जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday, 16 June 2026

जिल्ह्यात 30 जून पर्यंत मनाई आदेश लागू

 

    

      गोंदिया, दि.16 : जिल्ह्यात दि.16 ते 30 जून 2026 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्ता रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. तसेच 18 जून रोजी विधान परिषद निवडणूक, 21 जूनला नीट (NEET) परीक्षा, 26 जून रोजी मोहरम, सण/उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियम क्रमांक 22 चे कलम 37 (1) (3) अन्वये दि.16 जून पासून ते 30 जून 2026 पर्यंत अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.                        

                                                                     0000000

बीडी कामगारांच्या मुला-मुलींना मिळणार शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याचे आवाहन



गोंदिया, दि.16 : 1 जून 2026 पासून गोंदिया जिल्ह्यातील बीडी कामगार तसेच इतर श्रम क्षेत्रात कार्यरत कामगारांच्या पाल्यांना राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शैक्षणिक, आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत

सदर योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दि.1 जून 2026 पासून सुरु झालेली आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली पासून ते व्यवसायिक अभ्यासक्रमांपर्यंत (बी.एड., एमबीबीएस, एमबीए) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

लाभार्थ्यांना दरवर्षी 1 हजार ते 25 हजार रुपये या मर्यादित आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल. यासाठी इच्छुक विद्यार्थी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP Scholarship.gov.in) द्वारे ऑनलाईन अर्ज करु शकतात. प्री मॅट्रिक विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे व पोस्ट मॅट्रिक विद्यार्थ्यांसाठी अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2026 निर्धारित केलेली आहे.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी, बीडी कामगार दवाखाना, गोंदिया यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी बीडी कामगार दवाखाना, छोटा पाल चौक, कन्हारटोली, गोंदिया येथे संपर्क साधावा.

Friday, 12 June 2026

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद




*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

• *समाजहितासाठी उद्योग क्षेत्राचे योगदान प्रेरणादायी*

           *मुंबई/गोंदिया, दि.12 :* अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने सामाजिक उत्तरदायित्वातून (सीएसआर) बालरुग्णांसाठी कर्करोग निदान सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे ९४ बालकांच्या आणि त्यांच्या पालकांच्या जीवनात नवी उमेद जागविण्याचे प्रेरणादायी काम झाले आहे,अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सुविधेचे कौतुक केले आहे. 
           अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने २०२५-२६ मध्ये शिक्षण, आरोग्य सेवा आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये सीएसआरच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये शिक्षण क्षेत्राला विशेष प्राधान्य असले तरी आरोग्य क्षेत्रातही महत्वाचे काम केले आहे. देशभरातील कर्करोगाचा संशय असलेल्या बालरुग्णांसाठी तातडीची निदान सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाअंतर्गत अफकॉन्सने टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून "कर्करोगाचा संशयित आजार असलेल्या बालरुग्णांसाठी आपत्कालीन निदान सहाय्य सेवा" या योजनेसाठी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या सहाय्यामुळे देशभरातील ९४ बालकांना कर्करोगाचे तातडीने निदान आणि आवश्यक वैद्यकीय तपासण्या उपलब्ध होऊ शकल्या.
            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कर्करोगासारख्या गंभीर आजारामध्ये वेळेवर निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असते. आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना आवश्यक तपासण्या करता येत नाहीत. अशा परिस्थितीत अफकॉन्सने दिलेली मदत केवळ आर्थिक सहाय्य नसून अनेक बालकांच्या उपचार प्रक्रियेला गती देणारी आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणारी ठरली आहे. शासनाच्या प्रयत्नांना उद्योग क्षेत्राची अशी साथ मिळाल्यास आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासाची उद्दिष्टे अधिक वेगाने साध्य होऊ शकतात. म्हणूनच समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागीदारी अधिक बळकट होणे आवश्यक आहे.
            कॉर्पोरेट क्षेत्राच्या सामाजिक बांधिलकीचे हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरत असल्याचे नमूद करुन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अफकॉन्सने शिक्षण क्षेत्राबरोबरच महिला सक्षमीकरण आणि आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये केलेली गुंतवणूक ही शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. समाजातील गरजू घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा सीएसआर उपक्रमांची भूमिका अत्यंत मोलाची ठरते.
00000000

