बँक शाखा, जीवन प्रमाण पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे डिजिटल पद्धतीने दाखला सादर करण्याची सुविधा
गोंदिया, दि. 17 : महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या सर्व निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी सन २०२६-२७ या वर्षासाठी आपले हयातीचे दाखले (Life Certificate) दिनांक ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीबाबत नियतकालिक ओळख पडताळणी केली जाते. त्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत संबंधित निवृत्तीवेतनधारकांचे नाव, निवृत्तीवेतन क्रमांक व बँक खाते क्रमांक नमूद असलेले हयातीचे छापील दाखले संबंधित बँक शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हयातीचा दाखला सादर करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये निवृत्तीवेतन जमा होणाऱ्या बँक शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहून बँक अधिकाऱ्यांच्या समक्ष हयातीच्या दाखल्यावर स्वाक्षरी करून दाखला सादर करता येईल. तसेच केंद्र शासनाच्या जीवन प्रमाण (Jeevan Pramaan) पोर्टलद्वारे https://jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला सादर करता येईल.
याशिवाय, अँड्रॉइड किंवा आयओएस मोबाईलमध्ये Jeevan Pramaan ॲप डाउनलोड करून त्याद्वारेही ऑनलाइन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
तरी जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी विहित मुदतीत, म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी आपले हयातीचे दाखले सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन कोषागार अधिकारी मो. तौसिफ मो. हसीन तसेच अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) समीर देशमुख यांनी केले आहे.
00000000
No comments:
Post a Comment