जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 30 September 2016

डॉ.सूर्यवंशी हे आदर्श जिल्हाधिकारी - आ.गोपालदास अग्रवाल

गोंदिया, दि.30 : जिल्हाधिकारी म्हणून काम करतांना डॉ.सूर्यवंशी यांनी सर्वांना सोबत घेवून काम केले आहे. जिल्ह्यात सर्वांशी त्यांनी चांगले संबंध निर्माण केले. जिल्ह्यात सारस महोत्सव, कायापालट योजना यासह अनेक योजना त्यांनी प्रभावीपणे राबविल्या. त्यामुळे डॉ.सूर्यवंशी हे आदर्श जिल्हाधिकारी आहे, असे गौरोदगार राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.गोपालदास अग्रवाल यांनी काढले.
            29 सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून दिल्ली येथे बदली झाल्यामुळे आयोजित निरोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून आमदार अग्रवाल बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते हे होते. आरती सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.डी.शिंदे, उपविभागीय अधिकारी मोहन टोणगावकर, सुनिल सूर्यवंशी, जिल्हा खनीकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहाद्दूर तिडके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
            आ.अग्रवाल पुढे म्हणाले, देशाच्या संरक्षण मंत्रालयाला देखील डॉ.सूर्यवंशी यांच्या सारख्या सनदी अधिकाऱ्याची गरज आहे. त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. गोंदिया शहराच्या स्वच्छतेत त्यांनी पुढाकार घेवून प्रत्यक्षात स्वच्छतेला सुरुवात केली. आपल्या 24 वर्षाच्या काळात डॉ.सूर्यवंशी यांच्यासारखे जिल्हाधिकारी जिल्ह्याला मिळाले नसल्याचे आ.अग्रवाल यांनी सांगितले.
        सत्काराला उत्तर देतांना डॉ.सूर्यवंशी म्हणाले, आपल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात सर्वांकडून चांगले सहकार्य मिळाल्यामुळे आपण विविध उपक्रम यशस्वीपणे राबवू शकलो. जिल्ह्यात पर्यटन आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला भरपूर वाव आहे. लोकांना जेव्हा मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात तेव्हाच ते सोडविण्यासाठी आपल्याकडे   येतात.
            आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे समाधान झाले पाहिजे असे सांगून डॉ.सूर्यवंशी म्हणाले, चांगले काम केले तर आपण नक्की यशस्वी होतो. केलेल्या कामातून लोकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आनंद दिला पाहिजे. चौकटीबाहेर काम करुन जास्तीत जास्त लोकांना आपली मदत झाली पाहिजे. ज्या पदावर आपण काम करीत आहोत तेथे ध्येय ठेवून विकासात योगदान दिले पाहिजे. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
            श्री.मोहिते म्हणाले, गोंदिया हा नक्षल जिल्हा असल्याची ओळख पुसून डॉ.सूर्यवंशी यांनी पर्यटनात जिल्ह्याची नविन ओळख करुन दिली आहे. महाराजस्व अभियान, पर्यटन, महसूल वसूलीचे उद्दिष्ट पूर्ण करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य माणसांचा लोकसेवक म्हणून डॉ.सूर्यवंशी यांनी काम केले आहे.
            श्री.महिरे म्हणाले, कामानिमीत्त भेटीसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस आस्थेवाईकपणे जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी करायचे. खऱ्या अर्थाने लोकसेवकाची भूमिका जिल्हाधिकारी यांनी पार पाडली आहे. प्रत्येक व्यक्तीला समजून घेवून त्यांच्या अडचणी देखील ते विचारत असायचे. विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ त्यांच्याच पुढाकारामुळे लाभार्थ्यांना वेळेत मिळाला.
             यावेळी उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहाद्दूर तिडके, तिरोडा उपविभागीय अधिकारी सूनिल सूर्यवंशी, देवरी तहसिलदार संजय नागटिळक, लेखाधिकारी श्री.बाविसकर, संजय धार्मिक, चैताली मानकर, संतोष शेंडे, वाहन चालक श्री.तिवारी, परिचर श्री.नाकाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
          अपर जिल्हाधिकारी मोहिते यांनी डॉ.सूर्यवंशी व श्रीमती सूर्यवंशी यांना सारस पक्षांचे दोन तैलचित्र तसेच सर्व तहसिलदार यांनी देखील सारस पक्षाचे तैलचित्र भेट म्हणून दिले.
            कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, गोंदियाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी के.डी.मेश्राम, तहसिलदार सर्वश्री अरविंद हिंगे, विठ्ठल परळीकर, संजय नागटिळक, रविंद्र चव्हाण, साहेबराव राठोड, प्रशांत सांगडे, प्रशांत घोरुडे, सहायक अधीक्षक श्री.किरीमकर, सहायक लेखा अधिकारी कुलदिप गडलिंग, नियोजन अधिकारी श्री.कडू, लेखाधिकारी श्री.मसराम, नायब तहसिलदार विलास कोकवार, नाझर श्री.मेनन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, मंडळ अधिकारी श्री.कोल्हटकर, आकाश चव्हाण, श्री.झरारीया, श्री.राऊत यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांनी केले. उपस्थितांचे आभार लेखाधिकारी श्री.बाविसकर यांनी मानले.

                                                                        00000

No comments:

Post a Comment