गोंदिया,दि.8 : विविध शैक्षणिक उपक्रम राबवून
राज्यात नावलौकीक मिळविलेल्या गोंदिया जिल्ह्याने 8 सप्टेबर रोजी जिल्ह्यातील सर्व
शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी दप्तरविरहित दिन साजरा करुन वाचनाचा आनंद अनुभवला.
शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेमधूनच वाचनीय पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली. या पुस्तकामध्ये
थोर पुरुषांचे जीवनचरित्र, छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तके उपलब्ध करुन देण्यात
आली. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना दप्तरविरहित दिनामुळे सुट्टी देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना अवांतर पुस्तक वाचनाची आवड
निर्माण व्हावी, विविध वैचारीक स्वरुपातील पुस्तके वाचून विद्यार्थ्यांची
सकारात्मक विचारसरणी तयार व्हावी तसेच त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी
विद्यार्थ्यांनी दप्तरविरहित दिनाच्या निमित्ताने पुस्तके वाचनाचा आनंद घेतला.
शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या पुस्तकांसोबतच गावात व शेजारच्या गावात असलेल्या
सार्वजनिक वाचनालयातून वाचन आनंद दिवसासाठी पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये वाचानाची आवड निर्माण होत असल्याचे यामधून दिसून आले. वाचन चळवळ
भक्कम करण्यासाठी दप्तरविरहित दिवस उपयुक्त ठरला.
जिल्ह्याचे
उपक्रमशील व लोकाभिमुख जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याच संकल्पनेतून
दप्तरविरहित दिवस जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शाळांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा
करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी आमगाव तालुक्यातील आदर्श गाव व
महाकवी भवभूती यांची जन्मभूमी असलेल्या पदमपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट
दिली. या भेटीप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे तर होत्याच,
सोबत जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांचे वडील नामदेवराव सूर्यवंशी आणि आई सुशिलाबाई
सूर्यवंशी देखील उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांचे आईवडील देखील या
दप्तरविरहित दिनाचे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. त्यांची उपस्थिती तर अनेकांना
प्रेरणादायी ठरली. नामदेवराव सूर्यवंशी हे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी
तर आई सुशिलाबाई हया राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेल्या
सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या आईवडिलांनी
सुध्दा विद्यार्थ्यांच्या वर्गात जावून त्यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी
डॉ.सूर्यवंशी यांनी 8 व्या वर्गातील विद्यार्थ्यांशी डिजीटल वर्गात संवाद साधला.
आपले अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांना पदमपूर गावाचे वैशिष्ट्य विचारले. महाकवी
भवभूतीचा इतिहास सुध्दा विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला. कोणकोणती
पुस्तके वाचता, शाळा सुटल्यानंतर काय करता, सकाळी किती वाजता उठता, कोणाच्या घरी
शौचालय नाही याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली. फुटबॉलपटू
रोनाल्डो, मेसी, ऑलिम्पीक स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंची माहिती, संत पद
मिळालेल्या मदर टेरेसा यांची माहिती देखील विद्यार्थ्यांना त्यांनी दिली.
उपस्थित
विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही प्रश्न देखील विचारले. तुमचा आदर्श
थोरपुरुष, आवडते पुस्तक, आवडता खेळ तर जिल्हाधिकारी पदावर जाण्याची प्रेरणा
तुम्हाला कोणापासून मिळाली असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारले असता
जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरीत त्या प्रश्नाचे उत्तर आईवडील हे सांगताच आईवडील हे
प्रेरणादायी आणि पहिले गुरु असतात हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. याच शाळेत आता
आम्हाला 10 व्या वर्गापर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे अशी अपेक्षा
विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी
शाळेतील सर्व वर्गात जावून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रत्येक वर्गात
जिल्हाधिकाऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात केले.
शाळेचा रमनीय परिसर, स्वच्छता व शिस्त आणि गणवेशात असलेली जिल्हा परिषद शाळेतील
मुलांना भेटून जिल्हाधिकारी त्यांच्याच संकल्पनेतील दप्तरविरहित दिनात आनंदी दिसत
होते. शाळा व्यवस्थापन समिती, शाळेतील शिक्षक वर्ग, ग्रामपंचायतच्या
पदाधिकाऱ्यांशी देखील जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांशी
संवाद साधण्याचा दप्तरविरहित दिनामुळे योग आल्याचे बघून विद्यार्थ्यांच्या
चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
00000




No comments:
Post a Comment