जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 2 October 2020

माझे कुटूंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ



जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या आजारावर प्रतिबंध घालून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आज 3 ऑक्टोबर रोजी माझे कुटूंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृतीया मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 10 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे, तहसीलदार राजेश भांडारकर, अपर तहसीलदार अनिल खडतकर, गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी सुनील चावला व विक्की थदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया येथील गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

        माझे कुटूंब-माझी जबाबदारीही राज्य शासनाची महत्वाकांक्षी मोहिम आहे. या मोहिमेद्वारे जिल्ह्यात माझे कुटूंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृतीअभियान राबविण्यात येत आहे. या नाविन्यपूर्ण अभियानाद्वारे एकाच दिवशी जिल्ह्यातील 10 लाख लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. याकरीता अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, आरोग्य यंत्रणा, अंगणवाडी सेविका, महसूल विभाग, पोलीस विभाग, सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी, समाजसेवी व्यक्ती आणि कर्तव्यदक्ष नागरिक तसेच इतर नागरिक जे स्वेच्छेने या मोहिमेत सहभागी होवून जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबाच्या घरोघरी जावून कोरोना बाबतची माहिती आणि काय करावे व काय करु नये याची माहिती देणार आहेत. तसेच एका व्यक्तीद्वारे 10 व्यक्तींना जी माहिती देण्यात आलेली असून त्या 10 कुटूंबाने प्रत्येकी 10 लोकांमध्ये या मोहिमेविषयी जनजागृती करण्याचे आजच्या या मोहिमेतून आवाहन करण्यात येत आहे.

        माझे कुटूंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृतीया नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपल्याकडे सर्व्हेक्षण करण्याकरीता घरी येणाऱ्या चमुला जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

                                            00000

 

 

 

 


 

माझे कुटुंब-माझी जबाबदारी- माझी जनजागृती

 

3 ऑक्टोबरला गृह भेटीतून कुटुंबांना मिळणार माहिती

१० हजार स्वयंसेवक-प्रचारक पोहचणार १ लाख कुटुंबापर्यंत

संपूर्ण जग आज कोरोना विषाणू संसर्गाच्या विळख्यात सापडले आहे. जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाल्याने अनेकांना त्याची बाधा झाली आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच या विषाणूंमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीला या आजाराची माहिती व्हावी आणि आपण कुठली काळजी घ्यावी यासाठी राज्य शासनाने या आजाराविषयी  शिक्षण देणारी माझे कुटुंब - माझी जबाबदारी ही मोहीम राज्यात सुरू केली आहे.

         गोंदिया जिल्हा राज्याच्या राजधानीपासून कोसो दूर असलेला जिल्हा. मागास,दुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या जिल्ह्यात कोरोनाला हद्दपार करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्यातून घेतला आहे. या मोहिमेत एक पाऊल पुढे जाऊन जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्या संकल्पनेतून  3 ऑक्‍टोबर रोजी "माझे कुटुंब - माझे जबाबदारी- माझी जनजागृती" हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. लोकसहभागातून करण्यात येणाऱ्या या जनजागृती मोहिमेत १० हजार स्वयंसेवक व प्रचारक सुरक्षित अंतर राखून गृहभेटीतून ही मोहीम राबविणार आहे.

         एक प्रचारक किमान दहा कुटुंबांना भेट देऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेबाबत माहिती देणार आहे. कोरोना विषाणूची बाधा होऊ नये म्हणून प्रत्येकाने शरीराचे तापमान व ऑक्सीजन पातळी मोजावी. सतत मास्क घालून राहावे.मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडून नये.दर दोन-तीन तासांनी सतत हात साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावे. ते शक्य नसल्यास सॅनीटायझरचा वापर करावा. नाक,तोंड,डोळे यांना वारंवार हात लावू नये. ताप आल्यास तसेच सर्दी, खोकला, घसा दुखणे,थकवा अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी. मधुमेह, हृदयविकार,किडनी आजार,लठ्ठपणा असल्यास दररोज तापमान व ऑक्सिजनची पातळी मोजावी. तापमान ९८.६ पेक्षा जास्त असल्यास जवळच्या फीवर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करावी.सध्या सुरू असलेले आजारपणातील उपचार सुरू ठेवावेत.खंड पडू देऊ नये. डॉक्टरांकडून नियमित तपासणी करावी. कोरोना बाधित असलेल्या व्यक्तींनी होम आयसोलेशनमध्ये राहावे. घराबाहेर पडू नये.

