जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday, 8 September 2026

भरती परीक्षा सुधारणांसाठी नागपूर विभागात टास्क फोर्सचा थेट संवाद : गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या सूचना जाणून घेणार


गोंदिया, दि.8 : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि.४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी हा टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देत आहे.
नागपूर विभागातील संवाद दि.१६ सप्टेंबर २०२६ रोजी डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याचाही समावेश असल्याने जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच भरती परीक्षा प्रक्रियेशी संबंधित घटकांना आपल्या सूचना, अडचणी व अनुभव थेट टास्क फोर्ससमोर मांडता येणार आहेत.
भरती परीक्षा प्रक्रियेत गोंदिया जिल्ह्यातील उमेदवारांना येणाऱ्या अडचणी, परीक्षा केंद्रांशी संबंधित बाबी, परीक्षा प्रक्रिया, सुरक्षितता, पारदर्शकता तसेच उमेदवारांच्या अपेक्षा याबाबतच्या सूचना या संवादातून जाणून घेण्यात येणार आहेत.
गोंदिया जिल्ह्यासह नागपूर विभागातील नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात.
भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी प्राप्त सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.
बैठकीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
00000000

गोरेगाव तालुक्यात लोकशाही दिनाचे आयोजन 21 सप्टेंबरला

 



         गोंदिया, दि.8 : गोरेगाव तालुक्यात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला 21 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता लोकशाही दिनाचा कार्यक्रम तहसिलदार गोरेगाव यांचे अध्यक्षतेखाली, तहसिल कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही दिनानिमित्ताने तहसिलदार यांचेकडून जनतेच्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी एैकून घेण्यात येतील आणि शासनाच्या विविध विभागाचे तालुका स्तरावरील प्रमुख अधिकारी यांना त्या संबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील. तरी गोरेगाव तालुक्यातील जनतेच्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी असल्यास प्रपत्र-1 (अ) मध्ये विहीत केलेल्या अर्जामध्ये लेखी स्वरुपात सादर कराव्यात, असे आवाहन गोरेगाव तहसिलदार प्रज्ञा भोकरे यांनी केले आहे.

00000000


बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यवेक्षिकांची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

 



गोंदिया, दि.8 : अंगणवाडीतील बालकांना गुणवत्तापूर्ण पूर्वप्राथमिक शिक्षण देण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे ज्ञान व कौशल्य अद्ययावत होणे गरजेचे आहे. बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमामुळे सेविकांना निश्चितच अधिक सक्षम होता येईल, असा विश्वास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार SARTHAQ-2 मधील टास्क क्र. 19 अंतर्गत 12 वी व त्यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आला असून, सत्र 2026-27 मध्ये राज्यातील सर्व पात्र अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
याच अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिकांसाठी जिल्हास्तरीय एक दिवशीय उदबोधन प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राजकुमार हिवारे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य, गोंदिया CDPO प्रियंका किरणापुरे, सालेकसा CDPO श्रीमती बावणकर, विषय सहायक संदीप सोमवंशी व सुनील हरिनखेडे यांची उपस्थिती होती.
*12 मॉड्यूल्सवर सखोल मार्गदर्शन :*
प्रशिक्षणामध्ये बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील 12 मॉड्यूल्सवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच ब्लेंडेड मोड प्रशिक्षण म्हणजे काय, Unilearn अॅपवर बीट स्तरावर प्रशिक्षण कसे घ्यावे, स्वाध्याय व प्रात्यक्षिके कशी पूर्ण करून घ्यावीत, मूल्यांकन प्रक्रिया कशी राबवावी आणि अंतिम परीक्षा कशा पद्धतीने होणार याबाबत पर्यवेक्षिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणासाठी पर्यवेक्षिका उषा आगाशे, अश्विनी कदम, विशेष शिक्षक सतीश गजभिये व साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे यांनी सुलभक म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साधनव्यक्ती अनिता ठेंगडी व उर्मिला वैद्य यांनी विशेष सहकार्य केले.
00000000

