जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 25 September 2026

29 सप्टेंबरला होणारा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ स्थगित


गोंदिया, दि.25 : जिल्ह्यात 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ निवडणूक आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2026 रोजी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गोंदिया जिल्ह्याचा समावेश नागपूर पदवीधर विधानपरिषद मतदारसंघात असल्याने 22 सप्टेंबर 2026 पासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या नऊ रोजगार मेळाव्यांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित नियोक्ते, रोजगाराच्या संधीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार तसेच सहभागी संस्था व इतर भागधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
स्थगित करण्यात आलेले रोजगार मेळावे पुढील ठिकाणी आयोजित करण्यात येणार होते : नटवरलाल माणिकलाल दलाल कॉमर्स कॉलेज गोंदिया, भवभूती महाविद्यालय आमगाव, सी. जे. पटेल कॉलेज तिरोडा, राजीव गांधी महाविद्यालय सडक अर्जुनी, मनोहरभाई पटेल महाविद्यालय देवरी, शंकरलाल अग्रवाल कला व विज्ञान महाविद्यालय सालेकसा, शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया, जगत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोरेगाव, शिवप्रसाद सदानंद जयस्वाल कॉलेज मोरगाव अर्जुनी.
निवडणूक प्रक्रिया व आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने या रोजगार मेळाव्यांना स्थगिती देण्यात आली असून, पुढील आयोजनाबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे कौशल्य विकास विभागाने स्पष्ट केले आहे.
0000000

जिल्ह्यात रासायनिक खत विक्रीसाठी FFS प्रणाली लागू : घरबसल्या खताचे बुकिंग; QR कोडद्वारे अधिकृत विक्रेत्याकडून मिळणार खत


गोंदिया, दि.25 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची सुलभ व पारदर्शक उपलब्धता करून देण्यासाठी दि.25 सप्टेंबर 2026 पासून Framework for Fertilizer Sale (FFS) प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मोबाईलवरून उपलब्ध खतांची माहिती पाहून आवश्यक खताचे बुकिंग करता येणार आहे.
शेतकऱ्यांनी Google Play Store वरून FFS App डाउनलोड करून आधार किंवा Farmer ID द्वारे लॉगिन करावे. संबंधित शेतजमीन व पिकाची माहिती निवडून आवश्यक खताचे प्रमाण नोंदविल्यानंतर उपलब्ध अधिकृत विक्रेत्याची निवड करता येईल. विक्रेत्याची निवड केल्यानंतर मोबाईलवर QR Code तयार होईल. हा QR Code 72 तासांसाठी वैध असून, संबंधित विक्रेत्याकडे दाखविल्यानंतर स्कॅन करून नियमानुसार खताची विक्री केली जाईल.
या प्रणालीमुळे खताची मागणी, उपलब्धता व विक्री व्यवहाराची डिजिटल नोंद होणार असून अनधिकृत साठवणूक, कृत्रिम टंचाई, काळाबाजार व अनियमित विक्रीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना घरबसल्या उपलब्ध खताची माहिती मिळाल्याने अनावश्यक रांगा व गर्दी कमी होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी FFS प्रणालीचा वापर करूनच रासायनिक खतांची खरेदी करावी, तसेच अनधिकृत विक्रेत्याकडून खत खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कैलाश मरकाम यांनी केले आहे.
00000000

Thursday, 24 September 2026

गोंदिया जिल्ह्यात महिनाभर 'सेवा संकल्प अभियान' सुरू राहील : मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला


गोंदिया, दि.24 : सेवा संकल्प अभियान 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान चालणार असून या अंतर्गत विविध लोकोपयोगी कामे हाती घेण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींमार्फत हे अभियान राबवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
*प्रमुख कार्यक्रम* : 17 सप्टेंबर रोजी मानवी रांगोळीने या अभियानाचा शुभारंभ झाला. 18 सप्टेंबर - लाभार्थ्यांच्या घरी दीप प्रज्वलन व नवीन बचत गट स्थापना, 21 सप्टेंबर- 300 कोटी वृक्ष लागवड, 23 सप्टेंबर - स्वच्छताही सेवा व प्लास्टिक मुक्ती, 24 सप्टेंबर - आरोग्य शिबिर, रक्तदान, आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले आहे. 25 सप्टेंबर - आपले सरकार सेवा केंद्रातून दाखले वाटप, 28 सप्टेंबर - ग्रामपंचायत कर वसुली. 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर - शाळा, पंचायत समिती व जिल्हा स्तरावर चित्रकला-वक्तृत्व स्पर्धा.
1 ऑक्टोबर - अंगणवाडी उत्सव, 7 ऑक्टोबर - सिंचन विहिरीसाठी नोंदणी, 8 ऑक्टोबर - दिव्यांग नोंदणी व सर्वेक्षण. 13 ते 15 ऑक्टोबर - रथ यात्रा, जनजागृती फेरी आणि कला पथकाद्वारे 'नमो यशोगाथा' कार्यक्रमातून शासकीय योजनांची माहिती, तर 17 ऑक्टोबर रोजी तालुका मुख्यालयी पंतप्रधानांचे भाषण लाईव्ह दाखवून 'जनसेवा महाकुंभ'ने अभियानाचा समारोप होईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दोन्तुला यांनी दिली.
0000000

