जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 19 June 2026

अमृत मानव मित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज प्रक्रिया सुरु

 


गोंदिया, दि.19 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) यांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणारा 'अमृत मानव मित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

सध्याच्या बदलत्या सामाजिक, शैक्षणिक व कौटुंबिक परिस्थितीत वि‌द्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित विविध समस्या वाढताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित समुपदेशकांची आवश्यकता लक्षात घेऊन AMRUT संस्थेने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पुणे येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था ही तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत आहे.

प्रशिक्षणामध्ये वि‌द्यार्थी समुपदेशन, बाल व किशोर मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन, जीवनकौशल्य शिक्षण, पालक व शिक्षकांसोबत संवाद, सायबर सुरक्षा व डिजिटल आरोग्य, मानसिक आरोग्य जनजागृ‌ती, समुदाय आधारित समुपदेशन आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून शाळा, महावि‌द्यालये, सामाजिक संस्था तसेच स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.

प्रशिक्षणाचा कालावधी एक महिन्याचा असून 15 दिवस प्रत्यक्ष वर्ग व उर्वरित कालावधीत ऑनलाईन तज्ज्ञ सत्रे, केस स्टडी, फील्ड व्हिजिट आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पुर्णपणे मोफत राहणार आहे.

या प्रशिक्षणासाठी पदवीधर, मानसशास्त्र, समाजकार्य (MSW), समुपदेशन, शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील इच्छुक युवक-युवती अर्ज करू शकतात. प्रत्येक जिल्ह्यात मर्यादित जागांवर प्रवेश दिला जाणार असून गुणवतेनुसार निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.

पहिल्या बॅचसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 जून 2026 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरून आपली नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी अमृत कार्यालय गोंदिया मो. 9112228776, info@mimh.edu.in, www.mimh.edu.in, app.mahaamrut.org.in यावर संपर्क साधावे, असे जिल्हा व्यवस्थापक अमृत यांनी कळविले आहे.

                                               00000000

No comments:

Post a Comment