जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 10 July 2017

नगदी पिकासह सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दयावे - राजकुमार बडोले

                           जिल्हा नियोजन समिती सभा


       गोंदिया धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढीसाठी आता शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे वळण्यासोबतच जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रीय शेतीला चालना दयावी, यासाठी यंत्रणांनी त्यांना प्रोत्साहन दयावे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 10 जुलै रोजी आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा उषा मेंढे, आमदार सर्वश्री गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, प्रभारी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, उपवनसंरक्षक एस.युवराज, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.बडोले यावेळी म्हणाले, विविध यंत्रणांना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी देण्यात येतो. हा निधी योग्य नियोजनातून निर्धारित वेळेत खर्च होईल याची दक्षता घ्यावी. निधी समर्पित करण्याची वेळ यंत्रणांना येणार नाही याकडेही लक्ष दयावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा हप्ता 31 जुलै पुर्वी भरण्यास प्रोत्साहित करावे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 36 रिक्त पदे भरण्याची कार्यवाही बिंदू नियमावलीनुसार एका महिन्याच्या आत करावी. जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना वीज वितरण कंपनीने तातडीने वीज जोडणी करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
       जिल्ह्यातील ज्या शाळांच्या इमारतीचे बांधकाम अपुर्ण अवस्थेत आहेत त्यांची कामे तातडीने पूर्ण करावेत असे सांगून श्री.बडोले म्हणाले, मुलांना शाळेच्या खोल्या नसल्यामुळे बसण्यास अडचणी निर्माण होत आहे त्या अडचणी दूर कराव्यात. जिल्ह्यातील तालुका पातळीवर असलेल्या क्रीडा संकुलाच्या आवश्यक त्या दुरुस्त्या तातडीने करुन आवश्यक तेथे वीज दुरुस्तीची कामे सुध्दा करावी. जिल्ह्यातील पोंगेझरा, धम्मगिरी व कामठा या तीर्थक्षेत्राला क दर्जा मिळावा यासाठी नव्याने प्रस्ताव सादर करावे. जिल्ह्यातील चिचगड, पालांदूर, बघोली, लटोरी, कहाली, गोरेगाव व इतर अपुर्ण अवस्थेतील पाणीपुरवठा योजना तातडीने सुरु कराव्यात. आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेचा निधी तिरोडा व गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी वाढवून देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       ज्या ठिकाणी निकषानुसार राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांची आवश्कता आहे त्याठिकाणी बँक शाखा सुरु व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी व्यक्तीश: लक्ष घालून पाठपुरावा करावा असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालयासाठी 16 स्लाईडची सिटीस्कॅन मशीन खरेदी करण्याची कार्यवाही करावी. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये कामानिमित्त येणाऱ्या वृध्द, अपंग व गर्भवती महिलांना ये-जा करण्यासाठी लिफ्ट बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीमुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये कपात करण्यात आली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
      श्रीमती मेंढे म्हणाल्या, कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन दयावा. जिल्ह्यातील अंगणवाडी दुरुस्तीसाठी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रिया कक्षासाठी वातानुकूलित यंत्र बसविण्यासाठी व जिल्हा परिषदेला लिफ्ट बसविण्यासाठी निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीतून करुन दयावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
      आमदार अग्रवाल यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदे बिंदू नामावलीनुसार भरण्याची कार्यवाही, कामठा आश्रमाला तीर्थक्षेत्राचा क दर्जा पुन्हा दयावा, कमी करण्यात आलेला आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेचा निधी गोंदिया व तिरोडा मतदार संघासाठी वाढवून दयावा, वैद्यकीय महाविद्यालयासाठी नविन सिटीस्कॅन मशीन खरेदी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
       आमदार रहांगडाले यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आहे, त्या क्रीडा संकुलाची तातडीने दुरुस्ती करुन संकुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी. या इमारतीचा वापर खेळाडूसाठी झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
      आमदार पुराम म्हणाले, कचारगड ते हाजराफॉल या 5 कि.मी. अंतराच्या रोपवेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. दुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ककोडी येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडण्यात यावी. त्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय टाळता येईल असे ते म्हणाले.      
       जिल्हाधिकारी काळे यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 या वर्षात अनेक विभागाच्या तांत्रिक मान्यता उशिरा प्राप्त झाल्यामुळे निधी अखर्चीत राहिला तर यावर्षी योग्य नियोजनातून सर्व यंत्रणांचा निधी निर्धारित वेळेपूर्वीच खर्च करणार असल्याचे सांगितले.
       पुरातन वृक्षांचे जतन करणाऱ्या सालेकसा तालुक्यातील मोहाटोला येथील अनिता माहुले, रामाटोला येथील प्रेमलाल चौरके, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी येथील राजकुमार मानापूर, चोपराम आरसोडे, विनोद कापगते, पुष्पाबाई तिरपुडे, दुर्गा हातझाडे, तिडका येथील पुरुषोत्तम कापगते, कौशल्याबाई उके, देवराम मडावी व इब्राहिम पठाण या शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते आंबा, चिंच या वृक्षांचे संवर्धन करीत असल्याबद्दल एक हजार रुपये व दोन हजार रुपयाचे प्रोत्साहनात्मक अनुदान वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
      जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 या वर्षात सर्वसाधारण योजनेवर 97.78 टक्के, अनुसूचित जाती उपयोजनेवर 99.99 टक्के, आदिवासी उपयोजनेवर 98.3 टक्के आणि आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेवर 97 टक्के खर्च झाला आहे तर सन 2017-18 या वर्षात जून अखेर अनुसूचित जाती उपयोजनेवर 2.58 टक्के, आदिवासी उपयोजनेवर 54.32 टक्के, आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेवर 58.30 टक्के, तर सर्वसाधारण योजनेवर खर्च निरंक असून असा एकूण 42.74 टक्के खर्च झाला आहे. खर्चाची टक्केवारी 12.25 टक्के इतकी आहे.
      यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सेंद्रीय शेतीची चळवळ जिल्ह्यात प्रभावीपणे राबविता यावी यासाठी यापुढे कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ, पुष्पहार न देता सेंद्रीय तांदळाची पिशवी भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला असून आज उपस्थित सर्व मान्यवरांना जिल्हाधिकारी काळे यांनी तांदळाची पिशवी भेट म्हणून दिली. राज्य सरकारला सुध्दा त्यांनी अशाच प्रकारचा प्रस्ताव पाठवून विविध कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या मान्यवरांना स्वागत प्रसंगी पुष्पगुच्छ न देता सेंद्रीय तांदूळ असलेली 1 किलोची पिशवी भेट म्हणून दयावी त्यामुळे सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळेल असे त्यांनी सूचविले आहे. सभेला विविध यंत्रणांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सभेचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत यांनी मानले.