Monday, 7 September 2026

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद


• सहा विभागांना याच महिन्यात भेटी
• विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद
गोंदिया, दि.8 : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे.
या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत.
टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक :
पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६
स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नागपूर विभाग — १६ सप्टेंबर २०२६
स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर
ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in
अमरावती विभाग — १७ सप्टेंबर २०२६
स्थळ : अमरावती
ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in
छत्रपती संभाजीनगर विभाग — २१ सप्टेंबर २०२६
स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर
ई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in
कोकण विभाग — २९ सप्टेंबर २०२६
स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई
ई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नाशिक विभाग — ३० सप्टेंबर २०२६
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
ई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात.
या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.
भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
00000000

स्वाधार योजनेंतर्गत अर्जातील त्रुटींची पुर्तता 10 सप्टेंबरपुर्वी करण्याचे आवाहन


गोंदिया, दि.7 : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील 11 वी, 12 वी व त्यानंतरचे व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेले, सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रियेनंतर वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https//hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन सुरु करण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि.26 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता व शैक्षणिक साहित्यासाठी लागणारी आर्थिक मदत थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत केली जाते. त्याकरीता विद्यार्थ्यांना https//hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असते. शैक्षणिक सत्र 2025-26 मधील बऱ्याच विद्यार्थ्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या त्रुटीपुर्तते अभावी विद्यार्थ्यांच्या आयडीवर परत (Send Back) करण्यात आले आहेत. शैक्षणिक सत्र 2025-26 मधील सद्यस्थितीत तालुकानिहाय गोंदिया तालुक्यातील 22, गोरेगाव 11, अर्जुनी मोरगाव 07, सडक अर्जुनी 04 व सालेकसा 01 असे एकुण 45 विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयामार्फत त्रुटी पुर्ततेकरीता विद्यार्थ्यांच्या आयडीवर परत पाठविण्यात आले आहे.
स्वाधार योजनेंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक सत्रात ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण कार्यालयाद्वारे सुचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जाची स्थिती Send Back दिसत आहे, त्या विद्यार्थ्यांना त्रुटीची पुर्तता करण्याकरीता दि.10 सप्टेंबर 2026 अंतिम मुदत देण्यात आली आहे, करीता विद्यार्थ्यांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जातील त्रुटींची पुर्तता (आवश्यक कागदपत्र अपलोड) करून अर्ज दि.10 सप्टेंबर पुर्वी कार्यालयाचे आयडीवर सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. नमुद दिनांकापर्यंत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली नाही व विद्यार्थी स्वाधार योजनेपासून वंचित राहिल्यास याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची राहिल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पुर्ततेकरीता Send Back करण्यात आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांच्या माहितीसाठी कार्यालयाच्या 07182-234117 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन संपर्क साधावा. असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी केले आहे.
00000000

भाडे तत्वावर वाहनाची आवश्यकता : अर्ज आमंत्रित


गोंदिया, दि.7 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया कार्यालयासाठी रोजगार मेळाव्याच्या प्रचार व प्रसाराकरीता, कार्यालयीन कामकाजाच्या आवश्यकतेनुसार कॉल बेसीसवर, ज्या दिवशी आवश्यकता पडेल त्यानुसार प्रती किलोमीटर दराप्रमाणे वाहन भाडे तत्वावर घेण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.
वाहन भाडे तत्वावर घेण्याबाबतच्या अटी व शर्तीच्या माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.210, आमगाव रोड, गोंदिया येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा दुरध्वनी क्रमांक 07182-299150 अथवा gondiyarojgar@gmail.com यावर संपर्क साधावा. असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया यांनी केले आहे.
00000000

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत बँकर्स कर्ज मेळाव्याचे आयोजन


गोंदिया, दि.7 : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत कर्जप्रक्रिया प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील 860 लाभार्थींसाठी विशेष कर्ज मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. जिल्हा अग्रणी प्रबंधक, बँक ऑफ इंडिया गोंदिया व जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ कार्यालयाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत दि.8 सप्टेंबर रोजी पंचायत समिती सभागृह आमगाव, 9 सप्टेंबरला पंचायत समिती सभागृह तिरोडा, 10 सप्टेंबर रोजी पंचायत समिती सभागृह गोंदिया व 16 सप्टेंबर 2026 रोजी पंचायत समिती सभागृह गोरेगाव येथे बँकर्स कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बँक प्रतिनिधींच्या उपस्थितीत लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून कर्ज प्रकरणाची पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तरी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत आयोजित या बँकर्स कर्ज मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी.बी. देवीपुत्र यांनी केले आहे.
00000000