Wednesday, 23 September 2026

गणेशोत्सव संस्कृतीचा आणि कलांचा जागर - अभिजीत घोरपडे : ढोल-ताशांच्या गजरात महागणेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न

 







    गोंदिया, दि.23 : गणेशोत्सव सांस्कृतिक परंपरा, कला आणि लोकसंस्कृतीचा जागर असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी केले.

         ढोल-ताशांच्या गजरात महागणेशोत्सव कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभागातर्फे जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने उत्साहात पार पडला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेला बळ मिळते, असे त्यांनी सांगितले.

         सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त गोंदिया येथील जलाराम लॉन येथे महागणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करून पूजा-अर्चा व सामूहिक गणेश आरती करण्यात आली.

         गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर आपल्या जिल्ह्यातील आदिवासी गोंडी नृत्याने ठेका धरला आणि भक्तांची मने जिंकली. यानंतर वाजत गाजत आली वासुदेवाची स्वारी... लोककला नृत्याने मन मोहले. यानंतर दिलखेच लावणीचे सादरीकरण झाले. मुर्री येथील समाजकल्याण शाळेच्या लहान लहान विद्यार्थ्यांनी सामाजिक जागरुकता करणारे नृत्य सादर करीत सामाजिक जागृतीचे फलक उंचावले.

         विविध लोककला, आदिवासी संस्कृती, नृत्य, संगीत आणि लावणीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन या कार्यक्रमातून घडले. ढोल-ताशांचा निनाद, गणेशभक्ती आणि विविध कलाविष्कारांनी जलाराम लॉन परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे होते. निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, सर्वश्री उपजिल्हाधिकारी विजय अवधाने, मानसी पाटील, दर्शन निकाळजे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे, गोरेगावच्या तहसीलदार प्रज्ञा भोकरे, आमगावच्या तहसीलदार मोनिका कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर, तिरोड्याचे तहसीलदार नारायण ठाकरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी केले. राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख देश-विदेशात पोहोचविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

             लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी पुणे येथे 1893 मध्ये गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्रात गणेशोत्सव सामाजिक एकात्मता आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरला. आजच्या काळातही सामाजिक समतेची गरज आहे. महागणेशोत्सवासारख्या उपक्रमातून विविध कला, संस्कृती आणि परंपरा एकाच व्यासपीठावर येतात. हा नियोजनबद्ध आणि स्तुत्य उपक्रम असून, उपस्थित सर्वांना श्री. घोरपडे यांनी शुभेच्छा दिल्या.

          जिल्ह्यातील, तसेच पुणे व नागपूर मधील शमा डान्स अकॅडमी, आदिवासी गोंडी नृत्य, ‘देवा श्रीगणेशा’ या गीतावर नागकुडा ग्रुप, रावेणी डान्स ग्रुप, निवासी शाळा मुर्री/नंगपूरा, ‘वासुदेवाची स्वारी’, रजनी नागपुरकर यांची लावणी तसेच जय सेवा डान्स ग्रुप आणि संजीव बापट यांच्या गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणून उपस्थितांची मने जिंकली.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिवेणी कहालकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजन चौबे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                      

                                                                                0000000

      

 



अनंत चतुर्दशीला गोंदियात

 विविध ठिकाणी होणार गणरायाचे विसर्जन

गोंदिया, दि. 23 : अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्तींचे मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे. विसर्जनासाठी जिल्ह्यातील विविध तलाव, नदीघाट व जलस्रोत निश्चित करण्यात आले आहेत.

गोंदिया शहरातील छोटा गोंदिया तलाव, भीमघाट पांगोली नदी, पिंडकेपार नाला, सरकारी तलाव (रेल्वे) आणि मुर्री तलाव येथे गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. गोंदिया ग्रामीण भागातील खमारी तलाव व टेमणी घाट (पांगोली नदी), रामनगर भागातील बांधतलाव सूर्याटोला, हिवरा गाव तलाव व टेमणी नदी घाट, तसेच रावणवाडी क्षेत्रातील कोरणी-रजेगाव नदीघाट येथेही विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आमगाव भागातील संत तुकडोजी तलाव, गायत्री मंदिर तलाव व बाघ नदी घाट, गोरेगाव क्षेत्रातील पवन तलाव व पांगोली नदी घाट, सालेकसा भागातील रोंढा नाला व साखरीटोला गाव नाला, तसेच देवरी क्षेत्रातील धुकेश्वरी मंदिर तलाव व गाव तलाव येथे गणेशमूर्ती विसर्जन होणार आहे.