कर्जाचा विनियोग स्वावलंबनासाठी करा - राजकुमार बडोले

                           महात्मा फुले महामंडळाचा 40 वा वर्धापन दिन

       सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील बेरोजगार तरुण-तरुणी, तसेच गरजू व्यक्ती हे स्वावलंबी व्हावे यासाठी त्यांना उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. बेरोजगार व गरजूंनी या महामंडळाअंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाचा विनियोग खऱ्या अर्थाने स्वावलंबनासाठी करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
    10 जुलै रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या 40 व्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून पालकमंत्री श्री.बडोले बोलत होते. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे उपायुक्त देवसूदन धारगावे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जात पडताळणी कार्यायालचे संशोधन अधिकारी गौतम वाळके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
    श्री.बडोले यावेळी म्हणाले, 500 कोटीचे या महामंडळाचे भागभांडवल आहे. या महामंडळामुळे अनेकांनी उद्योग व्यवसायात यश संपादन केले आहे. कोणत्याही महामंडळाकडून घेतलेले कर्ज हे बुडविण्यासाठी असतात हा विचार सर्वप्रथम डोक्यातून काढावा. आज या महामंडळाचे भागभांडवल संपत असून नव्याने 700 कोटी रुपये भागभांडवल मागण्यात येईल. समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या विविध महामंडळापैकी जास्त निधी या महामंडळाला देण्यात आला आहे. जिल्ह्यात या महामंडळाची कर्ज वसूली केवळ 12 टक्के आहे. ज्यांना महामंडळामार्फत कर्ज देण्यात आले आहे त्यांनी कर्जाची वेळीच परतफेड करावी असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
      भविष्यात अनुसूचित जातीतून उद्योजक घडविण्यासाठी या महामंडळाकडून कर्ज देण्यात येईल असे सांगून श्री.बडोले म्हणाले, यापुढे कर्ज देतांना योग्य त्या व्यवसायासाठी कर्ज देण्यात येईल. ज्यांच्याकडे या महामंडळाच्या कर्जाची थकबाकी आहे त्यांच्याकडून कर्जाची वसूली करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. अनुसूचित जातीच्या व्यक्तींना स्वावलंबी करण्यास हे महामंडळ निश्चित काम करेल असे ते म्हणाले.

