.
योजनेतून मिळवा लाखो रुपयांचे अनुदान
गोंदिया, दि. 29: ग्रामीण आणि शहरी भागातील युवक, शेतकरी व उद्योजकांसाठी उद्योग उभारणीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यासाठी यंदा 291 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. कृषि विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे यांनी केले आहे.
ही योजना बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी https://pmfme.mofpi.gov.in या वेबसाईटवर अर्ज करणे आवश्यक आहे.
*आकर्षक अनुदान व सुविधा*
या योजनेअंतर्गत वैयक्तिक तसेच गट स्वरूपातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येते. उद्योग सुरू करण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या 35 टक्क्यांपर्यंत, कमाल 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते. कर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांना प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते.
याशिवाय, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था व स्वयंसहाय्यता गटांना सामाईक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 3 कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. तसेच मार्केटिंग व ब्रँडिंगसाठी 50 टक्क्यांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
*कोणते उद्योग करता येतील?*
फळे, भाजीपाला, कडधान्ये, तेलबिया, अन्नधान्य तसेच गूळ प्रक्रिया यांसारख्या उद्योगांना या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे.
*अर्ज प्रक्रिया सुलभ*
अर्जदारांना संपूर्ण प्रक्रियेत मदत करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात जिल्हा संसाधन व्यक्ती नेमण्यात आलेली आहे. अर्ज भरण्यापासून ते कर्ज मंजुरीपर्यंत मार्गदर्शन निशुल्क दिले जाते.
पात्रता व कागदपत्रे
या योजनेसाठी शेतकरी, युवक, महिला बचत गट, उद्योजक, संस्था तसेच अॅग्रो कंपन्या अर्ज करू शकतात. शेती नसलेल्या व्यक्तींनाही संधी उपलब्ध आहे.
अर्जासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, शिक्षण प्रमाणपत्र (किमान 8 वी उत्तीर्ण), उद्यम आधार, FSSAI परवाना, यंत्रसामग्रीचे कोटेशन, वीज बिल आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
रोजगारनिर्मितीला चालना
PMFME योजना ही रोजगारनिर्मिती व आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. स्थानिक पातळीवर उद्योग उभारून उत्पन्न वाढविण्याची ही उत्तम संधी असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. निलेश कानवडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा..
00000
No comments:
Post a Comment