जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 18 November 2026

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन शिबिर



जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहानिमित्त देवरी येथील शासकीय वसतिगृहात MPSC, UPSC परीक्षांच्या तयारीसह वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन


           गोंदिया, दि. 18 : जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह 2026 च्या निमित्ताने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी यांच्या वतीने देवरी येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्रमांक 1 व 2 येथे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
          शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून देवरी येथील वाहतूक व परिवहन शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रंजित मट्टामी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना रस्ते वाहतुकीचे नियम, वाहतूक सुरक्षितता तसेच नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले. यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसंदर्भात त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
          स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी केवळ पाठांतरावर अवलंबून न राहता विषयांचे सखोल आकलन, नियमित वाचन, चालू घडामोडींचा अभ्यास आणि वेळेचे योग्य नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अभ्यासक्रमाची योग्य निवड, संदर्भ ग्रंथांचे वाचन, अभ्यासाचे नियोजन आणि स्वतःच्या हस्ताक्षरात मुद्देसूद टिपणे तयार करण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.
         आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि भविष्यात प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, हा या मार्गदर्शन शिबिराचा मुख्य उद्देश होता. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही प्रशासकीय सेवेत करिअर करण्याच्या संधी उपलब्ध असून त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि नियोजनबद्ध प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
          शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रश्नमंजूषा व शंका-समाधान सत्र घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसंदर्भातील विविध शंकांचे निरसन करून घेतले.
यावेळी वसतिगृहाचे गृहपाल आर. डी. खंडाते व एन. डी. बाघे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा देणारा आणि त्यांच्या भावी शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीला दिशा देणारा हा उपक्रम ठरला.
00000000

No comments:

Post a Comment