जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday, 17 November 2026

खाडीपार येथे सार्वजनिक अभ्यासिकेचे उद्घाटन




ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणाच्या तयारीसाठी अभ्यासिकेचा होणार लाभ

गोंदिया, दि. 17 : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पोषक वातावरण उपलब्ध व्हावे, तसेच त्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती रुजून ज्ञानार्जनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने सडक अर्जुनी तालुक्यातील खाडीपार येथे 15 नोव्हेंबर 2026 रोजी सार्वजनिक अभ्यासिकेचे उद्घाटन जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सुधा रहांगडाले होत्या. यावेळी गोंगले येथील माजी सरपंच डी. यु. रहांगडाले, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव डी. डी. रहांगडाले, सदस्य संतोष डोये, खाडीपारच्या सरपंच श्रीमती डोंगरे तसेच उपसरपंच गजानन परशुरामकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, विविध स्पर्धा परीक्षा, शासकीय नोकरी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी योग्य सुविधा व शांत अभ्यासाचे वातावरण मिळणे आवश्यक आहे. सार्वजनिक अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्यांना एकत्रितपणे अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच चालना मिळण्यास मदत होईल. तसेच नियमित वाचन, स्वाध्याय आणि ज्ञानवृद्धीची सवय विकसित होण्यासही या उपक्रमाचा उपयोग होणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सार्वजनिक अभ्यासिकेसारख्या सुविधा निर्माण होणे ही सकारात्मक बाब असून, या सुविधेचा विद्यार्थ्यांनी नियमित आणि प्रभावीपणे उपयोग करून आपल्या शैक्षणिक व करिअरविषयक ध्येयांची पूर्तता करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाय. टी. परशुरामकर यांनी केले. या उद्घाटन सोहळ्यामुळे खाडीपार परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यास व ज्ञानार्जनाची एक महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाली आहे.
0000000

No comments:

Post a Comment