Thursday, 11 June 2026

गोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण सोडत आज


विशेष ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन
            गोंदिया, दि.11 :राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे दि.26 मे 2026 चे पत्रान्वये राज्यातील सन 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या व सन 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचे कार्यक्रमानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 पोट कलम (2) या उपबंधास व त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमास अधिन राहून गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव, खाडीपार, कवलेवाडा, चिल्हाटी, गोंदेखारी, हिरापुर, हिराटोला, तेढा, मेंघाटोला, गिधाडी, तिल्ली, मोहगाव बु., घोटी या ग्रामपंचायतीची सभा दि.12 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. तर बोरगाव, आसलपाणी, चिचगाव, म्हसगाव, शहारवानी, मलपुरी, तुमसर, चोपा, पाथरी, कालीमाटी, तेलनखेडी, सोनी या ग्रामपंचायतीची सभा दि.12 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे.
            सदर ग्रामपंचायतीच्या सन 2026 मध्ये घ्यावयाच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींना लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने व एकूण आरक्षण 50 % च्या मर्यादित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाला जागा राखून ठेवल्यानंतर अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांचे आरक्षण सोडत पध्दतीने निश्चित करावयाचे आहे. त्यामुळे नमुद करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी विशेष ग्रामसभा आयोजीत करण्यात आलेली आहे.
           संबंधित ग्रामपंचायतीमधील मतदार म्हणून पात्र असलेल्या ज्या ग्रामस्थांची विशेष ग्रामसभेस हजर राहण्याची इच्छा असेल त्यांनी नेमून दिलेल्या दिनांकाला विशेष ग्रामसभेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका निवडणूक अधिकारी (ग्रामपंचायत निवडणूक), तथा तहसिलदार गोरेगाव यांनी केले आहे.
                                                    0000000

प्रत्येक आस्थापनेत अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक


*सर्व आस्थापनांच्या अंतर्गत तक्रार निवारण समित्यांची तपासणी मोहीम सुरु*  
              गोंदिया, दि.11 : केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय व खाजगी कार्यालयामध्ये ज्या आस्थापनेवर दहा किंवा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत अशा प्रत्येक आस्थापनेत अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. सदर कायदा महिलांसाठी आश्वासक वातावरण निर्मितीसाठी व महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी कायदा आहे.
             अधिनियमातील कलम 26 मध्ये जर एखाद्या मालकाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही, कायद्यातील कलम 13, 14, 22 नुसार कार्यवाही केली नाही तसेच या कायद्यातील व नियमातील विविध तरतुदींचे व जबाबदाऱ्यांचे पालन केले नाही तर मालकाला 50 हजार रुपयापर्यंत दंड होईल. तसेच हा प्रकार पुन्हा केल्यास आस्थापनेचा परवाना रद्द आणि दुप्पट दंड अशी तरतूद आहे.
             शासकीय व खाजगी आस्थापना, कंपनी, एमआयडीसी कंपनी, मॉल, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, दुकाने, बँक, खासगी उपक्रम, संस्था, इंटरप्रायजेस, अशासकीय संघटना, सोसायटी ट्रस्ट, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार रुग्णालये, सुश्रूशालये, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडा संकुले तसेच इतर खासगी आस्थापना इत्यादी ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.
            तसेच त्याबाबतची माहिती ही केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या SHE BOX PORTAL च्या https://shebox.wcd.gov.in या संकेतस्थळावर अंतर्गत तक्रार समितीची नोंद करण्यासाठी आवश्यक त्या सर्व माहितीचा तपशील भरून अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंद करणे सर्व आस्थापनांना बंधनकारक आहे.
            महाराष्ट्र शासनाने दि. 14 मे 2026 रोजी शासन निर्णयाद्वारे सदर कायद्यांतर्गत आस्थापनांच्या अंतर्गत तक्रार समितीची तपासणी करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यानुसार सदर अधिकारी/कर्मचारी जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांची प्रत्यक्ष तपासणी सुरु झालेली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधितांना आदेश दिले आहेत त्यांना सहकार्य करण्यात यावे.
           जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून त्याबाबतची नोंद संकेतस्थळावर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.
                                                              00000000

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून रोजी


*16 केंद्रावर होणार शिक्षक पात्रता परीक्षा*
*8073 भावी शिक्षक व कार्यरत शिक्षक सोडविणार पेपर*
            गोंदिया, दि.11 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतल्या जाणान्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ही रविवार दि.28 जून 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यातील 16 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत 8073 भावी शिक्षकव  कार्यरत शिक्षक सहभागी होणार आहेत. 
            ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योग्य नियोजन व आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा परीक्षा आयोजन व सनियंत्रण समिती यांचे अध्यक्षतेखाली 18 मे रोजी सभा घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पवन खंदारे, पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार, कोषागार अधिकारी मोहम्मद तौसिफ, डायटचे प्राचार्य राजकुमार हिवारे, उपशिक्षणाधिकारी (योजना) संदेश जाधव, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) गजानन मंदाडे उपस्थित होते.
            दिनांक 28 जून 2026 रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) परीक्षा आयोजनाची सविस्तर माहिती शिक्षणाधिकारी पवन खंदारे यांनी दिली. 
            निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पुढीलप्रमाणे सूचित केले. 4 ते 5 भरारी पथके नियुक्त करण्यात यावी. 16 परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. परीक्षेचे गोपनीय साहित्य जिल्हा कोषागार कार्यालयात व्यवस्थित ठेवण्यात यावे. परीक्षेचे गोपनीय साहित्य लिक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तापमान जास्त असल्याने प्रत्येक केंद्रावर आपतकालीन वेळेसाठी कुलरची व्यवस्था ठेवण्यात यावी. आवश्यकता असल्यास उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी पेंडाल लावण्यात यावे. सर्व केंद्रांवर पिण्याचे पाणी उपलब्ध असावे. सर्व परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा असल्याची खात्री शिक्षणाधिकारी यांनी करावी. दिव्यांग परीक्षार्थी यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता सर्व केंद्र संचालकांनी घ्यावी.
            *या वेळेत होणार परीक्षा :* सदर परीक्षा गोंदिया शहरातील 10 परीक्षा केंद्रावर होणार असून पेपर क्र.1 सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 या वेळेत होईल. या पेपरसाठी 3707 उमेदवार परीक्षा देणार असून, पेपर क्र.2 दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.00 या वेळेत होईल. या पेपरसाठी 4366 उमेदवार परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना 16 जून ते 28 जून या कालावधीत प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत. सर्व परीक्षार्थ्यांनी पुरेसा अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण करावी, असे आवाहन सभेच्या माध्यमातून करण्यात आले.
0000000

