जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 18 November 2026

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनीची केली पाहणी

 


 

 नेत्ररोग तज्ज्ञांची सेवा, रक्त तपासणी व एक्स-रे सुविधांसह आरोग्य सेवांबाबत नागरिकांच्या मागण्या; पात्र लाभार्थ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

 

गोंदिया, दि. 18 : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, खोडशिवनी येथे भेट देऊन आरोग्य संस्थेतील उपलब्ध वैद्यकीय सुविधा व आरोग्य सेवांची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून आरोग्य सेवांबाबत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या.

या संवादादरम्यान नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्ररोग तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून देणे, टायफाईडवरील औषधोपचार, रक्त तपासणी तसेच एक्स-रे काढण्याची सुविधा सुरू करण्याची मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली. ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक स्तरावरच आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.

भेटीदरम्यान आरोग्यमंत्र्यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) उपचार व आरोग्य सुविधांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. आरोग्य विभागाच्या माध्यमातून मिळालेल्या उपचारांमुळे झालेल्या लाभाबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करीत आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले.

तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ‘तिशीचा पल्ला तपासणी’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या उपक्रमांतर्गत किती नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, नागरिकांना तपासणीसाठी कशा प्रकारे प्रोत्साहित केले जात आहे, याबाबत त्यांनी माहिती घेतली. उपस्थित नागरिकांनाही आरोग्यमंत्र्यांनी थेट संवाद साधत त्यांची आरोग्य तपासणी झाली आहे का, याची विचारणा केली. नियमित आरोग्य तपासणी केल्याने संभाव्य आजारांचे वेळीच निदान होऊन योग्य उपचार घेणे शक्य होते, याचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

*महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवा*

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पात्र लाभार्थ्यांना योजनेची माहिती द्यावी. तसेच अधिकाधिक नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून उपचार व आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रियपणे काम करावे, असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे, आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणे आणि प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ पोहोचविणे यासाठी आरोग्य विभागाने दक्षता व तत्परतेने कार्य करावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

00000000

No comments:

Post a Comment