      मान्यवरांच्या हस्ते महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्जाचे धनादेश व प्रशिक्षणार्थी यांना विद्या वेतनाचे धनादेश व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक महात्मा फुले महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व्ही.आर.ठाकूर यांनी केले. संचालन श्री.मुळे यांनी, तर उपस्थितांचे आभार श्री.इंगळे यांनी मानले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते फुटबॉल प्रचार-प्रसाराचा शुभारंभ


     पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते 10 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने गोंदिया जिल्हा मिशन-1 मिलियन फुटबॉल प्रचार-प्रसाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा क्रीडा अधिकारी शुभाष गांगरेड्डीवार, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

      अवघा महाराष्ट्र फुलबॉलमय करण्यास जिल्ह्यात फुटबॉल या खेळाचा व्यापक प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टीने हे मिशन उपयुक्त ठरणार असून जिल्ह्यात सुध्दा चांगले फुटबॉलपटू तयार होण्यास या मिशनची मदत होणार असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. पालकमंत्री बडोले, जिल्हाधिकारी काळे, पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांनी फुटबॉलला किक मारुन या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी श्री.उईके, श्री.बारसागडे व क्रीडापटू तसेच क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

11 जुलै रोजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांची जय महाराष्ट्र कार्यक्रमात मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मीत जय महाराष्ट्र कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांची सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजना या विषयावर 11 जुलै रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन सायंकाळी 7.30 ते रात्री 8 या वेळेत मुलाखत प्रसारीत होणार आहे. निवेदिका मनाली दिक्षीत यांनी ही मुलाखत घेतली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम, योजना तसेच सामाजिक न्याय दिनानिमित्त राबविण्यात आलेले कार्यक्रम आदि विषयीची सविस्तर माहिती पालकमंत्री बडोले हे या कार्यक्रमात देणार आहेत.

Friday, 7 July 2017

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’


                    
                            दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन रविवारी प्रसारण 
                        कर्जमाफीविषयक प्रश्नांना सडेतोड उत्तरे
       कर्जमाफी सरसकट का नाही, कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, ३४ हजार कोटींचा मेळ कसा घातला, कर्जमाफीने शेतकरी सुखी होईल काय, प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय का …. शेतकरी कर्जमाफी संदर्भातील अशा विविध प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत. येत्या रविवारी ९ जुलै २०१७ रोजी मी मुख्यमंत्री बोलतोयकार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्यांना पडलेल्या या प्रश्नांना उत्तरे मिळणार आहेत.  
        राज्यातील जनतेला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देणाऱ्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे निर्मित मी मुख्यमंत्री बोलतोयकार्यक्रमाच्या शेतकरी कर्जमाफीया विषयावरील पहिल्या भागाचे येत्या रविवारी म्हणजे ९ जुलै २०१७ रोजी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन सकाळी १० वाजता प्रसारण होणार आहे. मुंबई दूरदर्शनवरील सह्याद्री वाहिनी, झी २४ तास आणि साम टिव्ही या वाहिन्यांवरुन सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण होईल. याच दिवशी सकाळी १०.३० वाजता झी मराठी वाहिनीवर त्याचे प्रसारण होईल. 

                          आकाशवाणीवरुनही होणार प्रसारण
           या कार्यक्रमाचे पुन:प्रसारण सोमवार दिनांक १० जुलै २०१७ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन सायंकाळी ५.३० वाजता होईल. आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन या कार्यक्रमाचे प्रसारण सोमवार दि. १० जुलै, मंगळवार दि. ११ जुलै व बुधवार दि. १२ जुलै रोजी सकाळी ७.२५ वाजता होईल. 
           या कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्यभरातील लोकांनी विचारलेल्या तसेच कार्यक्रमाच्या चित्रीकरणावेळी उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाआधी ई-मेल आणि एसएमएसवरुन लोकांकडून या विषयावर प्रश्न मागविण्यात आले होते. त्याला राज्याच्या विविध भागातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साधारण २० हजाराहून अधिक जणांनी यात सहभाग घेऊन शेतकरी कर्जमाफी, कर्ज पुनर्गठन, शेतमालाला हमीभाव, नवीन पीक कर्ज अशा विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले होते. यातील निवडक प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात उत्तरे दिली आहेत. 
           व्यवसाय अडचणीत आला म्हणून कर्ज माफ करणे योग्य आहे काय, प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय का, कर्जमाफी सरसकट का नाही, कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, ४० लाखांचा आकडा कोठून आला, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्त फायदा ?, ३४ हजार कोटींचा मेळ कसा घातला, जॉईंट अकाऊंट खातेदारांना काय फायदा होणार, चुकीच्या लोकांना लाभ मिळणार नाही याची काय खात्री, कर्जमाफीने शेतकरी सुखी होईल काय अशा विविध प्रश्नांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या कार्यक्रमात उत्तरे दिली आहेत.


