जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601
Tuesday, 17 November 2026
सामूहिक वनहक्क धारकांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सालेकसा येथे कार्यशाळा संपन्न
वनसंवर्धन व व्यवस्थापन आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी, शासकीय योजनांचे अभिसरण आणि ग्रामसभांच्या सक्षमीकरणावर भर; 87 ग्रामसभा पदाधिकाऱ्यांचा सहभाग
गोंदिया, दि. 17 : जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांच्या आर्थिक व सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी तसेच वनसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन व शाश्वत व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने सालेकसा येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 16 नोव्हेंबर 2026 रोजी गडमाता सभागृह, सालेकसा येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत वनहक्क कायदा 2006 ची प्रभावी अंमलबजावणी आणि वनसंवर्धन व व्यवस्थापन आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांचे 87 पदाधिकारी तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीचे प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वनविभाग आणि ग्रामसभा महासंघाच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
*वनहक्क कायद्याच्या माध्यमातून ग्रामसभांचे सक्षमीकरण*
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६, नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ मधील तरतुदींनुसार सालेकसा तालुक्यातील विविध गावांना सामूहिक वनहक्क मंजूर झाले आहेत. या अधिकारांचा प्रभावी वापर करून ग्रामसभांनी वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन करण्यासोबतच गावांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी सामूहिक वनहक्क क्षेत्राचे वनसंवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करून शाश्वत ग्रामविकास साधण्यावर कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीचे फोरमन जुगल राहांगडाले यांनी प्रास्ताविकातून आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या वनसंवर्धन व व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. १२ सप्टेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार एकात्मिक आदिवासी विकास विभाग, तहसील कार्यालय, वनविभाग, पंचायत विभाग आणि वनामी फाउंडेशन गोरेगाव यांच्या समन्वयातून आराखडे तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
वनपरिक्षेत्र सालेकसा येथील वनपाल यांनी ग्रामसभांनी वनहक्क कायद्यांतर्गत प्राप्त अधिकारांचा प्रभावी वापर करून वनांचे संरक्षण व संवर्धन करावे. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन गावांचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले.
*गौण वनउपज आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या व्यवस्थापनावर मार्गदर्शन*
वनहक्क कायद्याचे मार्गदर्शक ललित भंडारकर यांनी ग्रामसभा पदाधिकारी व सदस्यांना वनहक्क कायद्यातील विविध तरतुदींची सविस्तर माहिती दिली. गौण वनउपज संकलन व व्यवस्थापनाचे स्वामित्व अधिकार, पारंपरिक तलावांवरील अधिकार, तसेच वनहक्क कायद्याच्या कलम ५ नुसार वन्यजीव, वन आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी ग्रामसभांची भूमिका व जबाबदाऱ्या त्यांनी स्पष्ट केल्या.
वनसंवर्धन व व्यवस्थापन आराखडा तयार करताना ग्रामसभा आणि संबंधित शासकीय विभागांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी सामूहिक वनहक्क क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी, शिवारफेरी, जलग्रहण क्षेत्रांचा अभ्यास, नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता आणि गावांच्या गरजांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे विकासकामांचे नियोजन करून ग्रामसभेची मान्यता घेणे आणि वनहक्क कायद्याच्या तरतुदींशी सुसंगत पद्धतीने आराखड्याची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
*मनरेगाच्या माध्यमातून गावविकासाच्या कामांना चालना*
३० नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांना मनरेगा योजनेची यंत्रणा म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मनरेगा अंतर्गत विकासकामांचे नियोजन, ग्रामसभांची जबाबदारी, कामांना प्रशासकीय मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कार्यपद्धती याबाबत तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या मनरेगा विभागातील सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत वनविभाग, महसूल विभाग, पंचायत विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामसभा पदाधिकाऱ्यांनी वनहक्क क्षेत्रातील विकासकामे, नियोजन आराखडे आणि मनरेगा पोर्टलवरील मंजुरी प्रक्रियेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. तज्ज्ञांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन करून आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले.
सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांनी कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतला. आपल्या गावांचे वनसंवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करून वनसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन आणि शाश्वत ग्रामविकास साधण्याचा संकल्प यावेळी ग्रामसभा पदाधिकारी व सदस्यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा महासंघ, तालुका सालेकसा यांच्या वतीने वनहक्क कायद्याचे मार्गदर्शक ललित भंडारकर तसेच वनविभागाच्या प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन हरीश तुरकर यांनी केले. तालुका समन्वयक श्री. कटरे यांनी आभार प्रदर्शन केले.
00000000
Subscribe to:
Post Comments (Atom)



No comments:
Post a Comment