          दर दोन तासांनी हात साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावेत. स्वतंत्र टॉयलेट, बाथरूम व जेवणाची भांडी वापरावी. कपडे स्वतंत्र धुवावे.ताप व थकवा जाणवल्यास रुग्णालयात जाऊन तपासणी करावी. कोविड होऊन गेलेल्या व्यक्तीने रुग्णालयातून येऊन पुन्हा सात दिवस घरी होम आयसोलेशनमध्ये राहावे.कोविड-19 आजार होऊन गेला म्हणून वैयक्तिक प्रतिबंधाच्या बाबीकडे दुर्लक्ष करू नये. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडणी आजार इत्यादी आजार असल्यास आजारावर वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू आहे याची खात्री करावी.

         कोविड-19 मधून बरे झालेल्या व्यक्तीस प्लाजमा दान करावयाचा असल्यास एसबीटीसी या संकेतस्थळाची माहिती द्यावी आणि त्यासाठी संदर्भित करावे .अशा प्रकारची माहिती १० हजार स्वयंसेवक- प्रचारक एक लाख कुटुंबांना तीन ऑक्टोंबर रोजी देणार आहे.

         ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरावर,उपविभागीयस्तरावर, आणि तालुकास्तरावर बैठका घेण्यात आल्या आहेत.यासाठी जिल्ह्यातील नागरिक,सेवाभावी संस्था, पदाधिकारी समाजातील विविध घटकांचे सहकार्य लाभत आहे.या मोहिमेचा प्रचार प्रसिद्धीसाठी सेवाभावी संस्थांनी प्रचार साहित्य स्वयंस्फूर्तीने तयार केले आहे.भेट देऊन जनजागृती केलेल्या कुटुंबाबाबतचा अहवाल संकलीत करण्यासाठी प्रपत्र विहित करून दिलेले आहे. माझे कुटुंब- माझी जबाबदारी या अभियानात ही नावीन्यपूर्ण मोहीम मैलाचा दगड ठरणार आहे हे मात्र निश्चित.

00000


Thursday, 1 October 2020

श्री अग्रसेन भवन येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यास मान्यता

 नागरीकांना निशुल्क स्वरुपात ७५ बेड्स उपलब्ध

गोंदिया, दि. ०१ (जिमाका) : लक्षणे नसलेल्या कोविड बाधितांच्या उपचारासाठी सेन्ट्रल हॉस्पिटल यांच्या अधिनस्त श्री अग्रसेन भवन येथील इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी मंजुरी दिली आहे. याठिकाणी कोरोना बाधित रुग्णांसाठी निशुल्क ७५ बेड्सची सुविधा उपलब्ध झाली आहे.

या कोविड केअर सेंटरवर जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे संनियंत्रण असणार आहे. रुग्णालय प्रशासनास शासनाचे व जिल्हा प्रशासनाचे कोविड -१९ संबंधीचे सर्व नियम व कायदे पाळणे बंधनकारक राहणार आहे. शासकीय आरोग्य संस्थांनी संदर्भित केलेले रुग्ण दाखल करण्यास नकार देण्याचा अधिकार रुग्णालयास राहणार नाही. सुरक्षेची जबाबदारी पूर्णतः सेन्ट्रल हॉस्पिटलची राहणार आहे. या रुग्नालायाद्वारे पुरविण्यात येणारी सेवा निशुल्क असून, सेवाभावी तत्वावर पुरविण्यात यावी. याकरिता शासनाकडून कुठलाही मोबदला देय होणार नाही, असे मंजुरी आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ५ ऑक्टोबरपासून हॉटेल्स, बार सुरु होणार

