जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 18 June 2026

'एल निनो' पार्श्वभूमीवर कृषी विषयक सल्ला

 


गोंदिया, दि.18 : यावर्षी 'एल निनो' (El Nino) च्या प्रभावामुळे पावसाचा लहरीपणा, खंड पडणे किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी व आपले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पुढील बाबींचे काटेकोर नियोजन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

बियाणांची निवड आणि पेरणीचे नियोजन

घाई गडबड टाळा : घाईघाईने पेरणी करू नका. मुख्य पिकांची पेरणी पुरेशा प्रमाणात म्हणजे किमान 75 ते 100 मि.मी. पाऊस झाल्याशिवाय करू नका. कमी कालावधीची पिके : या हंगामात कमी कालावधीत येणाऱ्या आणि पाण्याचा ताण सहन करणाऱ्या पिकांच्या जातीच्या बियाणांची निवड करा. उदा. भात IR 64, CO-51 इत्यादी. आंतरपीक पद्धती : जोखीम कमी करण्यासाठी एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करा. उदा. भात अधिक बांधावरील तूर, भात अधिक बांधावरील तीळ, तूर अधिक उडीद इत्यादी.

              जल आणि मृद संधारण

ओलावा टिकवणे : शेतात ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांमध्ये आच्छादनाचा शक्य तेथे वापर करा. पावसाचे पाणी अडवा : शेतातील जुने बांध दुरुस्त करा, जेणेकरून पडणारे पाणी शेतातच जिरून जमिनीतील ओलावा टिकून राहील. मूलस्थानी जलसंधारण : उताराला आडवी नांगरट, मृत सरी, सरी वरंभा, चर खोदणे इत्यादी.

                                               पीक संरक्षण आणि खत व्यवस्थापन

खतांचा संतुलित वापर : पावसाचा ताण असताना रासायनिक खतांचा अतिवापर टाळा. शक्यतो सेंद्रिय खते, कंपोस्ट आणि निंबोळी पेंडीचा वापर वाढवा. कीड व रोग नियंत्रण : हवामानातील बदलांमुळे किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यासाठी आपल्या पिकांचे नियमित निरीक्षण करा आणि 'महाविस्तार AI अॅपचा वापर करून वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

इतर महत्त्वाच्या सूचना

पिक विमा : कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून उदा. अतिवृष्टी, कमी पाऊस, पावसाचा खंड व कमी उत्पादन इत्यादी पिकाचे संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आपल्या पिकांचा विमा नक्की उतरावा. माहितीसाठी संपर्क : हवामान अंदाज आणि कृषी विषयक मार्गदर्शनासाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी यांच्याशी सतत संपर्कात राहा.

"नियोजनाची धरू साथ, तरच होईल संकटावर मात!" अशाप्रकारे ‘एल निनो’ पार्श्वभूमीवर कृषी नियोजन करण्यात यावे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालय, गोंदिया यांनी दिली आहे.

                                                                       0000000

No comments:

Post a Comment