Wednesday, 5 July 2017

कर्जमाफी योजनेच्या व्याप्तीत वाढीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·        कर्जमाफी योजनेत 2009 नंतरच्या थकित कर्जदारांचा समावेश
·        नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ
·        ओटीएस योजनेच्या लाभासाठी मुदतवाढ देणार
    
   राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या ऐतिहासिक योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून 2009 नंतरच्या कर्जमाफीनंतरच्या कालावधीत कर्ज घेतलेल्या परंतु 30 जून 2016 पर्यंत थकित राहिलेल्या शेतकऱ्यांचाही आता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत समावेश करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे.
 त्याचप्रमाणे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठीची मुदत एक महिन्याने वाढवून ती 31 जुलै 2017 पर्यंत करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड योजनेंतर्गत (ओटीएस) दीड लाखावरील रक्कम भरण्याचा निश्चित कालावधी शासन निर्णयात नमूद करण्यात आलेला नव्हता. त्यांना पैशाची उपलब्धता करण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून अशा शेतकऱ्यांना दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमांतर्गत राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वी, आमदार सर्वश्री डॉ. अनिल बोंडे, डॉ. आशिष देशमुख, डॉ. संजय कुटे आणि प्रशांत बंब यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कर्जमाफीचे निकष बदलण्याची मागणी केली होती. त्यात प्रामुख्याने 2009 नंतरचे जून 2016 अखेरपर्यंत थकित असलेले कर्ज दीड लाख रुपयांच्या मर्यादेत माफ करणे, कर्जाचे पुनर्गठन केलेल्या मध्यम मुदत शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी लागू करणे आणि ओटीएस योजनेसाठी कर्जाचे किमान चार टप्पे पाडून तीन टप्पे शेतकऱ्यांनी भरल्यानंतर शासनाने आपला दीड लाख रुपयांचा शेवटचा टप्पा भरावा, यांचा समावेश आहे.
शासनाने 28 जून 2017 च्या शासन निर्णयानुसार जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 1 एप्रिल 2012 नंतर पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या व 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, 1 एप्रिल 2012 पूर्वी कर्ज घेतलेले अनेक थकित शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत होते. त्यामुळे 1 एप्रिल 2012 हा निकष काढून त्यात 2009 नंतरच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
           सन 2016-17 या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या व या कर्जाची 30 जून 2017 पर्यंत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेंतर्गत परतफेड केलेल्या कर्जाच्या 25 टक्के अथवा कमाल 25 हजार आणि किमान 15 हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, या संदर्भातील 28 जून 2017 च्या शासन निर्णयातील 30 जून 2017 च्या मर्यादेमुळे अशा शेतकऱ्यांना 2016-17 मधील कर्जाची परतफेड करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक असल्याने या वर्षातील पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी 31 जुलै 2017 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे.

Saturday, 1 July 2017

पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वयंचलित हवामान केंद्राचे उदघाटन

• 33 महसूल मंडळात होणार हवामान केंद्र
               • 12 कि.मी.परिसरातील मिळणार अचुक हवामान नोंदणी
                                • आपत्ती व्यवस्थापनास उपयुक्त
                                • विकासाच्या योजना राबविण्यास ठरणार सहाय्यभूत


       कारंजा येथील कृषि चिकित्सालयात आज 1 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हवामानाचा वेध घेणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, आत्माचे उपसंचालक श्री.सराफ, तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने यांची यावेळी उपस्थिती होती.
      हवामानाची अचुक माहिती या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे मिळणार आहे. हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना नैसर्गीक आपत्तीचा सामना करावा लागते. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट, अवकाळी पावसामुळे होणारे पिकांचे नुकसान होते. या नैसर्गीक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. हे नुकसान टाळण्यासाठी हे स्वयंचलित हवामान केंद्र उपयुक्त ठरणार आहे. सोबतच अचुक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या माहितीमध्ये पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामान विषयक घटकांची माहिती वेळीच उपलब्ध होणार आहे. कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे माहिती देण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.
      या हवामान केंद्रामुळे 12 किलोमीटर परिसरातील अचुक हवामानाची नोंद दर 10 मिनिटांनी उपलब्ध होणार आहे. या हवामान नोंदीमध्ये पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या वातावरणातील घटकांचे मोजमाप करण्यात येणार आहे. जमा झालेली हवामान विषयक माहिती पीक विमा योजना, पीक विषयक सल्ला, हवामान विषयक संशोधन व इतर कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषि विभाग व स्कायमेट वेदर सर्व्हीसेस यांच्या संयुक्त भागीदारीतून स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित झाले आहे. जिल्ह्यातील 33 महसूल मंडळात हे स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कृषि हवामानाचा सल्ला शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यास महत्वाचा ठरणार आहे. तसेच नैसर्गीक आपत्तीची पूर्वकल्पना व आपत्ती व्यवस्थापनास देखील हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. या उदघाटन कार्यक्रमाला कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.