 लॉकडाऊनची सुधारित नियमावली लागू

शाळा, महाविद्याले बंद राहणार

गोंदिया, दि. ०१ (जिमाका) : राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढविला आहे. तसेच काही बाबींना लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातही लॉकडाऊनचा कालावधीत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून याविषयीचे सुधारित आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी जारी केले आहेत. लॉकडाऊनच्या सुधारित आदेशानुसार जिल्ह्यात ५ ऑक्टोबर २०२० पासून हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, बार हे ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, बार चालविण्यासाठी स्वतंत्र ‘एसओपी’ पर्यटन विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहणार आहे. जिल्ह्यातील यापूर्वी परवानगी दिलेली सर्व आवश्यक आस्थापना, दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील. कोणत्याही विशिष्ट, सामान्य आदेशाद्वारे परवानगी दिलेले उपक्रम सुरु ठेवण्यास परवानगी राहील. याव्यतिरिक्त इतर महत्वाच्या बाबींच्या परवानगीसाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील. ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर राज्यांतर्गत व आंतरराज्यीय वाहतुकीवर कुठलेही निर्बंध राहणार नाही.

जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व कोचिंग संस्था इत्यादी ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत बंद राहतील. ऑनलाईन व दूरस्थ शिक्षणाची परवानगी कायम राहील व त्यास प्रोत्साहित केले जाईल. सिनेमा हॉल, जलतरण केंद्र, मनोरंजन पार्क, चित्रपटगृहे (मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्सेसमधील), ऑडोटोरीयम, सभागृह इत्यादी सारखी सर्व ठिकाणे बंद राहतील. गृह मंत्रालयाच्या परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासास बंदी राहील. सामाजिक, राजकीय, खेळ विषयक, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमास व मोठ्या प्रमाणातील कार्यक्रमास बंदी राहील. जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्देशान्वये प्रतिबंधित क्षेत्रातील सीमांकन व कार्यवाही पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी

Wednesday, 30 September 2020

3 ऑक्टोबरला नाविण्यपूर्ण उपक्रम. एकाच दिवशी एक लाख कुटूंबांना थेट भेट - जिल्हाधिकारी मीना




 माझे कुटूंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती : 10 हजार कर्मचारी साधणार गृहभेटीतून संवाद
          कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य सर्व्हेक्षण करण्यासाठी संपूर्ण राज्यात माझे कुटूंब माझी जबाबदारीही मोहिम राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातही हे सर्व्हेक्षण करण्यात येत असून 3 ऑक्टोबर या दिवशी एक लाख कुटूंबापर्यंत पोहोचण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिली.

         आज 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात माझे कुटूंब-माझी जबाबदारीया मोहिमेच्या यशस्वीतेसाठी  जिल्ह्याचा आढावा घेतांना आयोजित सभेत श्री. मीना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, सहायक जिल्हाधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

          जिल्हाधिकारी श्री मीना पुढे म्हणाले, राज्य शासनाची माझे कुटूंब-माझी जबाबदारीही महत्वाकांक्षी मोहिम आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने सकारात्मक दृष्टीकोनातून जबाबदारीने काम करावे. या मोहिमेअंतर्गत लोकांमध्ये सकारात्मक संदेश जायला पाहिजे. या मोहिमेत सरपंच, ग्रामसेवक यांचा सुध्दा सहभाग घेण्यात यावा. सर्व यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून काम करावे. या मोहिमेची व्यापक प्रमाणात जनजागृती करुन ही मोहिम यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

         संपूर्ण राज्यात कोविड-19 या आजाराची संख्या वाढत आहे. ग्रीन झोनमधील गोंदिया जिल्हा सुध्दा आता रेड झोनमध्ये आलेला आहे. अनलॉक सुरु असतांना कोरोना नियंत्रण अधिक प्रभावी करण्याचे राज्याचे धोरण आहे. विशेष म्हणाजे, या मोहिमेअंतर्गत आरोग्य शिक्षणावर भर देण्यासह मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार आणि लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्ती सुध्दा शोधल्या जाणार आहेत. लोकांना कोविड साक्षर करण्याच्या या मोहिमेत शासकीय कर्मचारी, क्रिडा मंडळ, गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, बचतगट, व्यापारी संघटना, राजकीय प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी अशा एकूण 10 हजार लोकांच्या सहकार्याने गृहभेटी करण्यात येणार असल्याची माहिती अभियानाचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिली.

