जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 8 September 2016

पदमपूर येथे दप्तरविरहित दिवस साजरा विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा लाभ घेवून यशाची शिखरे गाठावी - उषा मेंढे : शिक्षणाचा प्रगतीसाठी उपयोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन




        गोंदिया,दि.8 : विद्यार्थ्यांनी जीवनात वेळेला महत्व दयावे. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आज मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. पुर्वी आजसारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा फायदा घेवून यशाची शिखरे गाठावी असे आवाहन जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
      8 सप्टेबर रोजी आमगाव तालुक्यातील पदमपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दत्परविरहित दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून श्रीमती मेंढे बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, नामदेवराव सूर्यवंशी, सुशिलाबाई सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसिलदार साहेबराव राठोड, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, सरपंच सिताबाई पाथोडे, उपसरपंच श्री.किरणापुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय ब्राम्हणकर, उपाध्यक्ष गणेश तलमले, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.घोषे, केंद्रप्रमुख श्री.रामटेके, रुम टू रिड या मुंबई येथील सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी राज शेखर, सर्व शिक्षा अभियानचे जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन, पोलीस निरिक्षक श्री.सांडभोर, पत्रकार ओ.बी.डोंगरवार, नरेश रहिले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        श्रीमती मेंढे पुढे म्हणाल्या, विविध स्पर्धेच्या बाबतीत ग्रामीण भागातील मुले शहरी भागातील मुलांपेक्षा कमी नाहीत. त्यांना योग्य मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध झाल्या तर ते शहरी भागातील मुलांपेक्षाही पुढे जातील. माणसाच्या जीवनात प्रतिस्पर्धी असेल तर यश नक्की मिळते असेही मेंढे यावेळी म्हणाल्या.
       डॉ.सूर्यवंशी म्हणाले, आयुष्यात 50 ते 60 वर्षे मजेत राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी खूप शिकावे. विविध स्पर्धेत सहभागी व्हावे. चुकणे आणि शिकणे हे शाळेतच होते. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी शिक्षणाचा उपयोग करावा असे आवाहनही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
      दर महिन्यातून एकदा जिल्ह्यातील वर्ग 1 आणि वर्ग 2 चे अधिकारी विविध शाळांना भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधून आम्ही कसे घडलो याबाबतची माहिती प्रेरणा दिनातून देत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना यापासून प्रेरणा मिळत आहे. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी भरपूर खेळले पाहिजे तसेच भरपूर अभ्यास सुध्दा केला पाहिजे. आईवडिलांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी केलेल्या कष्टामुळे आपण या पदापर्यंत पोहोचल्याचे सांगितले. मुलांच्या आयुष्यात यशस्वी होण्यात त्यांच्या गुरुजनांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या मार्गदर्शनातूनच पुढे जायचे असते असेही त्यांनी सांगितले.
         सुशिलाबाई सूर्यवंशी बोलतांना म्हणाल्या, धनाची पेटी असलेल्या मुलींना पालकांनी खुप शिकवावे. आई ही पहिली शिक्षिका असते. बेटी बचाओ बेटी पढाओ हा संकल्प प्रत्येक पालकांनी केला पाहिजे. वेळेचे महत्व समजून पालकांनी मुलांचा अभ्यास नियमीत घ्यावा. शिक्षण हे महत्वाचे धन असून ते कधीच वाया जात नाही. शिक्षण हे महत्वाचे दान आहे. शिक्षकाची नोकरी ही प्रेरणादायी आहे असेही त्या म्हणाल्या.
        प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी परिपाठ सादर केला. सर्व धनापेक्षा विद्याधन हे सर्वश्रेष्ठ धन असल्याचा सूविचार विद्यार्थ्यांनी सांगितला. दिन विशेषाचा उल्लेख करतांना आज जागतिक साक्षरता दिन व दप्तरविरहित दिन असल्याचे सांगितले. भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, माणूसकी ही बोधकथा, आठच्या पाढ्याचे सामुहिक वाचन, सामान्य ज्ञानाच्या प्रश्नावरुन सारे जहाँ से अच्छा हिंदूस्ता हमारा या गीताचे कवी इकबाल, संगणकाचा संशोधक, भारताची उडन परी, आद्यक्रांतीकारक यावर सामान्य ज्ञानाचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या गटाने उपस्थित विद्यार्थ्यांना विचारले. जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी दिली.
       तहसिल कार्यालय आमगावच्या वतीने इयत्ता पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व बिस्कीट देवून करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एस.एम.उपलपवार, श्री.देशमुख, शाळेतील शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, माता पालक संघ, शिक्षक पालक संघउ  यांचे पदाधिकारी, तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक एस.एम.उपलपवार यांनी मानले.

00000

3 comments: