जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 18 May 2020

वनविभागाने वाचविले विहिरीत पडलेल्या अस्वलांचे प्राण सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडले


         उन्हाळा सुरू झाल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलातील नदी- नाले, पाणवठे तर काही शेतात असलेल्या विहिरीकडे धाव घेतात. पाण्याच्या शोधात असलेले दोन अस्वल आज १८ मे रोजी सालेकसा तालुक्यातील जांभळी गावाजवळील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत पडले. वनविभागाच्या शघ्र कृती दलाने तातडीने याची दखल घेऊन त्या अस्वलांना विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. सालेकसा तालुक्यातील जांभळी या गावाजवळील एका शेतकऱ्याच्या विहिरीत पहाटे ३ ते ४ वाजता दरम्यान दोन अस्वले पडल्याची माहिती सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.इलमकर यांना मिळाली. तातडीने श्री इलमकर व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. 
        विहिरीत पडलेल्या एक नर व मादी अस्वलाला जिवंत सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी गोंदिया येथील वनविभागाच्या व नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या शीघ्र कृती दलाशी संपर्क करण्यात आला. उपवनसंरक्षक एस.युवराज यांच्या आदेशाने दोन्ही शीघ्र कृती दल घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही कृती दले आणि सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन्ही अस्वलांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर त्यांना पिंजऱ्यात बंद करून घनदाट जंगलात सोडण्यात आले. 
         रेस्क्यू ऑपरेशनमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच अस्वलांना इजा देखील झाली नाही. अस्वलांचे रेस्क्यू ऑपरेशन नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या शीघ्र कृती दलाचे डॉ. खोडस्कर आणि देवरीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वराडपांडे  यांच्या उपस्थितीत करण्यात आले. रेस्क्यू ऑपरेशनची कार्यवाही सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी ए.बी.इलमकर यांच्या नेतृत्वात दोन्ही चमूने अवघ्या चार तासात यशस्वीरीत्या पूर्ण केली.
         जांभळी परिसरातील ग्रामस्थांनी दोन्ही अस्वलांना सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविल्याबद्दल वनविभागाचे  कौतुक केले.

No comments:

Post a Comment