जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday, 23 May 2020

कोरोना पार्श्वभूमीवर यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे - आयुक्त डॉ.संजीव कुमार




         जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून व राज्यातून येणाऱ्या  व्यक्तींमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहून काळजीपूर्वक काम करावे. असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी दिले.
      जिल्हाधिकारी कार्यालयातील  नियोजन समितीच्या सभागृहात आज २३ मे रोजी कोरोना विषाणू संदर्भात आयोजित आढावा सभेत ते बोलत होते. सभेला अपर आयुक्त अभिजित बांगर, पब्लिक हेल्थ फाउंडेशनचे डॉ.संजय झोडापे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
        आयुक्त डॉ.संजीव कुमार पुढे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. प्रत्येकाने टीम वर्क म्हणून काम करावे. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनीटायझरचा वापर करणे, हँड वॉशच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. आयसोलेशन वार्डमध्ये असलेल्या रुग्णांची दररोज नियमीत आरोग्य तपासणी करण्यात यावी. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे समुपदेशन करण्यात यावे. क्षयरुग्णांची विशेष काळजी घेण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यात जे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत,त्या रुग्णांवर योग्य ते उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.   
       सभेला सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, राहूल खांडेभराड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हिंमत मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, शिल्पा सोनाळे, रविंद्र राठोड, गंगाराम तळपाडे, गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील व आय.एम.ए.चे डॉक्टर्स उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment