जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 11 May 2020

दूध उत्पादकांनी खरेदी केंद्रावर उत्तम दर्जाचे दूध आणावे - ना.सुनील केदार

गोंदिया येथे दूध खरेदी केंद्राचे उद्घाटन


           मागील चार महिन्यापासून जिल्ह्यातील शासकीय दध खरेदी केंद्र बंद असल्यामुळे त्याचा परिणाम शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर झाला होता. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता आजपासून दुध खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या केंद्रावर उत्तम दर्जाचे दूध विक्रीसाठी आणावे. असे आवाहन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले. 
        आज 11 मे रोजी गोंदियाजवळील कुडवा येथील शासकीय दूध योजना केंद्रावर दूध खरेदी केंद्राचे श्री केदार यांनी फीत कापून उद्घाटन केले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, मनोहरराव चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, प्रादेशिक  दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हेमंत गडवे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डी.आर.लाखे, जिल्‍हा पशुसंवर्धन उपआयुक्‍त डॉ.संजय गायगवळी, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ.राजेश वासनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
         श्री. केदार म्हणाले, शासकीय दूध खरेदी केंद्रावर भेसळयुक्त दूध स्वीकारले जाणार नाही. दुधात भेसळ आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. ज्या दूध संकलन केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहे, त्या शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न राहणार आहे. शासकीय दूध खरेदी केंद्रावर सोलर पॅनल लावून विजेचा खर्च कमी करावा. येथील शासकीय दूध खरेदी केंद्राची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यासाठी सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षत असून हे शासकीय दूध खरेदी केंद्र सुरू झाल्याने याचा लाभ जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        यावेळी मंत्री केदार यांनी शासकीय दूध खरेदी केंद्राची पाहणी केली. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकरी व नागरीक उपस्थित होते.
00000



No comments:

Post a Comment