जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601
Monday, 2 November 2026
मांडवी येथे लोकसहभागातून दोन वनराई बंधाऱ्यांची उभारणी
पावसाचे पाणी अडवून भूजल पुनर्भरण व सिंचन विहिरींची पाणीपातळी वाढविण्यासाठी पुढाकार गोंदिया, दि.2 : आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA), महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मांडवी येथे ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या सक्रिय लोकसहभागातून दोन वनराई बंधाऱ्यांची उभारणी यशस्वीरीत्या करण्यात आली. स्थानिक नाल्यातून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून त्याची साठवणूक करणे, भूगर्भातील पाणीपातळी वाढविणे, भूजल पुनर्भरणास चालना देणे तसेच परिसरातील सिंचन विहिरींना शाश्वत जलस्रोत उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मांडवी ग्रामपंचायत कार्यालयात पदाधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी वनराई बंधाऱ्यांचे महत्त्व, जलसंधारणाची आवश्यकता आणि पावसाचे पाणी अडविण्यामुळे होणारे फायदे याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. त्यानंतर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, गोंदिया येथील अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.
नाल्यावर सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमध्ये रेती व माती भरून दोन वनराई बंधाऱ्यांची मजबूत रचना करण्यात आली. या बंधाऱ्यांमुळे नाल्यातून वाहून जाणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन पाण्याची साठवणूक होण्यास मदत झाली आहे. परिणामी, परिसरातील भूजल पुनर्भरणास चालना मिळून विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारण्यास मदत होणार आहे.
या जलसंधारण उपक्रमासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक कुणाल इंगळे, सहायक भूवैज्ञानिक डॉ. अभिजीत धारशिवकर, कनिष्ठ भूवैज्ञानिक अविनाश भोगे व कनिष्ठ भूवैज्ञानिक प्रतीक श्रीकोंडावर यांच्यासह कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमात कवलेवाडा क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी, मांडवी ग्रामपंचायतचे सरपंच तुरेंद्र नागपुरे, उपसरपंच निशा माहुले, ग्रामपंचायत सदस्य मंदा देवगडे, ज्योती चौधरी, सविता मेश्राम यांच्यासह गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वी झाला.
पावसाचे पाणी अडविणे व जिरविणे ही काळाची गरज असून, अशा लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील भूजलसाठा वाढण्यास मदत होते. मांडवी येथील वनराई बंधाऱ्यांचा उपक्रम हा गावाच्या जलसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून, शेतीसाठी सिंचनाची उपलब्धता आणि परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांना बळकटी मिळण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
00000000
Subscribe to:
Post Comments (Atom)



No comments:
Post a Comment