभियंता श्री.ताकसांडे, उपविभागीय अभियंता श्री.देशमुख, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, दिनकरनगर सरपंच खोकन सरकार, प्रतापगड सरपंच इंदिरा वालदे, सुकडी सरपंच पंचशिला मेश्राम, तुकूम/नारायण सरपंच दयाराम शहारे, गोठणगाव सरपंच शकुंतला वालदे, व्यंकट खोब्रागडे, नूतन सोनवाने, आनंदराव तिडके, हरिचंद उईके, संदीप कापगते, विनोद नाकाडे, प्रकाश रहांगडाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी उपस्थित परिसरातील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांपुढे आपल्या विविध समस्या मांडल्या.

      नवेगावबांध येथील आंबेडकर नगरात जि.प.च्या समाजकल्याण विभागातील अनुसूचित जाती घटकांचा विकास कार्यक्रमांतर्गत गिताबाई सांगोडकर ते भिमराव लाडे यांच्या घरापर्यंतच्या 5 लक्ष रुपये खर्चातून बांधण्यात येणाऱ्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, पं.स.सदस्य गुलाब कोरेटी, रामलाल मुंगनकर, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, होमराज पुस्तोडे, नवल चांडक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आंबेडकर नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दोन वर्षात रस्त्यांची कामे पूर्ण करणार - पालकमंत्री बडोले

सिंदीपार येथे रस्त्याचे भूमीपूजन

               ग्रामीण भागाच्या विकासात रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. रस्त्यांमुळे विकासाला चालना मिळते. येत्या दोन वर्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतील. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       सडक/अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार येथे 16 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या वडेगाव ते सिंदीपार या साडेचार किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांनी केले. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य रमेश चुऱ्हे, पं.स.सदस्य इंदू परशुरामकर, गायत्री इरसे, राजेश कठाणे, सिंदीपार सरपंच जसवंता टेकाम, खोडशिवनी सरपंच अर्चना भैसारे, कोदामेडी सरपंच अनिता बडोले, वडेगाव सरपंच प्रभा बडोले, कार्यकारी अभियंता श्री.नंदनवार, श्री.ताकसांडे, नायब तहसिलदार अखिल मेश्राम यांची उपस्थिती होती.
      श्री.बडोले पुढे म्हणाले, रोजगार हमी योजनेतून पांदन रस्त्यांची कामे पूर्ण करुन या रस्त्यांच्या खडीकरणाची कामे सुध्दा करण्यात येतील. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी व शेतातील माल घरी व बाजारपेठेत आणण्यासाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी यासाठी बंधाऱ्याची साखळी तयार करण्यात येईल. बंधाऱ्याला पाट्या लावून पाण्याची साठवणूक करण्यात येईल. त्यामुळे शेतीला सिंचनासाठी या पाण्याची मदत होईल. सिंदीपार येथील शाळेसाठी वर्गखोल्या बांधून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जि.प.सदस्य श्री.चुऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. या रस्त्याच्या कामावर 1 कोटी 65 लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे वडेगाव ते सिंदीपार दरम्यानच्या गावांना रस्त्याची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.

     पालकमंत्र्यांनी खोडशिवनी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या खोडशिवनी ते सौंदड या 6.32 कि.मी. रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन केले. यावेळी जि.प.सदस्य रमेश चुऱ्हे, पं.स.सदस्य इंदू परशूरामकर, राजेश कठाणे, गायत्री इरले, ग्रामपंचायत सरपंच अर्चना भैसारे, उपसरपंच मनोहर परशूरामकर, कार्यकारी अभियंता श्री.नंदनवार, श्री.ताकसांडे, उपअभियंता श्री.देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी खोडशिवनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बफर क्षेत्राच्या गावातील सर्वच कुटूंबांना गॅस कनेक्शन देणार - राजकुमार बडोले