         एका दिवसाच्या या थेट भेट उपक्रमाला 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सुरुवात करण्यात येईल. एका कुटूंबाला भेट दिल्यानंतर त्या कुटूंबाने शेजारच्या 10 कुटूंबांना अभियानाची माहिती पोहचवावी असे आवाहन त्याचवेळी करण्यात येईल. त्यामुळे साधारणत: 10 लक्ष लोकांपर्यंत एकाच दिवसात उपक्रम पोहोचेल. घरोघरी माहिती देण्याच्या या उपक्रमाअंतर्गत आरोग्य विभागातर्फे भेट देणाऱ्या व्यक्तीला माहितीचे एक लेखी नोट प्रदान केले जाणार आहे. भेट देणारा व्यक्ती भेट दिलेल्या कुटूंबाची नोंद ठेवणार आहे. त्यासाठी विशेष प्रपत्र सुध्दा तयार करण्यात आले आहे. गृहभेटी करतांना शारिरीक अंतर ठेवणे, कुटूंब प्रमुखाला घराबाहेर बोलावून त्यांना माहिती देण्यावर भर देण्यात येईल. हा उपक्रम प्रत्येक व्यक्तीला आरोग्य साक्षर करण्यासाठी असल्याने अनेक व्यक्तींना स्वयंस्फूर्तपणे या उपक्रमात सहभागी होता येईल. विशेष म्हणजे या उपक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले आहे.

         सभेला उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राहूल खांदेभराड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) नरेश भांडारकर, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे, गोंदिया नगरपरिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, तिरोडा नगरपरिषद मुख्याधिकारी अर्चना मेन्ढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे,गोंदिया उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, अर्जुनी/मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार राजेश भांडारकर, अपर तहसिलदार अनिल खडतकर, सडक/अर्जुनी तहसिलदार उषा चौधरी, तिरोडा तहसिलदार प्रशांत घोरुडे, गोरेगावचे प्रभारी तहसिलदार श्री वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे उपस्थित होते.

00000

 

कोरोना बाधित व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी गोंदिया नगरपरिषदेकडून शववाहिका उपलब्ध

 



जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. वाढत्या संसर्गामुळे बाधितांचे प्रमाणदेखील वाढत आहे.बाधितांचा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर उपचार देखील करण्यात येत आहे.
         गोंदिया नगरपालिका क्षेत्रात दुर्दैवाने कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीवर गोंदिया नगर परिषदेकडून अंतिम संस्कार शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करण्यात येत आहे.गोंदिया शहरात बाधित व्यक्तींचा शासकीय रुग्णालय, खाजगी रुग्णालय किंवा घरी मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी गोंदिया नगर परिषदेने घेतली आहे.यासाठी दोन कर्मचारी पीपीई किट घालून तेथे पोहचतील. अंतिम संस्कारासाठी लागणारे लाकडे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गोंदिया नगर परिषदेने घेतली असून यासाठी मृतकाच्या नातेवाईकांकडून कोणतीही फी आकारण्यात येणार नाही.
             गोंदिया नगरपालिका क्षेत्रात कोविड -१९ विषाणूमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींसाठी पांगोली स्मशानभूमी घाट निश्चित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्या आदेशाने गोंदिया नगर परिषदेने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
          शव वाहिकेच्या व्यवस्थेसाठी गोंदिया नगर परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अभियंता सुमित खापर्डे (7276369802),स्वास्थ निरीक्षक प्रफुल पानतावणे ( 9403126126) आणि आनंद नागपुरे(9307097088) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी केले आहे.