Tuesday, 9 June 2026

गोंदिया पोलिसांचा स्तुत्य उपक्रम :'संडे ऑन सायकल' रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

गोंदिया पोलिसांचा स्तुत्य उपक्रम :'संडे ऑन सायकल' रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

"आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि पोलीस-जनता ऐक्याचा दिला संदेश ;

250 हून अधिक सायकलस्वार सहभागी"




गोंदिया, दि.9 : सुदृढ शरीर, सशक्त मन आणि सुरक्षित समाज या प्रेरणादायी संकल्पनेला मूर्त रूप देत गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जागतिक सायकल दिन आणि 'फिट इंडिया अभियान' निमित्त दि.6 जून 2026 रोजी पोलीस मुख्यालय कारंजा येथे संडे ऑन सायकल या विशेष उपक्रमाचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.

मा.पंतप्रधानांनी सुरू केलेल्या 'फिट इंडिया' अभियानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणपुरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि पोलीस-जनता संबंध अधिक दृढ करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पोलीस अधिकारी, अंमलदार, त्यांचे कुटुंबीय, पोलीस मित्र, विद्यार्थी, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध क्षेत्रातील सुमारे 250 हून अधिक सायकलप्रेमींनी पोलीस मुख्यालय कारंजा येथे हजेरी लावली.

प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या 5 किलोमीटर अंतराच्या सायकल रॅलीला सुरुवात झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी हिरवी झेंडी दाखवत सायकल रॅलीची औपचारिक सुरुवात केली. ही रॅली फुलचूर मार्गे मार्गक्रमण करत कमालीच्या शिस्तीत आणि उत्साहात पुन्हा पोलीस मुख्यालय येथे विसावली.

सायकलिंग ही केवळ शारीरिक तंदुरुस्तीची साधना नसून स्वच्छ पर्यावरण, मानसिक स्वास्थ्य आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा मार्ग आहे, हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. रॅली दरम्यान संपूर्ण परिसरात सामाजिक एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे खाकी वर्दीतील कर्तव्यकठोरता बाजूला ठेवून पोलीस अधिकारी आणि सामान्य नागरिक एकाच रंगात रंगून आरोग्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा नवा संकल्प करत होते. कार्यक्रमात सहभागींनी नियमित व्यायाम, योग, सायकलिंग आणि आरोग्यदायी सवयी आत्मसात करण्याचे आवाहन स्वीकारले.




सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर, प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह रामदास शेवते, पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा नागेश भास्कर, राखीव पोलीस निरीक्षक राजेश सरोदे व दिपक शेंडे, पोलीस उपनिरीक्षक नक्षल सेल श्रीकांत हत्तीमारे तसेच पोलीस मुख्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयातील अंमलदार यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

यावेळी जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार, शाखा प्रमुख, तसेच अधिनस्त पोलिस अधिकारी आणि अंमलदार आवर्जून उपस्थित होते. या रॅलीत 'संडे सायकल ग्रुप, गोंदिया'चे सदस्य, तसेच आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध धावपटू मुन्ना यादव यांनी देखील आपली विशेष उपस्थिती नोंदवून उपक्रमाची शोभा वाढवली.

आरोग्यदायी नागरिक हेच राष्ट्राची खरी ताकद आहेत हा संदेश देणारा गोंदिया पोलिसांचा संडे ऑन सायकल उपक्रम केवळ एक उपक्रम न राहता आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि पोलीस-जनता सहभाग यांचा एक प्रेरणादायी उत्सव ठरला. या उपक्रमाने प्रत्येक सहभागीच्या मनात तंदुरुस्त जीवनशैलीचा नवा संकल्प रुजविला.



00000000