चिखली येथे गॅस कनेक्शनचे वाटप


          नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रामध्ये येणाऱ्या गावांच्या विकासासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांना देण्यात येईल. बफर क्षेत्रातील गावांचे इंधनासाठी वनावर असलेले अवलंबीत्व कमी करण्यासाठी सर्वच कुटूंबांना गॅस कनेक्शन देण्यात येईल. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       16 ऑगस्ट रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील चिखल ग्रामपंचायत येथे वन्यजीव विभागाच्या वतीने डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून गावातील कुटूंबांना गॅस कनेक्शनचे वाटप पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य माधुरी पातोडे, पं.स.सदस्य गिरीधारी हत्तीमारे, राजेश कठाणे, वन्यजीव विभागाच्या उपविभागीय वन अधिकारी गीता पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.राठोड, सरपंच सुधाकर कुर्वे, नायब तहसिलदार अखिल मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
        पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये काही गावांचा समावेश करण्यात आल्यामुळे त्या गावांच्या अडचणी वाढल्या आहेत. बफर क्षेत्रात गुरे चराई करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता कुरणांचा विकास करणे गरजेचे आहे. जंगलाच्या परिसरात असलेल्या शेतीला सौर कुंपन दिल्यास शेतपिकाची नासाडी वन्य प्राण्यांकडून होणार नाही. कोहमारा येथे घरगुती इंधनासाठी जळावू लाकडाचा डेपो सुरु करण्यात यावा. बांबू आधारित व्यवसाय करणाऱ्यांना बांबू उपलब्ध करुन दयावेत असेही ते यावेळी म्हणाले.
       श्रीमती पातोडे म्हणाल्या, या भागातील काही गावांचा समावेश बफर क्षेत्रामध्ये झाला आहे. त्यामुळे संबंधित गावातील ग्रामस्थांची वन व्यवस्थापन बाबतची जबाबदारी आता वाढली आहे. इंधनासाठी वनावर असलेले अवलंबीत्व कमी व्हावे यासाठी गॅस कनेक्शन वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
       श्री.हत्तीमारे म्हणाले, गावातील सर्वच कुटूंबांकडे गॅस कनेक्शन नसल्यामुळे वन विभागाने जळावू लाकडाची व्यवस्था करुन दयावी. जनवन योजनेच्या माध्यमातून गावातील मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करावे व आवश्यक असलेले पुस्तके उपलब्ध करुन दयावे. वन्यजीव विभागाने गावाच्या विकासासाठी सहकार्य करावे असे ते म्हणाले.
       श्रीमती पवार म्हणाल्या, जनवन योजनेच्या माध्यमातून बफर क्षेत्रातील गावाच्या विकासाला चालना मिळणार आहे. जंगलाचे व वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी बफर क्षेत्रातील ग्रामस्थांची वाढली आहे. विविध घटकातील कुटूंबांना गॅस कनेक्शनचा पुरवठा करण्यात येईल. या योजनेबाबत त्यांनी यावेळी विस्तृत माहिती दिली.
       पालकमंत्र्यांच्या हस्ते यादवराव मुनेश्वर या लाभार्थ्याला गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. यावेळी चिखली ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार गिरीधारी हत्तीमारे यांनी मानले.

भरती प्रक्रियेवरील निर्बंध उठविण्यास विशेष मंजूरी घेणार - पालकमंत्री बडोले


करंजी येथे आरोग्य उपक्रेंद्राचे लोकार्पण



         आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सेवा मिळाल्या पाहिजे. जिल्ह्यात आरोग्य विभागातील रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी भरती प्रक्रियेवरील निर्बंध उठविण्यासाठी शासनाकडून विशेष मंजूरी घेण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      15 ऑगस्ट रोजी आमगाव तालुक्यातील करंजी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानातून बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री बडोले यांनी केले, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, पं.स.सभापती हेमलता डोये, जि.प.सदस्य सुरेश हर्षे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, तहसिलदार साहेबराव राठोड, पं.स.सदस्य यशवंत बावनकर, सरपंच पंचफुला बागडे, उपसरपंच चंद्रसेन शेंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंदू वंजारी, उपअभियंता सुनील तरोणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रीराम शेंडे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष चेतराम हुकरे, श्रीमती जांभूळकर यांची उपस्थिती होती.
       पालकमंत्री बोलतांना पुढे म्हणाले, ग्रामीण भागात रस्त्यांची चांगली सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच विविध घटकातील लाभार्थ्यांना घरकूल, गॅस कनेक्शन वाटप अशा वैयक्तीक योजनांचा सुध्दा लाभ देण्यात येत आहे. ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गावे स्वच्छ व सुंदर झाली पाहिजे. गावाच्या विकासासाठी आपण सर्वोतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शाळेतील मुलांना शिक्षकांनी, पालकांनी मोठे स्वप्न दाखविले पाहिजे. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले पाहिजे, त्यामुळे ते जबाबदार नागरिक होवून पुढे येतील. करंजीची शाळा सौर ऊर्जेवर डिजीटल केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.
       शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, पाऊस कमी आल्यामुळे जिल्ह्यातील धान पिकाची स्थिती वाईट आहे. 50 टक्के रोवणी झालेली नाही, हलक्या धानाचेही नुकसान झाले आहे. 20 ऑगस्टपर्यंत पाऊस आला नाही तर शेतीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      श्रीमती मेंढे म्हणाल्या, हे आरोग्य उपकेंद्र लोकांच्या आरोग्य सेवेत इमारतीच्या लोकार्पणामुळे रुजू झाले आहे. त्यामुळे ही इमारत रुग्ण व बाळंतपणासाठी उपयुक्त ठरणार आहे. ग्रामपंचायतींना देण्यात आलेला 14 व्या वित्त आयोगाचा निधी विकास कामासाठी खर्च करुन विकास कामाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. गावातील प्रत्येक घरी शौचालय असले पाहिजे व त्याचा प्रत्येकाने नियमीत उपयोग केला पाहिजे. विकास कामात लोकांचा सहभाग महत्वाचा आहे असे त्या म्हणाल्या.
       आमदार पुराम म्हणाले, कोणताही व्यक्ती हा मुलभूत गरजांपासून वंचित राहू नये. आरोग्याची सुविधा असणे ही अत्यंत महत्वाची गरज आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर उपकेंद्राचे उदघाटन होत आहे ही भूषणावह बाब नाही. जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे शेतीची स्थिती भिषण आहे. शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दयावे असे सांगून ते म्हणाले, ज्या विभागात रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागांची भरती करण्याचे अधिकार शासनाने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्रीमती डोये व श्री.हर्षे यांचीही भाषणे झाली.

      पालकमंत्र्यांनी यावेळी जि.प.शाळेच्या सौर ऊर्जेवर आधारित असलेल्या डिजीटल क्लासरुमचे उदघाटन केले. उपकेंद्राचे बांधकाम करणारे कंत्राटदार लखन हरिणखेडे यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी केले. उपस्थितांचे आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंदू वंजारी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.