जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 8 May 2020

अखेर ती वाघीण जेरबंद गोरेवाडयाकडे रवानगी

पाच जणांचे घेतले प्राण




      जिल्ह्यातील गोरेगाव आणि तिरोडा वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीने मागील महिन्यात  एक पुरूष आणि एका महिलेवर हल्ला करून महिन्यात प्राण घेतले. गोंदिया वन विभाग आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभाग, गोंदिया यांनी सुसज्ज अशा १६ चमू या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी गठीत केल्या होत्या. अखेर या वाघिणीला सात मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता बागडबंद गावानजीकच्या गुमडोह तलाव परिसरात जेरबंद करण्यात यश आले. त्यामुळे या वाघिणीच्या दहशतीत जगणाऱ्या बफर क्षेत्रातील गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या वाघिणीला जेरबंद करून तिची रवानगी नागपूर जवळील गोरेवाडा प्राण संग्रहालयाकडे करण्यात आली आहे.
          एन-१ या नावाच्या या वाघिणीला पकडण्यासाठी ब्रम्हपुरीपासूनच प्रयत्न सुरू होते. ही वाघिण जवळपास तीन वर्षांची असून ती ब्रह्मपुरी वन विभागातून नवेगाव अभयारण्यात,तेथून नागझिरा अभयारण्याकडे आली. तिथून पुढे नागझिऱ्याच्या बफर क्षेत्रात  वावरू लागली. 
         ब्रह्मपुरी वन विभागात असतांना या वाघिणीने तीन लोकांचे प्राण घेतले. त्यामुळे तेथूनच तिला पकडण्याचे प्रयत्न सुरु झाले. तिथे न सापडता पुढे ती गोंदिया जिल्ह्याच्या सीमेत आली. नागझिऱ्याच्या बफर क्षेत्रातील धानुटोला येथील एका पुरुषावर हल्ला करून त्याला ठार केले. त्यानंतर 20 दिवसांनी नागझिरा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मंगेझरी गावानजीकच्या बफर क्षेत्रात एका महिलेला ठार केले. त्यामुळे या वाघिणीला आता कुठल्याही परिस्थितीत जेरबंद करण्याचे आदेश मुख्य वन्यजीव रक्षक  वनसंरक्षक (वन्यजीव) तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण संस्था, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तांत्रिक समितीचा सल्ला घेऊन दिले.
         या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी तसेच सुसज्ज रेस्क्यू टीम, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदियाचे पशुवैद्यकीय अधिकारी व रेस्क्यू टीम आणि गोंदिया वनविभागाची रेस्क्यू टीम यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती.अखेर या सर्वांनी या वाघिणीला पकडण्याची मोहीम फत्ते केली.
        वाघिणीला जेरबंद करण्याच्या मोहिमेमध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोड, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.नंदकिशोर खोडस्कर, एकोडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक गजरे यांनी सहभाग घेतला. एन-१ या वाघिणीला  जेरबंद करण्याच्या कार्यवाहीमध्ये नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक तथा वनसंरक्षक श्री. रामानुजम, गोंदिया वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. एस. युवराज, वन्यजीव विभागाच्या साकोली येथील उपसंचालक श्रीमती पूनम पोटे, वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक आर.आर.सदगीर, गोंदिया जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे यांच्या मार्गदर्शनात गोंदिया वन विभागातील आणि  नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील शीघ्र कृती दल आणि वन्यजीव विभागाच्या विशेष कृती दलाने तसेच गोंदिया वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याच्या प्रयत्नातून हे यश मिळाले आहे.

No comments:

Post a Comment