डुग्गीपार भागातील चुलबंद नदी घाट व गाव तलाव, अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील महागाव तलाव व अर्जुनी मोरगाव गाव तलाव, नवेगावबांध तलाव, तिरोडा भागातील शिंगाडा तलाव, काशीघाट (गराडाटोला), खामतलाव व गिरजाबाई शाळेजवळील तलाव, तसेच गंगाझरी क्षेत्रातील कवलेवाडा, पांगळी, मुंडीपार व एकोडी तलाव येथेही विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक तसेच लहान मुलांची गर्दी होण्याची शक्यता आहे. विसर्जन सायंकाळी व रात्रीच्या वेळी होत असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विसर्जनस्थळी विद्युत प्रकाश व्यवस्था, बॅरिकेट्स, बोधचिन्हे व सूचना फलक लावण्यासोबतच सीसीटीव्ही आणि क्रेनची व्यवस्था करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून गणरायाचे विसर्जन शांततेत व सुरक्षितपणे करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000


Tuesday, 22 September 2026

गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून सायबर सुरक्षा व ग्राहक जनजागृती : लोकसंवाद-2026 अंतर्गत आमगावात विविध उपक्रम






          गोंदिया, दि.22 : गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शासकीय योजना, सायबर सुरक्षा आणि ग्राहक हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी लोकसंवाद-2026 अंतर्गत आमगाव येथे विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
         आमगाव येथील वक्रतुंड गणेश उत्सव मंडळ, जय बजरंग चौक येथे महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालय, गोंदियाच्या वतीने सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर होत्या. आमगाव येथील सायबर सेलचे अजय पटले यांनी सायबर सिक्युरिटी बाबत अधिक माहिती दिली.
         यावेळी आमगाव पोलीस विभागातील अजय पटले यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांचे प्रकार, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, ओटीपी व बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती कोणालाही न देणे याबाबत मार्गदर्शन केले. सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
         महाराष्ट्र शासनाच्या विविध जनजागृती उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून लोकसंवाद साधला जात आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या नागरिकांना उपयुक्त माहिती मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
         कार्यक्रमाचे संचालन पत्रकार भोला गुप्ता यांनी केले. गणेश मंडळाच्या सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला.
0000000
           *अष्टविनायक गणेश उत्सव मंडळात ग्राहक जनजागृती*
दरम्यान, अष्टविनायक गणेश उत्सव मंडळ, अष्टविनायक चौक, मेन रोड, आमगाव येथेही शनिवारी (ता.19) सायंकाळी नागरिक आणि ग्राहकांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
          यावेळी अखिल भारतीय ग्राहक मंचाचे कोषाध्यक्ष बिनेश्वर कटरे यांनी ग्राहकांना त्यांच्या हक्कांबाबत तसेच व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. नागरिकांनी जागरूक ग्राहक म्हणून आपल्या हक्कांची माहिती करून घ्यावी आणि कोणत्याही व्यवहारात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
         गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांना उपयुक्त माहिती देण्याच्या लोकसंवाद-2026 उपक्रमाला आमगाव परिसरात नागरिकांचा सहभाग मिळत आहे.
00000000

लोकसंवादातून पाटेखुर्रा येथे शासनाच्या योजनांची माहिती : बाल गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती





गोंदिया, दि.22 : शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या लोकसंवाद-2026 अंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील पाटेखुर्रा येथे सोमवारी सायंकाळी बाल गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, सरपंच प्रशांत बालसंनवार यांच्यासह प्रशांत शहारे, हितेश डोंगरे, रवी भलावी, निखील पारधी, अनिरुद्ध गेडाम, रोहितकुमार पारधी, सुरेश बोपचे, जितेंद्र कवरे आदींचे सहकार्य लाभले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध शासकीय योजना, उपक्रम आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली. शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून, नागरिकांनी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शासकीय योजनांचा लाभ घेताना नागरिकांना काही अडचणी किंवा समस्या निर्माण झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने लोकसंवादासाठी हे व्यासपीठ प्रभावी ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
*दरम्यान*, कारंजा येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातही लोकसंवाद-2026 अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भाविक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली. नागरिकांनी योजनांची माहिती इतरांपर्यंतही पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले.
0000000