जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 18 June 2026

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार उभारण्यासाठी विविध योजना

 


गोंदिया, दि.18 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ हे अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्रय रेषेअंतर्गत जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना व्यवसाय उभारण्याकरीता महामंडळाअंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. खालीलप्रमाणे योजनेचे स्वरूप आहे.

अनुदान योजना : प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपये पर्यंत. प्रकल्प मर्यादेच्या 50 % रुपये अनुदान देण्यात येते व उर्वरीत रक्कम बँकेमार्फत देण्यात येते. बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते व कर्जाची परत फेड सर्वसाधारणपणे तीन वर्षात करावयाची असते.

बीजभांडवल योजना : महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलामधून बीज भांडवल योजना राबविण्यात येते. प्रकल्प मर्यादा 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत. प्रकल्प मर्यादेच्या 20 % बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत 4 % द.सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये महामंडळाचे अनुदान 50 हजार रुपये पर्यंत मर्यादित (PM-AJAY) चा समावेश आहे. प्रकल्प मर्यादेच्या 75% बँकेद्वारे कर्ज देण्यात येते व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षाच्या आत करावी लागेल. अर्जदाराचा 5 % स्वतःचा सहभाग भरावयाचा आहे.

थेट कर्ज योजना : महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलामधून थेट कर्ज योजना राबविण्यात येते.  प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये पर्यंत. महामंडळाचा सहभाग 45 हजार रुपये इतका असून अनुदान 50 हजार रुपये (PM-AJAY) मर्यादेसह आहे. अर्जदारचा सहभाग 5 % (5,000/-) स्वतःचा सहभाग भरावयाचा असते. सदर देण्यात येणाऱ्या कर्जावर 4 % द.सा.द.शे. व्याजदर आहे.

अनुसूचति जाती प्रवर्गातील मांग आणि चांभार यांना सोडुन उर्वरित प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ दिले जाते. उदा. महार, होलीया, बुरुड, मेहत्तर, खाटीक, घसीया इतर सर्व. अर्जदारांना महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईल अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छुक अर्जदारांनी ऑनलाईनसाठी https://mahadisha.mpbcdc.in) या संकेतस्थळावर जाऊन त्वरीत अर्ज करावे.  

अधिक माहितीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, आमगाव रोड, गोंदिया येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक 07182-232947, Email : dm.gondiya@mpbcdc.in यावर संपर्क साधावे. असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सिध्दार्थ खोब्रागडे यांनी केले आहे.

                                                  0000000

No comments:

Post a Comment