Tuesday, 29 September 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणांनी जबाबदारीने काळजीपूर्वक कामे करावी - दीपक कुमार मीना


       जिल्ह्यात सातत्त्याने कोरोनाचा संसर्ग वाढतांना दिसत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरीता संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काळजीपूर्वक कामे करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले.

        आज 29 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड-19 संदर्भात जिल्ह्याचा आढावा घेतांना आयोजित सभेत श्री. मीना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, सहायक जिल्हाधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

         जिल्हाधिकारी श्री मीना पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे. रॅपिड ॲन्टीजेन व आरटी-पीसीआर चाचण्यांवर भर देण्यात यावा. बाधित रुग्णांची टेस्ट 24 तासात येईल असे नियोजन करावे. होम क्वारंटाईन रुग्णांना स्टॅम्प लावण्यात यावे. कोरोना केअर सेंटरमधील सर्व कामे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे सोपविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रायव्हेट लॅबकडे सुध्दा लक्ष देण्यात यावे. बाधित रुग्णांबाबत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे असे त्यांनी सांगितले.

           जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना सांगितले की, RTPCR Test ची डाटा ऐन्ट्री प्रलंबीत आहे, त्यामुळे टेस्टींगचे काम व्यवस्थीतरित्या झाले पाहिजे. कोणत्याही बाधित रुग्णांची ॲन्टीजेन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट करणे आवश्यक आहे. यंत्रणांनी आपआपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडावी. रुग्णांच्या रक्ताची चाचणी करुन त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का लावण्यात यावा. आरोग्य तपासणीत रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला असेल तर आजूबाजुच्या नागरिकांना नगरपरिषदेतर्फे कळविण्यात यावे. जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल असेही श्री मीना यावेळी म्हणाले.

       गोंदिया येथे जिल्हा क्रीडा संकुल, पॉलिटेक्नीक कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज येथे कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी रुग्णांची गैरसोय होणार नाही व कोणत्याही रुग्णाची तक्रार येणार नाही याकडे लक्ष दयावे. रुग्णाला डिस्चार्ज करतांना होम आयसोलेशनचा त्याच्या हातावर स्टॅम्प लावण्यात यावा. कोरोना बाधित रुग्णांना घाबरवू नका, त्यांना दिलासा दिला पाहिजे. 24 तासात रुग्णाची टेस्टींग रिपोर्ट यायलाच पाहिजे. कोणत्याही कोरोना बाधित रुग्णाच्या मृतदेहाला पूर्वपरवानगीशिवाय बाहेर काढता येणार नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बाधित व्यक्तीच्या बॉडीचे प्रोटोकॉल पाळण्यात यावे. कोरोना बाधित रुग्णांबाबत यंत्रणांनी गांभीर्याने काम करावे. कोरोनाबाबत मनुष्यबळाची अडचण असल्यास गटविकास अधिकाऱ्यांची मदत घेण्यात यावी. नागरिकांनी मास्क न वापरल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करुन आतापर्यंत 408 नागरिकांवर प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

        यावेळी जिल्हाधिकारी मीना यांनी माझे कुटूंब-माझी जबाबदारीमोहिमेअंतर्गत यंत्रणांनी कुटूंबाचे सर्व्हे करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय आढावा घेतला. कुटूंबाचे सर्व्हे करण्याकरीता आशा सेविकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. कुटूंबाचे सर्व्हे ऑफलाईन व ऑनलाईन करण्यात यावे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून व्यवस्थीतरित्या काम करावे. नगरपरिषद मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी कोरोना बाधित रुग्णांकडे विशेष लक्ष देण्यात यावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे असेही श्री.मीना यावेळी म्हणाले.

       सभेला उपजिल्हाधिकारी राहूल खांदेभराड, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भुषणकुमार रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपतेतहसिलदार राजेश भांडारकर, अपर तहसिलदार अनिल खडतकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री पांचाल, पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत उपस्थित होते.

00000