विमा दावा धनादेशांचे वितरण व महिला बचतगटांना कर्ज मंजुरीपत्रांचे वाटप; 31 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात अभियान सुरू राहणार
गोंदिया, दि. 26 : केंद्र शासनाच्या राष्ट्रव्यापी वित्तीय सेवा विभागाच्या (DFS) वित्तीय समावेशन संतृप्ती अभियानांतर्गत गोंदिया येथे 18 नोव्हेंबर 2026 रोजी प्रताप लॉन्स येथे विशेष वित्तीय समावेशन व री-केवायसी (Re-KYC) शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय स्टेट बँक आणि जिल्ह्यातील विविध बँकांच्या संयुक्त सहभागातून आयोजित या शिबिराला ग्रामीण नागरिक तसेच महिला स्वयंसहायता बचतगटांच्या सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँक नागपूरचे क्षेत्रीय संचालक सचिन वाय. शेंडे, भारतीय स्टेट बँकेच्या नागपूर प्रशासकीय कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक शशि रंजन, भारतीय रिझर्व्ह बँक नागपूरचे सहायक महाव्यवस्थापक विनोथ कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भारतीय स्टेट बँकेचे गोंदिया क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाचे क्षेत्रीय व्यवस्थापक अतुल कुमार आणि नागपूर प्रशासकीय कार्यालयाचे सहायक महाव्यवस्थापक ज्योति कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
या शिबिरात पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक या बँकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारतीय स्टेट बँकेचे वित्तीय समावेशन व्यवस्थापक पावेल मेश्राम आणि बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कौशलकुमार तिराले यांनी कार्यक्रमाच्या आयोजन व समन्वयाची जबाबदारी पार पाडली.
शिबिरादरम्यान सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत पात्र लाभार्थी व त्यांच्या कुटुंबीयांना विमा दावा रकमेचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यामुळे संबंधित कुटुंबांना आर्थिक आधार मिळण्यास मदत झाली. तसेच महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वयंरोजगार व महिला उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने भारतीय स्टेट बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने विविध स्वयंसहायता बचतगटांना कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजना (APY) या सामाजिक सुरक्षा योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचबरोबर सुरक्षित बँकिंग व्यवहार, सायबर सुरक्षेचे महत्त्व, ऑनलाइन आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी, री-केवायसी प्रक्रिया तसेच विविध बचत योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना बँकिंग सेवा, विमा संरक्षण, पेन्शन सुविधा आणि विविध शासकीय आर्थिक योजनांचा लाभ सुलभतेने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. बँकिंग सेवांपासून वंचित असलेल्या नागरिकांना वित्तीय व्यवस्थेशी जोडणे तसेच बँक खात्यांचे अद्ययावतीकरण आणि आर्थिक साक्षरता वाढविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
गोंदिया जिल्ह्यात हे वित्तीय समावेशन संतृप्ती अभियान 31 डिसेंबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधून री-केवायसी, विमा योजना, अटल पेन्शन योजना तसेच इतर वित्तीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय, गोंदिया यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0000000




No comments:
Post a Comment