तन्वी कटरे, युगांश कटरे आणि मानस्वी बावणे यांची उल्लेखनीय कामगिरी; अन्य खेळाडूंचीही उपांत्य व उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल
गोंदिया, दि. 23 : विदर्भ रिजनल टेबल टेनिस स्पर्धा २०२६ मध्ये मिशन लक्ष्यवेदच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आपली छाप उमटवली. दि. १४ व १५ नोव्हेंबर रोजी आयोजित या स्पर्धेत तन्वी कटरे, युगांश कटरे आणि मानस्वी बावणे यांनी आपापल्या वयोगटात विजेतेपद पटकावले. तर अन्य खेळाडूंनीही उपांत्य व उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारत स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.
स्पर्धेतील अंडर-११ मुलींच्या गटाच्या अंतिम सामन्यात तन्वी कटरे हिने अनन्या बागडे हिचा ८-११, ११-५, ११-६ आणि ११-८ असा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंडर-१५ मुलांच्या गटात युगांश कटरे याने अंतिम सामन्यात पार्थ पवार याचा ११-५, ११-५ आणि ११-९ असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. तसेच अंडर-१५ मुलींच्या गटाच्या अंतिम सामन्यात मानस्वी बावणे हिने ईश्वरी भावडे हिच्याविरुद्ध चुरशीच्या लढतीत २-११, ११-७, ११-८, ७-११ आणि ११-७ अशी मात करत विजेतेपदाला गवसणी घातली.
याशिवाय वेदांत रहमतकर याने अंडर-१५ मुलांच्या गटात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. कुंजल बिसेन हिने अंडर-१७ गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. अद्वैत मेश्राम याने अंडर-१७ गटात उपांत्य फेरीपर्यंत, तर अंडर-१९ गटात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचत आपली गुणवत्ता सिद्ध केली. फैसल सिद्दीकी याने अंडर-१३ गटात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली.
तीन खेळाडूंनी विजेतेपद पटकावणे आणि अन्य खेळाडूंनी विविध वयोगटांत उपांत्य व उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारणे ही मिशन लक्ष्यवेद संघासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. या यशाचे श्रेय खेळाडूंनी आपल्या आई-वडिलांसह प्रशिक्षक अश्लेष पारधी यांना दिले. खेळाडूंच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.
00000000
No comments:
Post a Comment