देवरी येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात प्रशिक्षण; इच्छुक उमेदवारांनी 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत
गोंदिया, दि. 18 : आदिवासी जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, देवरी यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा माहिती व मार्गदर्शनाचे तिसरे सत्र आयोजित करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण 1 डिसेंबर 2026 ते 15 मार्च 2027 या कालावधीत घेण्यात येणार असून, इच्छुक पात्र उमेदवारांनी 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी उमेदवार किमान शालान्त परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या तसेच टंकलेखन, संगणक किंवा लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. महिला व पुरुष दोन्ही उमेदवारांना अर्ज करता येईल. उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे. तसेच उमेदवार गोंदिया किंवा भंडारा जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
यापूर्वी या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. तसेच उमेदवाराकडे रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाचे ऑनलाइन नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे.
अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, देवरी येथे निर्धारित मुदतीत सादर करावा.
प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने पंधरा दिवसांचा असून, प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना देवरी येथे राहण्याची व्यवस्था स्वतः करावी लागणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी कार्यालय, देवरी येथे 07199-295168 यावर संपर्क साधावा. असे देवरी येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अस्मिता ठाकरे यांनी कळविले आहे.
00000000
No comments:
Post a Comment